Wednesday, January 23, 2019

जाऊ नको ना

जाऊ नको ना साथ सोडूनी, अर्धी वाट ही नाही सरली
जपण्यासाठी आठवणींची, ओंजळ अजूनही नाही भरली
हातामध्ये हात घेउनी, चालत होतो सोनकिनारी
वाळूमधली पाऊलांची ती, रांगोळीही नाही पुसली
जाऊ नको ना.....
क्षणात आहे क्षणात नाही, क्षणात आटली जीवनधारा
क्षणाक्षणाला भास तुझा, एक क्षणाचा खेळ हा सारा
क्षणभंगुर त्या भातुकलीचा, गेला मोडूनी डाव नियारा
पुन्हा मांडूया तीच चूल अन, अंगत पंगत तोच पसारा
जाऊ नको ना......
आठवते मज आज पुन्हा ते, वेडे भांडण पावसातले
ओल्या मातीच्या गंधाने, भिजवून गेले चुंबन पहिले
गंध तोच अन कोसळणारा, तोच असे रे पाऊस ओला
ये ना घे ना कवेत फिरुनी, घाबरा होई जीव एकला
जाऊ नको ना.... ऐक ना रे.. जाऊ नको ना....
Monday, June 25, 2018


कोसळतोय वळीव खिडकीबाहेर
तडतडत आहेत तावदानावर त्याचे टपोरे थेंब
अंगणात साचलेलं तळ जगतेय त्याचे क्षणभंगुर अस्तित्व
गेटबाहेर उभी आहे माझी बाईक एकटीच
तिलाही सवय झाली आहे आता एकट्याने भिजायची
आठवतेय तीही पावसात चढलेला पन्हाळ्याचा घाट
आणि आपण दोघे चिंब भिजलेले.. प्रेमात
तबक उद्यानाबाहेरची गरमागरम भजी
आणि कॉफीत बुडवून खाल्लेली ती बिस्किटे ग्लुकोजची
आजही उभा आहे मी खिडकीच्या ह्या बाजूला
हातात कॉफीचा कप घेऊन
आजही कोसळतोय वळीव डोळ्यातून
आणि मनात साचलेलं तळ आजही वाट बघतेय
एखादे प्रतिबिंब त्यात उमटण्याची
नि ह्या प्रतिक्षेत सगळेच आहोत आम्ही... एकटे..
ते तळ, ती बाईक, ती कॉफी आणि मीहीFriday, April 13, 2018

मी

रोम रोम पेटतो पण काया होते बंदिनी
आर्त मन हे साद देई पाय गेले जखडूनी
कोण घाली बंधने मज, का अशी कमजोर मी
वागले जर मुक्त मग का भासते मज स्वैर मी
तो म्हणे अन ती म्हणे हे खेळ मनचे वाहूनी
मीच कारावास रचला, कैद ही झालेच मी
घे भरारी ग नभी बेड्या मनीच्या तोडूनी
मुक्त हो स्वच्छंद हो निर्बध सारे झटकूनी
मोल स्वत्वाचे कळावे, घ्यावे मज मी व्यापूनी
लख्ख प्रतिमा ही पाहावी आज व्हावे मीच मी
आज व्हावे मीच मी....
Friday, February 16, 2018


आणखी काही कविता...

दर्या -

लाख लाटा लाख मोती
लाख शंखांचीहि गणती
विश्व अवघे दर्यात जनती
अमृतासवे विषही वसती

===================

बाबा -

पियुषासाठी हरेक लढतो
जहर पितो एक नीळकंठ तो
विष पचवूनी विश्व घडवतो
सुष्ट रक्षण्या रौद्र ही होतो
क्षणात तांडव क्षणात शमतो
क्षणात गंगा पाझर स्त्रवतो
भस्म, जटा अन चर्म लेवुनी
कृपावृष्टि जगतावरी करितो
जगत् पिता तो महादेव पण
एक सांब मम वसनि वसतो
अंश जणू त्रैमूर्तीचा अन
मम विश्वाचा विश्वकर्मा तो

Tuesday, May 16, 2017


ही कविता माझ्या लाडक्या लेकीसाठी -


छोट्या छोट्या पावलांनी चाल राणी वाट नवी
छोट्या छोट्या डोळ्यांमध्ये स्वप्नं मात्र मोठी हवी
छोट्या तुझ्या हातांनी ह्या घडव गं नवं जग
ओळख तुझी तिथे फक्त माणूस असेल, एवढं बघ

देवीपण नको तुला, चुकण्याची हवी मुभा
त्यागाचे पोवाडे नको, जगण्याची घ्यावी मजा
घरची तू परी जरी, पंख गरुडाचे तुझे
घे भरारी उंच नभी, पल्याड जा तू क्षितीजाच्या

रेशमी हे केश काळे, नाक जणू चाफेकळी
मदमस्त डोळे नशिले, ओठ गुलाब पाकळी
नव्हेसच तू कवितांमधली, अशी कचकडी बाहुली
शक्ती बुद्धी समृद्धी तू, लक्ष्मी दुर्गा आणि काली

ना तू सखी ना साजणी, ना निर्भया ना दामिनी
ना तू माता नाही जननी, ना प्रिया अन नाही पत्नी
रक्षेसाठी विनवणारी नाहीसच तू अबला भगिनी
गरज तुला ना ह्या बिरुदांची, ओळख असू दे 'व्यक्ती' म्हणूनी
केवळ एक व्यक्ती म्हणूनी...


Saturday, March 25, 2017

शिवाजी महाराज - आग्र्याहून सुटका - For Kids annual day performance

@copyright manogate.blogspot.com - Do not use without permission


१. नमस्कार मंडळी. आज पहिलीचा वर्ग तुम्हाला शिवाजी महाराजांची एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला महाराजांच्या हुशारीची, चातुर्याची आणि धूर्तपणाची कल्पना येईल. शिवरायांनी मुरारबाजींच्या मृत्यूनंतर पुरंदरला राजा जयसिंगबरोबर तह केला. जयसिंगाने त्यांना औरंजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला येण्याचे आमंत्रण दिले. शिवाजी, संभाजी, हिरोजी फरजंद, मदारी मेहतर आणि इतर सरदारांबरोबर आग्र्याला गेले. पण औरंगझेबाने दरबारात त्यांचा अपमान केला आणि त्यांना नजरकैदेत ठेवले.

२. शिवरायांनी  औरंझेबाचा डाव ओळखला होता. शिवरायांना अफगाणिस्तानात कैद करून मराठी राज्यावर कबजा करायचा त्याचा इरादा होता. शिवरायांनी औरंगझेबाला सांगितले "आता तर मी तुमचा कैदी आहे. मला काय करायचेय हे सैन्य? माझ्या सरदारांना आणि सैन्याला परत पाठवून  द्या. मी, संभाजी, हिरोजी, मदारी इथे राहू." औरंझेबाला वाटले "बरे झाले, सैन्य गेल्यावर शिवाजी एकटा पडेल." त्याने लगेच सैन्याला परत पाठवायचा हुकूम दिला.

३. चला पहिली पायरी पार पडली. सैन्याला परत पाठवण्यामागे शिवबांचा गनिमी कावा होता. पण आता फौलाद खान आणि मुघल सैनिक सतत महाराजांवर पहारा ठेवून होते. सैन्य परत गेल्यावर थोड्या दिवसांनी शिवबांनी आजारी पडल्याचे नाटक केले. महाराज दिवस रात्र त्यांच्या खोलीतच झोपून राहू लागले. मदारी आणि हिरोजी त्यांची काळजी घेत होते. अनेक वैद्य, हकीम येऊन महाराजांना बघून जात. पण महाराजांची तब्येत काही बरी होईना.

४. इकडे शिवनेरीवर जिजामाता खूप चिंतेत होत्या. महाराजांच्या गैरहजेरीत त्याच राज्यकारभार बघत होत्या. शिवबा तर कैदेत होताच, पण त्याबरोबर जिजाऊंचा शंभू बाळ पण कैदेत होता. संभाजी महाराज तेव्हा फक्त ९ वर्षाचे होते. इतक्या लहान वयात घरापासून दूर, जिजाऊपासून दूर शत्रूच्या राज्यात अडकले होते. पण त्यांना भीती वाटत नव्हती. आपले बाबा आपल्याला इथून सोडवून नेतील ह्याची त्यांना खात्री होती.

५. इकडे दिवसेंदिवस शिवबाची तब्येत बिघडतच चालली होती. आता शिवबांच्या पोटातही दुखू लागले. शेवटी महाराजांनी जयसिन्घ राजाला विनंती केली "बादशहाला सांगा, शिवाजी आता वाचत नाही. मला गोरगरिबांना अन्न, पक्वांन्ने वाटू द्या. त्यांच्या आशीर्वादाने मला बरे वाटले तर वाटले. " जयसिंघानी औरंझेबाला महाराजांची हि विनंती कळवली. हे ऐकून बादशहाला आनंदच झाला. त्याने लगेच दान-धर्म करायला होकार दिला.

६. रोज शिवबांच्या तंबूतून अन्नाचे, मिठाईचे अनेक पेटारे गरीबाना वाटायला जाऊ लागले. मोठ्या मोठ्या पेटाऱ्यातून कित्येक पक्वाने महाराज पाठवत. फौलाद खान आणि त्याचे सैनिक ह्या पेटाऱयांची कसून तपासणी करत. हे असे २-३ महिने सुरु होते. हळू हळू सैनिक ही कंटाळले. "रोज रोज काय बघायचे ह्या पेटाऱ्यात ?" असा विचार त्यांनी केला. पेटारे तसेच बाहेर जाऊ लागले.

७. शिवबांना हेच तर हवे होते. एक दिवस शिवाजी महाराज आणि संभाजी दोन पेटाऱ्यात बसले. शिवबांच्या जागी हिरोजी झोपला. मदारी त्याचे पाय दाबायचे नाटक करू लागला. बाकी पेटाऱयांबरोबर हे पण पेटारे हमालांनी बाहेर नेले. महाराज कैदेतून निसटले. बाहेर महाराजांचे सरदार त्यांची वाटच बघत होते. महाराज आणि शंभू घोड्यावर बसून दक्षिणेला न जाता उत्तरेला मथुरेकडे निघून गेले. महाराज सहीसलामत सुटले..

८. दुसऱ्यादिवशी हिरोजी आणि मदारीने पलंगावर उश्या ठेवल्या, त्यावर पांघरूण  घातले आणि औषधाची बाटली घेऊन ते बाहेर पडले. बाहेर सैनिकांनी त्यांना हटकले. "महाराजांचे डोके दुखते आहे, औषध घेतो आणि लगेच परत येतो." असे म्हणून दोघेही तिथून पसार झाले. बराच वेळ कुणी परत आले नाही, खोलीतूनही काही आवाज येत नाही म्हटल्यावर सैनिकांनी खोलीत जाऊन पाहिले तर काय खोली रिकामी. फौलाद खान ला समजेना हे झाले कसे? शिवबा कसा पळाला?

९. बादशहाला हे कळल्यावर तो भयंकर चिडला. पण करणार काय? शिवबानी संभाजीला मथुरेत लपवून ठेवले, संभाजी मेला अशी खोटी बातमी पसरवली. आपली दाढी मिशी काढून त्यांनी बैराग्याचा वेष घेतला आणि लपत छपत ते शिवनेरीवर परत आले. २-३ महिन्यानंतर शंभू बाळ हि परतले. शंभूला जवळ घेऊन जिजाऊ म्हणाल्या, "बाळ तुम्ही तर खूप च धाडसी झालात. बादशाहाच्या हातावर तुरी देऊन आलात." त्यावर संभाजी म्हणाला "आऊ तुरी नाही, मिठाई देऊन आलो"

reference - "शूर शिवबा" - धीरज नवलखे 

Thursday, October 27, 2016

सखा

(manogat.com वर पूर्वप्रकाशित)

अगदी बालपणापासूनच मला का कोण जाणे पण कृष्णाबद्दल अपार आकर्षण होतं. त्या युगंधराच्या प्रतिमेमागे लपलेला तुमच्या माझ्यासारखा भावुक कृष्ण त्याच्या असामान्य सामान्यतेमुळे आपलासा वाटायचा. कदाचित मोठमोठ्या आदर्शांच्या गर्दीत कृष्ण हरवला नाही म्हणूनही असेल! प्रेमळ पती, पिता, पुत्र, राजा, बंधू ह्या त्याच्या वेगवेगळ्या भूमिकेतली मला सर्वाधिक भावलेली भूमिका म्हणजे भावसख्याची. राधेचा कृष्ण, द्रौपदीचा कृष्ण, दारुकाचा कृष्ण, अर्जुनाचा कृष्ण… कृष्ण सखा!
कदाचित म्हणूनच नात्यांची समज यायला लागल्यापासून सख्याचा शोध मी माझ्याही नकळत सुरू केला. आज युगंधर वाचताना, मला भेटलेल्या नि कालौघात हरवलेल्या माझ्या एका सख्याची अनावर आठवण आली आणि म्हणूनच हा लेख प्रपंच!
घराचा उंबरठा ओलांडून बाहेरच्या जगात आपला खऱ्या अर्थाने प्रवेश होतो तो महाविद्यालयात गेल्यावरच. निदान माझ्या बाबतीत तरी असेच घडले. मित्र-मैत्रिणींपेक्षाही ज्यांना भाऊ-बहिणी म्हणता येईल अशा वर्ग बंधू-भगिनींना, ज्यांनी मला लहानाचं मोठं होताना पाहिलं त्या शिक्षक-शिक्षिकांना सोडून त्या प्रचंड महाविद्यालयाच्या उंबरठ्यावर पहिल्यांदा पाय ठेवला तेंव्हा हृदयाची धडधड किती तरी वाढली होती. बावरल्या मनानं ज्या इमारतीत मी प्रवेश केला होता ती इमारत २ वर्षांनी सोडून जाताना पाय अडखळले ते तिथे भेटलेल्या दोस्त मंडळींमुळेच. माझ्या सख्याची उपाधी ज्याला देता येईल असा एक मित्र मला ह्या महाविद्यालयानेच दिला. खरं सांगायचं तर तेंव्हा जाणवलं ही नव्हतं की त्याचं माझ्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं स्थान आहे, पण आज मागे वळून बघताना, त्याला केवळ मित्र म्हणणे म्हणजे त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईल असं वाटतंय. आयुष्याच्या कित्येक अवघड वळणांवर त्याने मला सावरलं, आधार दिला. माझ्या यशाचं तोंड भरून कौतुक केलं, पण जिथे मी चुकले तिथे कानउघाडणी करायलाही तो कचरला नाही. त्याच्याबरोबर बाइकवरून केलेल्या त्या लांब लांब रपेटी, तास न तास मारलेल्या गप्पा, फक्त त्याला आणि त्यालाच सांगितलेली ती गुपितं.. किती सुंदर क्षण घालवले आहेत आम्ही एकमेकांच्या सहवासात. उच्च शिक्षणासाठी घर सुटलं, गाव सुटलं, तसं आमचं भेटणंही पूर्वीसारखं होईना. पण भेटणं होत नाही म्हणून भावबंध तुटले असते तर त्याला सखा तरी का म्हटलं असतं मी? अभियांत्रिकीच्या त्या ४ वर्षात जेव्हा मला कुणाच्या तरी आधाराची गरज वाटली, एकटेपणा जाणवला प्रत्येक वेळी त्याला हाकेच्या अंतरावर उभा पाहिला. मी काही न बोलताही माझ्या मनातलं जाणायची कला त्याने कुठे आत्मसात केली कोण जाणे. आजही आठवतं.. काही कारणामुळे वाढदिवसाला मला घरी जाणे शक्य नव्हते, मला खूप वाईट वाटत होतं त्या गोष्टीचं. पण अगदीच नाईलाज झाला होता. त्या दिवशी सकाळीच माझ्या नावचं एक पार्सल आलं आमच्या खोलीवर. त्यात एक अतिशय सुंदर पंजाबी सूट होता आणि फुलांचा गुच्छदेखील. मी ज्या टेलरकडून नेहमी कपडे शिवून घ्यायचे त्याच्याकडे जाऊन, त्याच्या जुन्या वह्यांतून मापं मिळवून त्याने माझ्यासाठी तो ड्रेस शिवून पाठवला होता. जे माझ्या आई-बाबांनादेखील सुचलं नव्हतं, ते त्याला सुचावं? आणि सुचल्यावर त्यानं ते अंमलातदेखील आणावं? माझी आणि माझ्या नवऱ्याची, अजितची भेट अभियांत्रिकी करतानाच झाली. मैत्रीतून प्रेमाकडे झालेल्या त्या नात्याच्या वाटचालीचा साक्षीदार बनला माझा तो सखा. ज्या दिवशी मी आणि अजितनं एकमेकांसमोर मन मोकळं केलं, त्याच रात्री मी माझ्या त्या मित्राला फोनवर ही बातमी सांगितली. दुसऱ्याच दिवशी सकाळी मला भेटायला (की माझी निवड पडताळायला?) तो कॉलेजवर हजर झाला. काय गरज होती त्याला इतक्या तत्परतेनं येण्याची? फोनवर त्याच्याशी बोलताना, त्याच्याजवळ मन मोकळं करताना, "तू आत्ता इथं असायला हवा होतास" ह्या माझ्या एका वाक्यासाठी त्यानं इतकी धडपड करावी? अमेरिकेत मी शिक्षणाला आले तेंव्हा मला शिष्यवृत्ती मिळाली नव्हती, त्यामुळं अगदी आवश्यक तेवढाच खर्च करायचा असा मी नियमच घालून घेतला होता. इथं आल्यापासून गरजेबाहेरची एक ही गोष्ट मी विकत घेतली नव्हती, मग नवे कपडे तर फारच लांबची गोष्ट झाली. माझ्याबरोबर तोदेखील त्याच वर्षी इथे शिक्षणासाठी आला होता, पण दुसऱ्या विद्यालयात. त्याला हे समजल्यावर एका नाताळानिमित्त त्यानं मला बरेचसे कपडे भेट  म्हणून पाठवून दिले. त्याच्या ह्या कृत्याचं विशेष वाटण्याचं कारण हे की त्यालासुद्धा तेंव्हा शिष्यवृत्ती मिळाली नव्हती. का केलं त्यानं माझ्यासाठी हे सगळं? कोणतं नातं होतं आमच्यात? तो फक्त एक मित्र होता माझा? नाही, मैत्रीपेक्षाही मोठं काही तरी होतं आमच्यात. एक क्षण असाही होता जेव्हा त्या नात्याला प्रेम म्हणावं का असा विचार आमच्या दोघांच्याही मनात येऊन गेला, पण ते प्रेम नाही हेदेखील लगेचच उमजलं. ह्या क्षणानंतर आमच्या नात्यात पूर्वीसारखा मोकळेपणा राहील की नाही अशी शंका माझ्या मनात आली नाही असं म्हणणं खोटेपणाचं ठरेल. पण अशा घटनांनी डळमळावा असा बंध नव्हताच तो! शिक्षण पूर्ण झालं, नोकरी लागली, आमची लग्नं ही झाली. अंतरं वाढली, तसा संपर्क कमी होत गेला. मात्र संपला नाही. आम्ही अजूनही बोलतो, जेव्हा बोलतो पूर्वीच्याच नात्यानं बोलतो, वागतो. आजही तितकाच मोकळेपणा जाणवतो. पण पूर्वी प्रत्येक बऱ्या-वाईट प्रसंगात ज्या तीव्रतेनं एकमेकांची आठवण यायची, एकमेकांच्या उपस्थितीची अनावर ओढ जाणवायची ती कालपरत्वे थोडी कमी झाली आहे. प्रेम घटले नाही, पण वाढत्या वयानं आणि परिस्थितीनं त्याचा आवेग मात्र नक्कीच कमी केला आहे. आज माझ्या सख्याच्या जागी तो आहे का? खरंच माहीत नाही. पण पूर्वी नक्कीच होता आणि त्याचं तेच रूप मी हृदयात जपून ठेवलं आहे, आयुष्यभर ठेवेन.
त्याची जागा आता कुणी दुसरं घेऊ शकेल की नाही माहीत नाही, पण आज ज्याला मी सखा म्हणू शकते तो केवळ माझा सखाच नाही तर माझा प्रियकर, माझा नवराही आहे. ओळख, मैत्री, प्रेम अशा ह्या प्रवासाने आता लग्नाची वेदी ही पार केली आहे. आयुष्यभर एकमेकांचा साथ देण्याची शपथ आम्ही ८ वर्षांपूर्वी घेतली आणि त्यावर ज्येष्ठांच्या संमतीची आणि आशीर्वादांची मोहर ४ वर्षांपूर्वी लागली. "माझ्या प्रत्येक क्षणात तुझा वाटा अर्धा आहे" असं म्हणणारे आम्ही "माझा प्रत्येक क्षण तुझा नि तुझाच आहे" असं कधी म्हणायला लागलो हे आम्हालाही कळलं नाही. इतर अनेक नात्यांप्रमाणे आमच्याही नात्यानं अनेक चढ-उतार पाहिले. पण त्यातून नातं परिपक्वच होत गेलं. कधी प्रियकराच्या नात्यानं जवळ घेणारा तो, कधी मला बापाच्या मायेनं कुरवाळणारा तो, कधी पूर्वीसारखाच मित्राच्या नात्यानं चिडवणारा तो, तर कधी एखाद्या लहान मुलासारखा बिलगणारा तो.. त्याच्या ह्या सगळ्या रूपामध्ये मला प्रिय असलेलं त्याचं रूप आहे सख्याचं. ह्या पुढे कदाचित माझ्या आयुष्यात दुसरा सखा येणारही नाही. पण माझ्या ह्या दोन्ही सख्यांनी मला जे भरभरून प्रेम दिलंय, ते ह्या जन्मासाठीच काय पुढच्या अनंत जन्मांसाठी पुरेसं आहे. 

सुनिता (३ - शेवट)

(manogat.com वर पूर्वप्रकाशित)

शेवटी ३ वर्षांच्या विरहानंतर सुनिताच्या आयुष्यात मधुचंद्राची ती गुलाबी रात्र आज आली होती…. पुढे...
तीन वर्षांच्या वनवासानंतर सुनिताच्या आयुष्यात पुन्हा सुखाची बरसात होत होती. मधू, आई, बाबा सगळे आनंदात होते. आईनं तर तिरुपतीला जाऊन अभिषेक ही केला. प्रवीणचे आई-वडील देखील खूष होते. त्याच्या आईला नातवंडांना खेळवण्याची घाई झाली होती. घरी फोन केला की ती हटकून हा विषय काढायची आणि प्रवीणचा गोरामोरा झालेला चेहरा बघून सुनिता डोळ्यात पाणी येईपर्यंत हसायची. सुनिताला आता एकच काळजी होती, प्रवीणच्या नोकरीचं कुठेच जमत नव्हतं, त्याची नोकरी जाऊन वर्ष उलटलं होतं. शिल्लकीत टाकलेले पैसे जवळपास संपत आले होते. घर चालवायला सुनिताची कमाई पुरी पडत नव्हती. पाणी अगदीच नाकातोंडाशी यायला लागलं. वेगळ्या घराची चैन आता परवडणार नाही हे त्या दोघांच्याही लक्षात आलं होतं. त्यांनी जवळच्याच महाविद्यालयातल्या काही विद्यार्थ्यांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. २ बेडरूम-किचनच्या त्या ब्लॊकमध्ये ६ लोक रहात होते. तशी मुलं चांगली होती, प्रवीण आणि सुनिताला त्यांची स्वतंत्र खोलीही होती. पण सुनिताला नाही म्हटलं तरी त्यांच्या बरोबर राहताना संकोच वाटतच होता. हे असं किती दिवस चालायचं ह्याची शाश्वती नव्हती. प्रवीणला बहुदा ह्या सगळ्याची कल्पना आली असावी. त्याने एक दिवस आपणहून विषय काढला. "सुनि, तुला इथे त्रास होतोय ना गं? पण काय करु? आपल्याला सध्या नाही परवडणार वेगळं घर घेऊन रहायला. सॊरी सुनिता. माझ्यामुळं तुला…" "अरे असं काय म्हणतोस? मला काही त्रास होत नाहिये. तू आहेस ना आता माझ्या बरोबर!! आणखी काय हवं मला? आज ना उद्या तुला नोकरी मिळेलच आणि मग काय ऐषच आहे की!! कशाला नाही ती चिंता करतोस?" "नाही सुनिता, अगं मला इंटरव्ह्यूसाठी ४ दिवस बाहेर जायचे आहे पुढच्या आठवड्यात, तू कशी राहशील एकटी? राधाकडे तुला सोडून जाणं माझ्या तरी जीवावर येतंय. तसा माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, अर्थात तू हो म्हणत असशील तरच.." "काय?" "मला वाटतं तू थोडे दिवस मधूकडे जाऊन रहा. तिथे निदान तुला सगळ्या मुलींबरोबर तरी राहता येईल. थोडा बदल पण होईल. मला पण नोकरी शोधण्याकडे जास्त लक्ष देता येईल आणि तुझं इथलं भाडं पण वाचेल. एखाद महिन्यात मला नोकरी मिळेलच, मग आपण एकत्र आहेच की!" प्रवीणला सोडून पुन्हा इतक्या दूर जाऊन राहण्याचा विचारच सुनिताला सहन होत नव्हता. पण सद्य परिस्थितीत दुसरा कुठलाच मार्ग दिसत नव्हता. त्या दिवशी रात्री सुनिता किती तरी वेळ प्रवीणला बिलगून रडत होती आणि प्रवीण तिची समजूत काढत होता. शरिरानं दोघे दूर जाणार होते, पण काही महिन्यांपूर्वीच्या मनाच्या दुराव्यापेक्षा हा विरह नक्कीच सुसह्य असणार होता.
ताई आपल्याला भेटायला येणार ह्या विचारानं मधू भलतीच खूष होती. तिच्या रु.पा.सुद्धा ताईची वाट बघत होत्या. आपल्याकडे कुणीतरी वडील माणूस येणार… घरापासून इतक्या दूर येऊन पडलेल्या त्या तिघीदेखील मधूइतक्याच उतावीळ झाल्या होत्या ताईच्या स्वागताला. महिनाभर ताईच्या हातचं खायला मिळणार.. तिच्याशी गप्पा मारायला मिळणार.. आणखी काय हवं होतं त्यांना? सुनिताला भेटल्यावर तर त्यांना आपली बहीण भेटल्याचाच आनंद झाला. सुनिता होतीच तशी. जितक्या आपुलकीनं ती मधूची काळजी घ्यायची तितक्याच आपुलकीनं तिच्या तीन रुपांची पण!! मधूच्या मित्र-मैत्रिणींबरोबर सुनिताचा वेळ अगदी मजेत जात होता. एखाद दिवसाआड प्रवीणशी गप्पाही होत होत्या. तो मध्ये २-३ वेळा कुठे तरी बाहेरगावीही जाऊन आला. बहुदा नोकरीसाठी मुलाखत असावी. पण प्रवीणला यश येत नव्हतं. जवळपास ३ महिने उलटत आले तरी नोकरीचा शोध चालूच होता. हल्ली आठवड्यातून एखादा दिवसच प्रवीणचा फोन येत होता. फोनवर इतके पैसे खर्च करणं त्यांना परवडत नव्हतं ना!!! दिवसांमागून दिवस उलटत होते.. महिन्यांमागून महिने. आठवड्याच्या अंतरावर होणारे फोन आता पंधरवड्याच्या अंतरानं व्हायला लागले. फोनवर प्रवीणशी बोलताना सुनिताला जाणवायचं त्याला किती त्रास होतोय दूर राहण्याचा ते आणि तो आपल्याला मिस करतोय ह्या जाणीवेनं तिला अश्या परिस्थितीतही समाधान वाटायचं.
सुनिताला मधूकडे येऊन वर्ष होऊन गेलं होतं. २ च दिवसांपूर्वी ती प्रवीणशी बोलली होती. तो खूप आनंदात होता. का ते मात्र सांगायला तयार नव्हता. सुनिताचं मन सांगत होतं, त्याला नोकरी मिळाली आहे आणि तो लवकरच मला न्यायला इकडे येणार आहे. त्याच्या विचारात ती गर्क असतानाच दारावरची बेल वाजली. पोस्टमन आला होता. सुनिताच्या नावचं रजिस्टर पत्र होतं. तिनं सही करुन ते पत्र घेतलं आणि लिफाफा उघडला. त्यात घटस्फोटाचा अर्ज होता. वर्षभर सुनिता आणि प्रवीण वेगळे रहात आहेत, त्यांच्यातले पती-पत्नीचे संबंध केव्हाच संपुष्टात आले आहेत, तेव्हा त्यांना कायदेशीर घटस्फोट मिळावा असा अर्ज प्रवीणने केला होता आणि सुनिताला कोर्टाची नोटीस आली होती!!!
प्रवीणनं आपला डाव साधला होता… एका मुलीचं आयुष्य नासवून तो मात्र वेदाबरोबर सुखानं नांदणार होता आणि सुनिता… कोण जाणे तिच्या भविष्यात काय होतं?
----------------------------------------- समाप्त --------------------------------------------------------

ही एक सत्यकथा आहे. अर्थात पात्रांची नावं बदलली आहेत आणि प्रसंग रंगवायला थोडाफार कल्पनाविलास केला आहे. पण कथेचा गाभा मात्र बदललेला नाही. ह्या कथेतली सुनिता मी अगदी जवळून पाहिली आहे. तिच्या संघर्षात तिला आधारही दिला आहे. तिचे अश्रूही पुसले आहेत. तिची कथा लोकांसमोर मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. काही चुकले असल्यास तुम्ही ती चूक मोठ्या मनाने पदरात घ्यावी अशी विनंती.
एका मध्यमवर्गीय तेलुगु कुटुंबातून आलेली ही मुलगी.. मुलगा अमेरिकेत असतो ह्याने तिचे आई-वडील आणि ती स्वतः देखील हुरळून गेली होती. आपण कोणत्या अग्निदिव्यात प्रवेश करतो आहे हे तिला कसं समजणार होतं? किती तरी स्वप्नं डोळ्यात साठवून तिने अमेरिकेत पाऊल ठेवले. नशिबानं तिच्यासमोर काय वाढून ठेवले आहे ह्याची बिचारीला कल्पनाही नव्हती. तिचा संघर्ष कथेच्या ह्या वळणावर येऊन संपला नाही. घटस्फोट मिळू नये म्हणून तिनं जीवाचं रान केलं. वकिलाची फी भरायला जवळ पैसे नव्हते, सवेरा नावाच्या एका संस्थेकडून तिने मदत घेतली. पण त्यातून फारसे काही निष्पन्न होणार नाही ह्याची लवकरच तिला कल्पना आली. प्रवीणनं तिच्यावर २-३ वेळा हात उगारला होता. पण सुनिताने पोलिसात तक्रार न केल्यामुळे त्याची कागदोपत्री काहीच नोंद नव्हती. वेदाला लिहिलेल्या इमेलच्या छापील प्रती कोर्टात ग्राह्य मानल्या गेल्या नाहीत. ते दोघेही आपल्या मर्जीनं वेगळे रहात होते हे प्रवीणनं विनाप्रयास सिद्ध केले. त्यामुळे सुनिताला alimony देण्याची त्याला गरज ही पडली नाही. प्रवीणची नोकरी ही गेली नव्हती. तो जवळपास २ वर्ष Telecommute करत होता. वेदाशी संपर्क त्यानं तात्पुरता तोडला होता. सुनिताचा विश्वास संपादन करण्यासाठी केलेला तो एक फार्स म्हणा हवं तर. घटस्फोटाची नोटीस आली तेव्हा प्रवीणचं ग्रीन कार्ड होत आलं होतं. सुनितानं त्याला ग्रीन कार्ड होईपर्यंत वाट पाहण्याची विनंती केली आणि त्यानं ती मान्यही केली. ग्रीन कार्ड झाल्या झाल्या दोघांचा घटस्फोट झाला. ह्या लेखातल्या सुनिताचे सासू-सासरे तिच्याशी आणि तिच्या आई वडिलांशी अगत्यानं वागलेले दाखवलेत, पण खऱ्या सुनिताचे सासू-सासरे प्रवीणचीच री ओढत होते. त्यांच्या मते सुनितामध्येच काही तरी दोष होता, त्यामुळेच प्रवीण अजूनही वेदाच्या मागे मागे जात होता. नंतर बरेच दिवस सुनिता पिझ्झा शॊप, किराणा दुकानं अशा ठिकाणी काम करत होती. कित्येकदा समजावूनही ती भारतात परतायला तयार नव्हती. त्याच दरम्यान मधूचं तिच्याच वर्गातल्या एका भारतीय मुलाशी लग्न ठरलं. मधूजवळ फार दिवस राहणं सुनिताला शक्य नव्हतं. तिनं भारतीय कॊट्रॅक्टरला गाठून खोटानाटा रेझ्युमे बनवला आणि एका सॊफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळवली. तिनं सॊफ्टवेअर मधलं काही ज्ञान नसताना तिथे कसं काय निभावलं माहित नाही, पण आज त्याच कंपनीत ती पूर्णवेळ काम करते.
एखादी कथा रंगवून सांगावी इतकं शब्दसामर्थ्य माझ्यात नाही. लेखिकेची प्रतिभाही माझ्याजवळ नाही. पण किती तरी दिवसांपासून सुनिताची कथा लोकांना सांगावी असं मनात होतं. सुनितासारख्या किती तरी अश्राप मुली अमेरिकेच्या ओढीनं इथे येऊन मानसिक आणि शारिरीक अत्याचाराचा बळी ठरतात. मुलगा अमेरिकेला असणं म्हणजे त्यानं मोठा तीर मारला आहे असं समजणारे वरमाता-पिता आपल्याला पावलागणिक दिसतील आणि अश्या मुलांना फारसा विचार न करता आपली मुलगी देणारे महाभाग वधुपितादेखील.
ह्या कथेतल्या सुनिताला सावरायला इथे मधू होती, मधूचे किती तरी मित्र-मैत्रिणी होते. पण असा काहीच आधार नसलेल्या सुनितादेखील आपल्या आजूबाजूला आहेत. सुनिताला घरी परतण्यापेक्षा अमेरिकेत एकटीनं राहणं जास्त सोयीस्कर वाटलं. का घडलं असं? समाजाच्या बोचऱ्या नजरांत लपले आहे उत्तर ह्याचे. लग्न झालं की तिरडीवरूनच त्या घराबाहेर पडायचं ही शिकवण आजही मुलींना दिली जाते आणि त्यामुळेच असे हाल सोसूनही मुलींची पावलं आपल्या माहेराकडे वळत नाहीत. आपण मुलींना काय शिकवायचं ह्याचा फेरविचार मुलींच्या पालकांनी करणे गरजेचे आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि अश्या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठिशी उभे राहणे, समाजाचा काडीचा विचार न करता, हे महत्त्वाचे आहे. बघा पटतंय का ते.

सुनिता(२)

(manogat.com वर पूर्वप्रकाशित)
आज पुन्हा तो ऒफिसला दांडी मारणार होता!! पुढे...
प्रवीण जसा घराबाहेर पडला तसा सुनिताचं अवसान गळून पडलं. कितीतरी वेळ ती रडत होती. "पुढे काय?" हा एकच विचार तिला सारखा सतावत होता. आई-बाबांना तर प्रवीणबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यांना कसं सांगायचं सगळं हेच तिला कळत नव्हतं. प्रवीणला सोडून ती परत गेली तर काय होईल ह्या विचारांनी तिचं डोकं भणभणायला लागलं. घटस्फोटितेचं जीणं जगणं किती अवघड असतं  हे तिनं पाहिलं होतं. शेजारच्या बंगल्यातल्या जोशीमावशींबद्दल लोक किती गरळ ओकत, त्यांच्याबद्दल नाही नाही ते बोलत. आज मावशींच्या जागी ती स्वतःला ठेवून बघत होती. लोकांच्या नसत्या प्रश्नांना उत्तरं देण्याची ताकद तिच्या ठायी नक्कीच नव्हती. परत जाऊन बाबांवर बोझ बनून रहाणं तिला नको होतं, पण चांगली नोकरी मिळावी अशी तिची शैक्षणिक पात्रता नव्हती, शिवाय कामाचा काही अनुभवही नव्हता. अजून मधूचं लग्न व्हायचं होतं. आपल्यामुळे त्यात काही विघ्न आलं तर, ह्या विचारानं ती आणखीनच अस्वस्थ झाली. पुढे सगळा अंधार दिसत होता, मन मोकळं करावं असंही कुणी जवळपास नव्हतं. आता तिला एकाच गोष्टीचा आधार वाटत होता, मधू उच्चशिक्षणासाठी लवकरच अमेरिकेत येणार होती. सुनितापासून २ तासाच्या अंतरावर मधूचे कॊलेज होते. पण त्यालासुद्धा महिनाभर अवकाश होता. तोपर्यंत सुनिताला सगळं एकटयानंच झेलायचं होतं.
"वेदा, आज मी सुनिताला सांगून टाकलं आपल्याबद्दल. तिला घटस्फोट देण्याचं ठरवलं आहे मी. पण वेदा, ती नाही म्हणते गं घटस्फोट देणार. खरंच ती तयार नाही झाली तर काय करायचं आपण?" प्रवीण खरंच काळजीत होता. खूप व्याकूळ होऊन तो वेदासमोर आपली कैफियत मांडत होता. पण त्याचं सगळं गाऱ्हाणं ऐकूनही वेदाच्या चेहऱ्यावर तीच नेहमीची बेफिकिरी दिसत होती. तिच्या त्या बेदरकार वृत्तीवरच तर प्रवीण फिदा झाला होता. जीन्सची शॊर्ट आणि टॅंक टॊप घातलेली वेदा त्याच्या शेजारी लवंडून मस्तपैकी सिगारेटचे झुरके घेत होती. "सोड ना यार प्रवीण.. का चिंता करतो तिची? Sooner or later she will give in. Mental torture hurts thousand times more than physical torture. किती दिवस सहन करेल ती तुझं हे कोरडं वागणं? आज ना उद्या ती आपणहून तयार होईल घटस्फोटाला. But promise me one thing, you will not hit her again… ever! हा वेडेपणा तुला महागात पडेल प्रवीण. घटस्फोट तुझ्या चुकीमुळे होतो आहे हे ती सिद्ध करु शकली ना कोर्टात तर तुला huge settlement द्यावी लागेल. We cannot afford to do that, sweetheart!! So, just take it easy!" वेदाने शांतपणे प्रवीणला पुढचा प्लॅन समजाऊन सांगितला. प्रवीणला आता बरंच हलकं वाटत होतं. त्यानंतर किती तरी वेळ ते दोघे एकमेकांच्या कुशीत शिरुन गप्पा मारत होते.
त्या दिवसानंतर मात्र प्रवीणचे वागणे बदलूनच गेले. काही ना काही कारण काढून तो सुनिताशी वाद घालायला लागला. कधी लाइट बिल जास्त का आलं म्हणून तर कधी चहा थंड का दिला म्हणून. कधी घर किती पसरलंय म्हणून तर कधी आणखी काही. सुनिताचं जीणं मुष्किल करायचं ठरवूनच टाकलं होतं त्यानं. त्याच्या प्रत्येक वादाचा शेवट आताशा "घटस्फोट" ह्या शब्दानं होत होता. पण सुनिता शांतपणे सगळं सहन करत होती. मधूचं येणं प्रत्येक दिवसागणिक जवळ येत होतं. कधी एकदा ती येते आणि आपण आपलं मन तिच्याजवळ मोकळं करतो असं झालं होतं सुनिताला.
सुनिताला रात्रभर झोप लागली नव्हती. कधी एकदा पहाट होते आणि आपण मधूला भेटतो असं झालं होतं तिला. प्रवीणच्या बाबांनी दम दिल्यामुळे असेल कदाचित, पण तो मधूला एअरपोर्टवर न्यायला जाण्यास तयार झाला होता.
"जवळपास नऊ-साडे नऊ महिन्यांनी ताई भेटणार नाही मला!" मधू खूष होती. अमेरिकेत जाऊन स्थापत्यशास्त्रात संशोधन करायचं तिचं स्वप्न सत्यात उतरत होतं. बाबा खरं तर तयारच नव्हते तिला इतक्या दूर पाठवायला. खरं तर तिच्या लग्नाची बोलणीसुद्धा सुरु केली होती त्यांनी. पण ताई आणि आईच्या हट्टापुढं त्यांना हात टेकावे लागले होते. मधू अपरिचित देशात जात होती, पण तिला अजिबात धास्ती वाटत नव्हती. ताई-भाऊजी होतेच की तिची काळजी घ्यायला. आई-बाबांच्या प्रेमळ छत्रातून बाहेर पडून ती ताई आणि भाऊजींच्या आश्वस्त छायेखाली जाणार होती. किती सोपा होता हा प्रवास!!
मधू जेव्हा बाहेर पडली तेव्हा ताईचं ते बदललेलं रुप समोर बघून तिचा डोळ्यावर विश्वासच बसेना. सुनिताच्या डोळ्यातली विषण्णता मधूला अस्वस्थ करत होती. प्रवीणनं तर तिची एका शब्दानंही चौकशी केली नव्हती. कुठे तरी काही तरी चुकत होतं. कधी एकदा आपण घरी जातो आणि ताईशी एकांतात बोलतो असं वाटत होतं तिला.
मधू आणि सुनिताला घरी सोडून प्रवीण ऒफिसला निघून गेला. सुनिता मधूसाठी नाश्ताच्या तयारीला लागली. खरं तर २४ तासाच्या प्रवासानं मधूलाही शिणायला झालं होतं, पण सुनिताचा निस्तेज चेहरा बघून तिला राहवेना. सुनिताचा हात धरून तिला सोफ्यावर बसवत ती म्हणाली "ताई काय अवस्था करून घेतली आहेस तू स्वतःची. चेहरा ओढल्यासारखा दिसतोय, डोळ्याखाली काळवंडलंय, आजारी दिसायला लागली आहेस? काय झालंय तुला नेमकं? घरची, आई-बाबांची आठवण येते का? की घरी एकटी कंटाळतेस म्हणून असं होतंय. तू पुन्हा चित्रं का नाही काढत. शेजाऱ्यांशी ऒळखी करून घे, तेवढाच वेळ जाईल ना गप्पाटप्पात!! आणि फारच कंटाळा आला तर सरळ भाऊजींना फोन करत जा घरी येऊन काम करा म्हणून… ते काय तुझ्या आज्ञेतच असतील की!!" असं म्हणत तिनं खट्याळपणे हसून ताईकडं पाहिलं, सुनिताचे डोळे पाण्यानं डबडबले होते. सुनिता लाजेल, खोटं चिडून एखादा गुद्दाही घालेल पाठीत अशी मधूची अपेक्षा होती. पण ताई रडत होती. तिचं काही तरी बिनसलं होतं हे नक्की. मधूचा हात हातात घेऊन कितीतरी वेळ सुनिता रडत होती आणि मधू तिची शांत होण्याची वाट पाहात तिच्या डोक्यावरुन हात फिरवत होती. असा किती वेळ गेला कोण जाणे! पण सुनिताला बरंच हलकं वाटत होती. तिच्या जीवाभावाचं कुणीतरी इतक्या दिवसांनी भेटत होतं, कुणाचा तरी आपुलकीचा हात तिच्या हातात होता, कुणीतरी प्रेमानं तिला कुरवळत होतं. त्यानंतर किती तरी वेळ ती बोलत होती आणि मधू सुन्न होऊन ऐकत होती. तिच्या साध्या भोळ्या ताईवर झालेला अन्याय ऐकून तिचा संताप अनावर होत होता. पण "पुढे काय?"चं उत्तर तिलासुद्धा उमगत नव्हतं. आई-बाबांना लवकरात लवकर ह्या सगळ्याची कल्पना द्यायला हवी होती. ताईनं एकटीनं हे कसं झेललं असेल ह्या विचारानं तिला गलबलून आलं. सुनिताला जवळ घेऊन ती बराच वेळ तिला थोपटत होती. दोघींना जेवणाचीदेखील शुद्ध राहिली नव्हती.
"आई मी मधू. सकाळीच पोचले ताईकडे. अगं खूप दमले होते म्हणून फोन नाही केला पोचल्या पोचल्या. तुम्ही पण झोपला असाल म्हणून म्हटलं रात्रीच बोलावं. आई, बाबांना दे ना फोन." मधू शब्दांची जुळवाजुळव करत होती. नेमकं कसं सांगायचं ताई आणि भाऊजींबद्दल? "बाबा, तुम्हाला काही तरी सांगायाचं होतं.. नाही मी ठीक आहे. नाही रडत नाही आहे. बाबा… ताई.. नाही हो. तिची तब्येत बरी आहे. बाबा, भाऊजींचं दुस~या कुठल्या तरी मुलीवर प्रेम आहे हो.. आणि आपल्याला त्रास नको म्हणून ताई काही बोललीच नाही इतके दिवस." बाबांच्या पायाखालची जमिन सरकलेली तिला इथे इतक्या दूरही जाणवत होतं. नंतर बराच वेळ मधू बाबांना सगळी हकिगत सांगत होती.
"सुनि, तू कधी इतकी मोठी झालीस की आम्ही परके झालो तुझ्यासाठी?" बाबांचा आवाज कापत होता. "बाळा हे सगळं कसं गं झेललंस एकटीनं? कधी हुं हा चूं नाही केलंस? आणि आम्हाला पण कसं नाही कळलं तू काही तरी लपवते आहेस ते? इतक्या दूर गेलीस म्हणून कंटाळत असशील असंच वाटायचं नेहमी. कसला गं बाप मी? तुझे अश्रू पण नाही पुसू शकलो मी." सुनिताचे हुंदके त्यांना अस्वस्थ करत होते. जिच्यावर हात उगारायचा तर दूरच, त्यांनी आवाज पण चढवला नव्हता तिच्यावर प्रवीणने हात उगारला हे ऐकून त्यांना संताप आवरत नव्हता. प्रवीणने तर त्यांची फसवणूक केली होतीच, पण त्याच्या आईवडिलांनीही त्यांचा घात केला होता. प्रवीणच्या प्रेमप्रकरणाबद्दल लपवून त्यांनी सुनिताचं आयुष्य उध्वस्त हेलं होतं. फोन झाल्या झाल्या बाबा प्रवीणच्या घरी गेले. प्रवीणच्या बाबांनी नेहमीप्रमाणे हसून त्यांचे स्वागत केले, पण आज काही तरी बिनसलेय हे त्यांच्याही लक्षात आलं होतं. बाबांनी लगेचच विषयाला हात घातला. "दादासाहेब, तुम्ही हे बरं केलं नाही. माझ्या सोन्यासारख्या लेकीला आगीत लोटलंत. प्रवीणला आता घटस्फोट हवा आहे, तो घटस्फोट देऊन नामानिराळा होईल, पण माझ्या मुलीला जन्मभर परित्यक्तेचा डाग लागेल. समाज कशाला विचारतोय चूक कुणाची होती म्हणून. सगळे बाईलाच दोष देणार. तुम्ही असं करायला नको होतं दादासाहेब. सुसंस्कृत लोकांना हे असलं वागणं नाही शोभत." दादासाहेब मान खाली घालून सगळं ऐकत होते, पोटच्या पोरानंच त्यांचा केसानं गळा कापला होता.
त्यानंतर कित्येक दिवस दादासाहेब रोज प्रवीणशी बोलत होते. आईनंही प्रवीणला समजावून पाहिलं. दरडावून झालं. अगदी जीव देण्याची धमकीही देऊन झाली, पण प्रवीण बधत नव्हता. वेदाशिवाय त्याला दुसरे काहीच सुचत नव्हते. आताशा तर तो रात्री घरी येणंसुद्धा टाळत होता. मधू पण तिच्या कॊलेजच्या गावी गेली होती. सुनिता पुन्हा एकटी पडली होती. रोज संध्याकाळी मधूशी बोलणं हाच एक विरंगुळा होता तिच्यासाठी. तिला एका गोष्टीचं मात्र राहून राहून आश्चर्य वाटत होतं, हल्ली प्रवीण एका अक्षरानंदेखील घटस्फोटाचा विषय काढत नव्हता. घरी तसा तो क्वचितच यायचा, पण आला तरी पूर्वीसारखी भांडणं होत नव्हती. तो सारखा विचारात गर्क असायचा, कुठल्या तरी चिंतेनं त्याला ग्रासलं होतं. कित्येकदा मनात येऊन देखील सुनितानं त्याला कधी त्याबाबत काही विचारलं नाही आणि त्यानंसुद्धा आपणहून कधीच काही सांगितलं नाही.
दिवसांमागून दिवस उलटत होते. वेदाबद्दल सुनिताला समजलं त्या गोष्टीला १ वर्ष उलटून गेलं. मधल्या काळात सुनिता बरीच सावरली होती. ती रोज वाचनालयात जायला लागली होती. जवळच्याच कम्युनिटी कॊलेजमध्ये तिने इंग्रजीचे धडे घेतले आणि आता तिने इंटिरियरच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. त्यांच्याच कॊलनीत राहणाऱ्या २-३ भारतीय मुली तिच्या परिचयाच्या झाल्या होत्या. पूर्वीइतका एकटेपणा आता तिला जाणवत नव्हता. आई-बाबांनी कितीदा तरी आर्जवं केली होती, पण सुनिता भारतात परत जायला तयार नव्हती. परत गेल्यावर लोकांनी केलेल्या चांभार चौकश्या तिला नको होत्या. शिवाय आता तिला स्वतःच्या पायावरही उभं राहायचं होतं. ह्या सगळ्यापेक्षाही महत्त्वाचे कारण काही तरी वेगळंच होतं. प्रवीण आज ना उद्या बदलेल, त्याला उपरती होईल आणि तो आपल्याकडे परत येईल असा विश्वास तिला वाटत होता. "मी कुणाचं काय वाईट केलंय की देव माझं असं वाईट करेल? बघच तू, प्रवीण नक्की बदलेल." मधूला तिने कित्येकदा सांगितलं होतं. मधूच्या विरोधाचा, आई-बाबांच्या आग्रहाचा तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता.
गेले दोन दिवस प्रवीण चक्क घरी होता. वेदाकडे जाणं तर सोडाच तो ऒफिसला पण गेला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरुन काही तरी वाईट घडल्याचं सुनिताच्या लक्षात आलं होतं, पण त्याच्याशी बोलण्याचा काही प्रश्नच उद्भवत नव्हता. "सुनिता, मला तुझ्याशी काही तरी बोलायचंय" किती तरी महिन्यांनी प्रवीण आज सुनिताशी बोलत होता. "महत्त्वाचं आहे. तुला वेळ आहे आत्ता?" "बोल" तुटकपणे सुनिताने संमती दिली. "सुनिता माझी नोकरी गेली. मला २ दिवसांपूर्वीच समजलं त्यांनी मला काढून टाकल्याचं. मी खूप प्रयत्न केला, पण ते मला एकही संधी द्यायला तयार नाहीत. माझं ग्रीन कार्ड यायला फक्त वर्षभर राहिलेय, आत्ता नोकरी जाणं म्हणजे सगळं पुन्हा नव्यानं सुरु होणार. मी त्यांना विनंती करणार आहे, निदान मला पे-रोलवर तरी ठेवा म्हणून, एवढं ग्रीन कार्ड होऊ दे, मग खुशाल माझं नाव काढून टाकू देत. पण त्यांनी मान्य जरी केलं तरी आता इथे राहणं शक्य नाही मला, माझ्या मित्रांना काय सांगणार मी? किती नामुष्कीची गोष्ट आहे ही अशी नोकरी जाणं म्हणजे." प्रवीणच्या डोळ्यात पाणी तरारलेलं सुनिताला दिसत होतं, त्याला जवळ घ्यावं, त्याला कुरवळावं, त्याला सांगावं की सगळं जग तरी तुझ्या विरोधात गेलं तरी मी आहे तुझ्याबरोबर, सुनिताला अगदी गलबलून येत होतं. किती प्रयासानं ती गप्प राहिली होती. "मी ठरवलंय, आपण आता इथं नाही रहायचं, आपण राधाकडे जाऊ. जिजाजींच्या ओळखीनं मला नक्की कुठे ना कुठे नोकरी मिळेल, पण अगदी नाही जरी मिळाली तरी निदान घरभाड्याचा खर्च वाचेल. राधाचं एवढं मोठ्ठं घर आहे, मी आजच बोलतो तिच्याशी, १५ दिवसांत इथलं सगळं आवरुन जाऊ आपण तिकडे." प्रवीणचं बोलणं ऐकून सुनिताला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. राधाकडं जायचं, हे गाव सोडायचं, म्हणजे प्रवीण वेदापासून दूर जाणार तर… तिच्या विरहाच्या कल्पनेनं व्याकुळ होणारा प्रवीण आज इतका मोठा निर्णय घ्यायला तयार आहे, म्हणजे नक्कीच त्यांचं काही तरी बिनसलं असावं, मी सांगत होतेच मधूला, हे आज ना उद्या होणार होतंच. सुनितानं प्रवीणच्या ह्या निर्णयाला आनंदानं मान्यता दिली. मधूनं जरा कटकट केली, राधाचं गाव अमेरिकेच्या दुस~या टोकाला होतं, इथे मधू दीड-दोन तासाच्या अंतरावर होती, त्यामुळे गरज पडली तर पटकन भेटणं शक्य होतं. पण सुनिता खूष होती. १५ दिवस तसे गडबडीतच गेले. मध्ये २ दिवस मधूही येऊन गेली. तीसुद्धा प्रवीणचं बदललेलं वागणं बघून अचंबित झाली होती. प्रवीण त्या १५ दिवसात फारसा घराबाहेर पडला नव्हता, सुनिताला घर आवरायला मदत करत होता, मधूशी देखील तो खूपच आपुलकीनं वागला, सामान आवरताना त्यानं थोडी पुस्तकंही तिच्यासाठी बाजूला काढून ठेवली होती. साशंक मनानं आलेली मधू परत जाताना मात्र अगदी निश्चिंत होती. ताईच्या प्रार्थनेला शेवटी यश आलं होतं.
थोड्याच दिवसात सगळा बाडबिस्तारा गुंडाळून प्रवीण आणि सुनिता राधाच्या घरी मुक्कामाला आले. प्रवीणचा बराचसा वेळ कॊंम्प्युटरवर काही तरी काम करण्यात अगर नवीन नोकरी शोधण्यात जात होता. सुनिताशी भांडणं तर केव्हाच बंद झाली होती. हल्ली मूडमध्ये असेल तर तो सुनिताशी गप्पाही मारायचा. इतक्या दूर, शिवाय परक्याच्या घरी असल्यामुळे सुनिताचं मधूशी फारसं बोलणं होत नव्हतं. राधाला तिच्या स्वयंपाकघरात कुणी मध्ये मध्ये केलेलं आवडत नसे, त्यामुळे वेळ कसा काढायचा हा मोठा प्रश्न सुनितापुढे होता. टीव्ही, वाचन, इंटिरियरच्या वह्या चाळून काही तरी आपणहून करणं ह्यात थोडा वेळ निघून जाई, पण त्यानंतर मात्र तिला घर खायला उठत होतं. अशात राधाचा छोटुला शुभम मात्र तिच्यासाठी मोठा विरंगुळा होता. हल्ली ‘मामी, मामी’ करत तो दिवसभर तिच्या मागून फिरत असे. पण राधाला बहुदा तेही खटकत होतं. पहिले काही दिवस ती खूपच आतिथ्यानं वागत होती, पण महिन्या-दीड महिन्यानंतर तिच्या वागण्यात बदल जाणवायला लागला. जिजाजींच्या बोचऱ्या नजरा प्रवीणलासुद्धा जाणवत होत्या. इथे फार दिवस राहण्यात काही अर्थ नाही हे त्या दोघांनाही उमगले होते. प्रवीणचे नोकरीसाठी प्रयत्न सुरुच होते. त्यात घर हुडकण्याची भर पडली.
ह्या नवीन गावी येऊन त्यांना ४ महिने होत आले होते. आठवड्याभरापूर्वीच प्रवीण आणि सुनिता त्यांच्या घरात रहायला आले होते. प्रवीणची नोकरी नसताना हे घर खरं तर त्यांना परवडण्यासारखं नव्हतं, पण दुसरा काही उपायही नव्हता. राधा आणि जिजाजींच्या कोरड्या वागण्याचा प्रवीणला फारच त्रास झाला होता. "सुनिता, ह्या जगात कुणी कुणाचं नाही बघ. माझ्या सख्ख्या बहिणीला माझं ओझं वाटतंय तर इतर कुणाकडून मी काय अपेक्षा ठेवायची?" प्रवीण ह्या सगळ्या प्रकरणाला फारच उबला होता. पण ह्या सगळ्या प्रकारानं का होईना, त्या दोघातला संवाद बराच वाढला होता. रोज जेवणाच्या टेबलावर दोघे कितीतरी वेळ बोलत असत. दिवसा मागून दिवस जात होते पण प्रवीणला नोकरी मिळत नव्हती. सुनितानं ह्याच दरम्यान एका भारतीय किराणा दुकानात नोकरी सुरु केली. बराचसा घरखर्च त्यातून भागत होता पण शिल्लक काहीच पडत नव्हती. एक दिवस ती दुकानातून घरी आली आणि तिला अश्चर्याचा धक्काच बसला. प्रवीण तिच्यासाठी केक घेऊन आला होता, तिचा वाढदिवस त्याच्या लक्षात होता तर. सुनिताच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहायला लागले. प्रवीणनं तिला जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. किती तरी वेळ दोघेही अश्रूंना वाट मोकळी करुन देत जुन्या कटु आठवणींना जणू तिलांजली वाहात होते. किती दिवस वाट पाहिली होती या दिवसाची सुनितानं!! ३ वर्षांपासून जे स्वप्न ती दिवस-रात्र बघत होती त्याची पूर्तता होताना दिसत होती. आज पहिल्यांदाच तिने प्रवीणच्या डोळ्यात तिच्यासाठी प्रेम पाहिले होते. हा क्षण संपूच नये असं तिला वाटत होतं. प्रवीणच्या बाहुपाशात तिला असंच जन्मभर रहायचं होतं. प्रवीणची मिठी तिच्याभोवती आणखी घट्ट होत होती. तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकले…
शेवटी ३ वर्षांच्या विरहानंतर सुनिताच्या आयुष्यात मधुचंद्राची ती गुलाबी रात्र आज आली होती
(क्रमशः)

सुनिता (१)

(manogat.com वर पूर्वप्रकाशित)

आज सुनिता खूप आनंदात होती. ३ वर्षांपासून जे स्वप्न ती दिवस-रात्र बघत होती त्याची पूर्तता होताना दिसत होती. आज पहिल्यांदाच तिने प्रवीणच्या डोळ्यात तिच्यासाठी प्रेम पाहिले होते. प्रवीणला ती पहिल्यांदा भेटली तो प्रसंग तिला राहून राहून आठवत होता.
सुनिताचा विसावा वाढदिवस नुकताच झाला होता. आई-बाबा आता तिच्या लग्नाच्या गोष्टी करु लागले होते. तशी तिच्या लग्नाची त्यांना फारशी काळजी नव्हतीच. सुनिता नाकी-डोळी छानच होती, शेलट्या अंगाची, गव्हाळ रंगाची. तिच्या चेहऱ्यावर कधीही न विरणारं हसू असायचं. बाबा नेहमी म्हणायचे, ‘माझी सुनि जिथे जाईल ते घर हास्यानं-आनंदानं भरुन जाईल.’ आणि खरंच त्यात काहीच अतिशयोक्ती नव्हती. आपल्या सालस वागण्यानं सुनिता कुणालाही आपलंसं करुन घेत असे. दोन दिवसांपूर्वीच शेट्येकाका एक स्थळ सांगायला आले होते. मुलगा अमेरिकेत होता, मोठ्या पगाराची नोकरी होती, हुशार होता, दिसायलाही चांगला होता. शिवाय काकांच्या चांगल्या परिचयातले लोक होते. आज ते लोक सुनिताला बघायला येणार होते. सुनिता खूषही होती आणि थोडी बावरलीही होती. बाबांच्या कपाटातून मधूने मुलाचा फोटो केव्हाच लंपास केला होता आणि दिवसभर ती ताईला चिडवत बसली होती. जसजशी प्रवीणची येण्याची वेळ जवळ येत होती तशी सुनिताच्या मनातली हूरहूर वाढत होती. "तो कसा असेल? काय बोलेल? त्याला मी आवडेन? आणि आवडले तर… तर आईबाबांना सोडून त्याच्याबरोबर मला अमेरिकेला जावे लागेल? मला नाही जायचं इतक्या दूर. बाबा पण ना… काय गरज होती त्या लोकांना बोलवायची? पण खरंच तो किती देखणा दिसतो. आणि काका म्हणत होते खूप हुशार पण आहे. मला कशाला पसंत करेल तो मग. मी ना इतकी हुशार, ना देखणी. अरे देवा, मला तर इंग्रजी पण नाही बोलता येत नीट. बरंच आहे म्हणा, सुंठेवाचून खोकला जाईल.." दिवसभर कळत-नकळत ती प्रवीणचाच विचार करत होती. प्रवीण, त्याचे आईबाबा आणि त्याची थोरली बहिण राधा त्यांच्या घरी आले तेव्हा त्यांच्यासमोर जाण्याच्या विचारानंच तिच्या पोटात खड्डा पडला होता आणि तिचं ते बावरलेलं ध्यान बघून आई अगदी मनसोक्त हसली होती. पहिल्याच भेटीत प्रवीणच्या घरच्यांनी आई-बाबांना आपलंसं करून घेतलं होतं. वर्षानुवर्षीची ओळख असावी अश्या गप्पा रंगल्या होत्या. प्रवीण आणि सुनिता मात्र कोप~यात अंग चोरून बसले होते. प्रवीणच्या नजरेला नजर भिडवण्याचीसुद्धा तिला लाज वाटत होती. त्या रात्री बाबा फारच खुशीत होते. त्यांच्या सुनिसाठी त्यांना हवा तसा मुलगा त्यांना सापडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रवीणच्या बाबांचा फोन आला, त्यांना मुलगी पसंत होती. पण लग्न आठ दिवसात उरकावे लागणार होते. प्रवीणची सुट्टी संपत आली होती. राधालाही अमेरिकेला तिच्या घरी परतायचे होते. आठ दिवसात सगळं कसं जमायचं म्हणून बाबांनी थोडे आढेवेढे घेतले, पण मग तेही तयार झाले आणि घरात लग्नाची गडबड सुरू झाली. घर पाहुण्यांनी भरून गेलं.
त्या आठ दिवसात प्रवीणशी बोलायला पण सुनिताला वेळ मिळाला नाही, भेटणं, हिंडणं-फिरणं, एकमेकांना समजून घेणं तर पार दूरची गोष्ट झाली. प्रियकराबरोबर हातात हात गुंफून चांदण्यात फिरण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं. प्रियकराच्या प्रेमात पुरतं पडण्यापूर्वीच तो तिचा नवरा झाला होता. पण सुनिता आनंदात होती, तिच्या स्वप्नातला राजकुमार सत्यात साकारला होता, सोन्यासारखं सासर मिळालं होतं. लग्नानंतर चार दिवस पूजा, नातेवाईकांच्या गाठी-भेटी, प्रवासाची तयारी, व्हिसा ह्यातच गेले. तिला आणि प्रवीणला म्हणावा तसा एकांत मिळतच नव्हता. पण एकदा अमेरिकेला गेल्यावर राजा-राणीचा संसारच तर होता, कायमचा मधुचंद्र.. ती आपल्या घरी जाणार होती. तिला तिकडे जाऊन तिचं घर सजवायचं होतं, छोटीशी का होईना बाग फुलवायची होती, पुढचा महिनाभर प्रवीणसाठी काय काय पदार्थ बनवायचे ते तिनं मनातल्या मनात ठरवूनही टाकलं होतं. त्याच्याशी लग्नाच्या धांदलीत राहून गेलेल्या गप्पा ही मारायच्या होत्या. घरापासून दूर जाण्याचं दुःख होतं, पण प्रवीणबरोबर जाणार ह्याचा आनंदही होत होता. ज्याला आपण फक्त दोन आठवडे ओळखतो त्याच्यावर आपण इतकं प्रेम कसं करू शकतो? तिला राहून राहून आश्चर्य वाटत होतं.
"तीन वर्ष झाली नाही आपण अमेरिकेत पहिलं पाऊल ठेवलं त्याला?" सुनिता विचारात गढली होती. तीन वर्ष… ह्या तीन वर्षात तिनं तीन जन्माचं दुःख सोसलं होतं.
अमेरिकेला परतल्यापासून प्रवीण शांत शांतच असायचा. तो ऒफिसातून घरी येईपर्यंत साडे नऊ वाजून गेलेले असायचे, आल्यावर जेवण उरकले की तो त्याच्या स्टडीत जाऊन बसायचा. कधी चॅट करण्यात, कधी फोनवर बोलण्यात ११ वाजून जायचे. कित्येकदा तो स्टडीतच झोपून जायचा. सुनिता मात्र त्याच्या स्पर्शासाठी, सहवासासाठी रात्रभर तळमळत रहायची. लग्नाला महिना उलटून गेला होता, पण सुनिताच्या आयुष्यात अजूनही मधुचंद्राची गुलाबी रात्र आलीच नव्हती. कदाचित पुरेशी ओळख होण्यापूर्वीच लग्न झाल्यामुळे असे असेल, थोड्या दिवसात सगळं ठीक होईल अशी ती मनाची समजूत घालत होती. पण कुठे तरी काही तरी चुकत होते. लग्नाच्या नव्या नवलाईच्या दिवसात असणारी ती स्पर्शाची अनावर ओढ, प्रणयातुरता प्रवीणच्या डोळ्यात तिला कधी दिसलीच नाही. त्याच्याशी बोलण्याचे तिचे सगळे प्रयत्न व्यर्थ जात होते. आपल्या माणसांपासून इतक्या दूर ती ज्याच्या भरवशावर आली होती, तोच तिला टाळत होता. "का? का वागतो हा असा? मी काय गुन्हा केलाय ह्याचा? इतकी का मी वाईट आहे की माझ्याबद्दल काडीचं आकर्षण नाही वाटत ह्याला? आणि नव्हते मी पसंत तर का केलं माझ्याशी लग्न?" मनातल्या मनात कित्येकदा उजळणी केली होती ह्या प्रश्नांची. कित्येकदा एकटीच रडलीही होती.. पण ह्या परक्या देशात कोण होतं तिचे अश्रू पुसायला? शेजार असा नव्हताच. तिचे कुणी मित्र-मैत्रिणी, नातेवाईकही नव्हते अमेरिकेत. आठवड्यातून एकदा काय तो घरी फोन व्हायचा, पण आई-बाबांना ह्या गोष्टीची जाणीवही होऊ दिली नव्हती तिनं. दिवसांमागून दिवस उलटत होते, पण प्रवीणच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता.
दिवाळसण.. पहिला पाडवा.. सुनिता आरतीच्या तयारीत होती. डाळींबी रंगाच्या चंदेरीत ती खूपच गोड दिसत होती. प्रवीण तिला बघायला आला होता तेव्हाही तिने हीच साडी नेसली होती. स्वतःला आरश्यात न्याहाळताना तिला तो दिवस आठवला आणि तिच्या चेह~यावर नेहमीची खिन्नता पसरली, डोळे पाण्यानं डबडबले. किती बदलली होती ती ह्या काही दिवसात. तिच्या ओठांवरचं हसू जणू गायबच झालं होतं. चेहरा काळवंडला होता, डोळ्याभोवती काळी वर्तुळं दिसत होती, आठ महिन्यात आठ वर्ष सरल्यासारखी दिसायला लागली होती ती. एकटेपणाचं दुःख, सततचा कोंडमारा ह्यांनी ती अगदीच कोमेजून गेली होती. तितक्यात दरवाजा वाजला, "प्रवीण ऒफिसला निघाला वाटतं.." तिने लगबगीने आरती उचलली आणि ती बाहेर पळाली, "प्रवीण, २ मिनिट थांब ना, तुला ओवाळायचंय.. आज पाडवा ना!" प्रवीण थांबला, पण त्याच्या डोळ्यात विलक्षण घृणा दिसली तिला त्या क्षणी. "सुनिता, किती दिवस असं खोटं जगणार आहेस तू? का वागतेस अशी काही कळत नसल्यासारखी? आज पाडवा म्हणून नव~याला ओवाळायला निघाली आहेस, पण तुला आणि मला दोघांनाही माहित आहे की आपल्यात नवरा-बायकोचं  कोणतंही नातं नाही… ना शारिरीक.. ना मानसिक.. मग हा दिखावा कशाला? बरं जगाला फसवण्यासाठी तू हे करते आहेस म्हणावं तर इथे आपल्या दोघांशिवाय कुणीही नाही. किती दिवस सहन करू मी तुला ह्या घरात? तू समोर दिसलीस की घरी एक क्षणदेखील थांबायची इच्छा होत नाही.. आज ना उद्या तू कंटाळशील, चिडशील, भांडशील आणि मला सोडून निघून जाशील ह्या आशेवर ८ महिने काढले मी. आता मला हे खोटे जगणे नको आहे. आता मी वेदाला सोडून नाही जगू शकत आणि तू इथे आहेस तोवर ती ह्या घरात पाऊलही नाही ठेवणार.. मला घटस्फोट हवाय सुनिता, लवकरात लवकर.." प्रवीणचा प्रत्येक शब्द आसूडासारखा बरसत होता सुनितावर. "घटस्फोट…" ती मटकन खाली बसली. तिच्या घशाला कोरड पडली होती, तोंडातून शब्दही फुटत नव्हता. प्रवीण अजूनही बोलतच होता. "मी आजच वकिलाकडे जाणार आहे, तू जितक्या लवकर संमती देशील ह्या घटस्फोटाला ते आपल्या दोघांसाठी चांगले आहे. मी तुला थोडीफार नुकसानभरपाई द्यायला तयार आहे, तुझं परतीचं तिकिटही तुला मिळेल, पण ह्यापेक्षा अधिक अपेक्षा तू न ठेवलेलीच बरी." प्रवीणच्या प्रत्येक शब्दासरशी सुनिताचा पारा चढत होता. "नुकसान भरपाई.. काय नुकसान भरपाई देणार आहेस प्रवीण तू मला? माझ्या आयुष्याचा.. माझ्या स्वप्नांचा चुराडा केलास तू… ती स्वप्नं पुन्हा सजवता येतील तुला? ह्या आठ महिन्यात नरक यातना भोगल्या आहेत मी.. माझ्या अश्रूंची काय भरपाई देणार तू मला? मी माझं सर्वस्व तुला देऊ केलं आणि तू… शी!! वेदासाठी जीव तळमळतोय ना तुझा? तुझ्यासाठी मी अशीच तळमळले आहे प्रवीण. रात्रं दिवस तळमळले आहे.. ह्या परक्या देशात, परक्या लोकात तुझ्या भरवशावर आले मी आणि तू विश्वासघात केलास माझा. मी काय गुन्हा केला होता की एवढी मोठी शिक्षा दिलीस तू मला. तुझं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम होतं ना.. मग माझा बळी का दिलास तू त्या विवाहवेदीवर? का केलंस माझ्याशी लग्न? तुझ्या एका होकारानं माझं सगळं आयुष्य होरपळून टाकलंस तू ह्याची जाणीव आहे तुला? म्हणे नुकसान भरपाई देतो.. नाही प्रवीण. इतके दिवस तू मला जाळलं आहेस ना ह्या अग्नीत, आता मी तुला त्या विरह यातना भोगायला लावणार. मी नाही इतक्या सहजासहजी तुला सोडून जाणार. मी तुला घटस्फोट नाही देणार. वेदाला ह्या घरात नाही येऊ देणार मी… नाही येऊ देणार" सुनिताचा चेहरा लालबुंद झाला होता, कपाळावरची शीर तटतटत होती. तिचे हे रुप प्रवीणला नवीन होते. वेदाबद्दल ऐकल्यावर सुनिता रडेल, विनवण्या करेल असे त्याला वाटले होते. पण चंडिकेच्या रुपातली ही सुनिता त्याला अपेक्षित नव्हती. त्याला माहित होतं त्यानं चूक केली होती. वेदाला स्वीकारायला त्याचे आई-बाबा तयार नव्हते. आईनं तर आत्महत्येची धमकी दिली, म्हणून नाईलाजानं त्यानं लग्नाला संमति दिली. पण वेदाशिवाय दुसऱ्या कुणावरही प्रेम करणं त्याला शक्य तरी होतं का? पण सुनिता.. ती हे समजून घ्यायला तयारच नव्हती. वेदाला ह्या घरात येऊ देणार नाही… ह्या सुनिताच्या वाक्यासरशी प्रवीणचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने खाडकन सुनिताच्या मुस्काटात लगावली. सुनिता कोलमडली. पण तिच्याकडे साधा कटाक्षही न टाकता प्रवीण घराबाहेर पडला.
तिरमिरीतच त्याने गाडी वेदाच्या घराकडे वळवली. पुढे काय करायचं हे त्याला समजेनासंच झालं होतं. आई-बाबांना, राधाला तो काय सांगणार होता? सुनिताच्या घरी ही बातमी कळल्यावर काय होईल ह्याचा विचारही त्याला करवत नव्हता. आज त्याला वेदाची खूप गरज होती. त्याला तिच्या मिठीत शिरून सगळ्या चिंता विसरायच्या होत्या. तिच्या स्पर्शाच्या कल्पनेनेच त्याच्या शरिरावर रोमांच उभे राहिले. क्षणभर तो आपल्या सगळ्या चिंता विसरला. वेदा.. त्याला वेड लावणारे तिचे ते घारे डोळे.. खांद्यावर रुळणारे कुरळे केस.. तिच्या गोऱ्यापान दंडावर गोंदलेलं गुलाबाचं फूल.. तिचे कमनीय शरिर.. त्याचा रोम अन रोम तिच्या विचारांनी पेटून उठला, तिच्या स्पर्शासाठी त्याचा कण अन कण आसुसत होता. वेदा.. वेदा.. वेदा.. तिच्याशिवाय त्याला काहीच सुचेनासे झाले होते. वेदाच्या घरापुढे गाडी लावून तो धावतच घरात शिरला आणि आवेगानं त्याने वेदाच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. आज पुन्हा तो ऒफिसला दांडी मारणार होता!!
(क्रमशः)

निर्णय

(manogat.com वर पूर्वप्रकाशित)
एका छोट्याश्या गावातली ही गोष्ट. गाव तसं आट-पाट, गावाला वळसा घालून गेलेली नदी. गावाच्या एका बाजूला सह्याद्रीच्या लांबच लांब रांगा. गावाच्या दक्षिणेला शिवरायांचा चरणस्पर्श लाभलेला खडा किल्ला. गावात देवीचं मोठं मंदिर. अगदी कुणालाही हेवा वाटावा, असं ते गाव!!
ह्या मंदिराच्या शेजारीच एका जुनाट इमारत होती. विजूचे आजोबा दरबारात कारभारी होते, तेंव्हा गावच्या महाराजांनी दिली होती म्हणे ती इमारत त्यांना. सध्या अनाथाश्रम होता तिथं. त्या दुमजली इमारतीत वरच्या दोन मजल्यांवर वीसेक खोल्या होत्या मुला-मुलींच्या राहण्यासाठी आणि खालच्या मजल्यावर स्वयंपाकघर, त्याच्या शेजारीच जेवणाची मोठी खोली, त्याच्या बाजूला राधा काकू आणि तात्यांची खोली आणि त्याला लागून विजूच्या दोन खोल्या, त्यातल्या एका खोलीतच त्यांनी आपलं ऑफिस उघडलं होतं. राधाकाकूच सगळ्या मुलांसाठी स्वयंपाक करायच्या. तात्या आश्रमातली लहान-मोठी कामं बघायचे. तसं दोघांचंही वय झालं होतं. पण मुलाबाळांचा गोतावळा नव्हता, तेंव्हा ह्या अनाथ मुलांवरच दोघं प्रेमाची सावली धरायचे. विजूच्या वडिलांनी हा आश्रम सुरू केला होता. तिचं लग्न झालं तेंव्हा बाराच मुलं होती आश्रमात. सहा महिन्याच्या संसारानंतर तिला वैधव्य आलं. पदरात मूल-बाळ काही नव्हतं. विजूनं मग आश्रमालाच आपलं सर्वस्व मानलं. आज वीस वर्षानंतर पन्नासेक मुलांचा गोतावळा होता तिच्या आश्रमात. तसं तात्या आणि राधाकाकूंनी विजूला देखील अंगाखांद्यावर खेळवलं होतं. लहानपणीच आई गेली. राधाकाकू स्वयंपाकाला म्हणून घरी आली आणि घरचीच होऊन गेली. तात्या पण बाबांना सावलीसारखे चिकटले. बाबांचं मोठं दुकान होतं भांड्यांचं मंडईला लागून, अगदी मोक्याच्या ठिकाणी. तात्याच बघायचे सगळा कारभार. आईनंतर बाबांना जणू विरक्तीच आली होती, ते आणि त्यांचा आश्रम इतकंच त्यांचं आयुष्य झालं होतं. विजूला मात्र कधीच एकटेपणा भासू नाही दिला राधाकाकूनं. विजूचा संसार विखुरला तेंव्हा राधाकाकूच्या कुशीचाच तर आधार होता तिला. आश्रमात ती पहिल्यांदा आली तीदेखील काकूच्या आग्रहामुळं. आश्रमातल्या त्या लहानग्यांबरोबर खेळताना, त्यांची काळजी घेताना विजूला जाणवलं होतं की तिचं एकटेपणाचं दुःख ह्या मुलांच्या दुःखापुढे किती कस्पटासमान होतं. आईच्या कुशीची ऊब कधीच न अनुभवलेल्या त्या जीवांना आपल्या कुशीचा आधार देताना विजूला वेगळंच समाधान मिळायला लागलं. ती त्या मुलांच्या आयुष्यातली आईची पोकळी भरून काढू शकेल की नाही ह्याची खात्री नव्हती, पण लवकरच त्या सगळ्यांची लाडकी विजूमावशी बनून तिनं त्यांच्या आयुष्यात मायेची शिंपण नक्कीच केली होती. पूर्वी जेवा-झोपायला मात्र ती वाड्यावर परत जायची. पण बाबांच्या मृत्यूनंतर तिनं आश्रमालाच आपलं घर मानलं आणि मुक्काम इकडे हालवला. मागोमाग राधाकाकू आणि तात्या पण आले. जीव लावायला आश्रमातली पण चिल्ली-पिल्ली मिळाली काकूला. मागल्या वर्षी विजूनं दुकान विकलं, त्यानंतर आश्रमाचा वरचा मजला पण बांधून घेतला, नाही तरी इतक्या मुलांना अपुरीच पडत होती जागा, तात्या बांधकामावर लक्ष ठेवायला म्हणून आश्रमात थांबायला लागले आणि हळू-हळू त्यांनी पूर्ण वेळ आश्रमाचंच काम करायला सुरुवात केली.

आपल्या खोलीत बसून जुने-पुराणे अल्बम बघताना विजूच्या डोळ्यापुढून वीस वर्षे झरझर सरकत होती. कालच तिला राज्य सरकारकडून पत्र मिळालं होतं. तिच्या-राधाकाकू-तात्यांच्या-तिच्या बाबांच्या आश्रमाला सरकारकडून पुरस्कार मिळणार होता. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीच आश्रमाची शिफारस केली होती. महिन्यापूर्वी काही लोक येऊन तपासणीही करून गेले होते. मुलांच्या नीटनेटक्या आवरलेल्या खोल्या, त्यांचं सालस वागणं, अभ्यासातली-खेळातली प्रगती बघून ते लोकही भारावून गेले होते. त्यांच्या प्रतिक्रिया बघून विजूला खात्रीच होती की ह्या वर्षी त्यांच्या आश्रमाला हे बक्षीस मिळणारच! आणि अगदी तसंच झालंही होतं. पुढच्या महिन्यात मुंबईला पुरस्कार वितरण समारंभ होता आणि त्यासाठी अगत्याचं आमंत्रण द्यायला स्वतः पालकमंत्र्यांनी फोन केला होता. केवढा मोठा दिवस होता हा तिच्यासाठी. तिच्या कष्टांचं चीज झालं होतं. तशी पुरस्काराची रक्कम काही फार नव्हती, पण ह्या पुरस्कारानंतर आश्रमाला देणग्या तर मिळणारच होत्या पण झालेल्या बोलबाल्यामुळे कदाचित मुलांना दत्तक घेण्यासाठी बरीच कुटुंबं तिच्या आश्रमाचा विचारही करणार होती. मुलांचं भविष्य घडायला ह्या प्रसिद्धीनं हातभारच लागणार होता. ह्या मुलांच्या ओठावर हसू परतावं, ह्यापेक्षा विजूला तरी आणखी काय हवं होतं?

मुंबईला पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विजू आणि तात्या आले होते. राधाकाकूची पण खूप इच्छा होती यायची, पण मुलांना असं एकटं नोकरांच्या हवाली करून येणं तिला शक्य नव्हतं. कार्यक्रमाची जोरदार तयारी दिसत होती. राज्यातल्या किती तरी मोठमोठ्या संस्थांचे पदाधिकारी, कित्येक उद्योगपती, राजकारणातल्या मोठ्या असामींची तोबा गर्दी झाली होती. पालकमंत्र्यांचा सेक्रेटरी विजूची लोकांशी ओळख करून देत होता, तिच्या कामाबद्दल ऐकून ३-४ मोठ्या उद्योजकांनी लगेचच तिला देणग्यांचं आश्वासनही देऊन टाकलं होतं. अगदी तिला अपेक्षित असंच सगळं घडत होतं.

प्रत्यक्ष मानपत्र स्वीकारायला विजू तशी धडधडत्या हृदयानंच मंचावर गेली होती. स्वतः मुख्यमंत्र्यांनी तिची पाठ थोपटून तिला लागेल ती सगळी मदत करण्याचं आश्वासन दिलं. कधीही काहीही मदत लागली तर निःसंकोचपणे सांगण्याची विनंतीही केली. शेजारी उभ्या आपल्या सचिव गोखलेसाहेबांना तिचा फोन आल्यास लगेच आपल्याला कळवण्याची सूचना दिली. इतका मोठा माणूस, पण कुठेही मोठेपणाचा आव नाही की सत्तेचा गर्व नाही. विजूचं मन अगदी भरून आलं होतं. तितक्यात पालकमंत्रीही मंचावर आले आणि आश्रमाच्या वापरासाठी गावाबाहेरची मोठी जमीन सरकार देणगी देत असल्याची घोषणाही त्यांनी करून टाकली. सगळंच कसं स्वप्नवत होतं, आपलं हे कौतुक बघायला बाबा आणि काकू इथे हवे होते असं विजूला राहून राहून वाटत होतं. २-३ दिवस सरकारचा पाहुणचार घेऊन विजू आणि तात्या परतले ते आश्रमाचा विस्तार करण्याचा निर्धार करूनच.

साधारण महिना उलटला असावा आणि एक दिवस पालकमंत्र्यांचा पुन्हा फोन आला. "विजयाताई, बरेच दिवसांत आपले हालहवाल समजले नाहीत, म्हटलं एकदा भेटावं तुम्हाला. वेळ असेल तर चक्कर टाका एकदा बंगल्यावर. आमच्या सेक्रेटरीशी बोलून वेळ ठरवा आणि तात्यांना पण आणा बरोबर, तेवढीच त्यांचीही भेट होईल.. काय?" विजूनं नकार देण्याचा प्रश्नच नव्हता, २ दिवसानंतरचीच भेटीची वेळ मिळाली आणि विजू तात्यांबरोबर मंत्र्यांच्या बंगल्यावर आली. नेहमीप्रमाणे आजही तिथे बरीच वर्दळ दिसत होती. साहेब कुणाबरोबर तरी मीटिंगमध्ये होते म्हणून विजू आणि तात्यांना पाटलांनी, साहेबांच्या सेक्रेटरीने, हॉलमध्ये बसवलं होतं. स्वतः बाईसाहेब येऊन विजूची आणि आश्रमाची चौकशी करून गेल्या. लोक मोठे होते, पण वागणं अगदी साधं नि आपुलकीचं होतं. ५-१० मिनिटात आपली मीटिंग आटोपून साहेब स्वतःच आले. त्यांनीही आश्रमाची, मुलांची चौकशी केली. "मग विजयाताई, एकूण सगळं छान चाललंय तर. ह्या पुरस्कारानं आश्रमाची बरीच प्रसिद्धी झाली बघा. तुम्ही बऱ्याच नवीन नवीन योजना बनवत आहात विस्तारासाठी असं कळलं. चांगलं आहे, आमचा पाठिंबा आहेच तुम्हाला. बरं आम्ही काय विचारणार होतो.. त्या जागेचं काय करणार आहात तुम्ही. म्हणजे काय आहे, जागा बरीच मोठी आहे, चांगली मोठी इमारत बांधून घ्यावी तिथं आश्रमासाठी असा विचार होता, म्हटलं तुमच्याशी चर्चा करावी त्याबद्दल. म्हणून मुद्दाम बोलावलं. काय?" साहेबांचा आश्रमाबद्दलचा कळवळा बघून विजूचं मन भरून आलं होतं. "साहेब तुमची कल्पना चांगली आहे, पण अगदी गावतली मोक्याची जागा सोडून सध्या तरी आश्रम तिकडे हालवायचा विचार नाही केलेला. सध्याची जागा आम्हाला पुरेशी आहे, दिडेक वर्षापूर्वीच वरचा मजला चढवून घेतलाय, त्यामुळं जागेची तशी काही कमतरता नाही. शिवाय मुलांच्या शाळा जवळ आहेत, सगळंच कसं हाकेच्या अंतरावर आहे. आम्ही विचार करत होतो, त्या जागेवर सध्या तरी एखादं गोडाऊन बांधावं आणि भाड्यानं द्यावं, जकात नाक्यापासून वीसेक मिनिटावर आहे आणि ते पण गावाबाहेर, त्यामुळं गोडाऊनसाठी अगदी योग्य जागा आहे. म्हणजे, आश्रमासाठी कायमची कमाई होईल आणि जेव्हा गरज पडेल तेंव्हा बघू काय करायचं ते. हो ना तात्या?" तात्यांनीही तिच्या मताला दुजोरा दिला. साहेबांच्या कपाळावर मात्र आठी उमटल्यासारखं वाटलं विजूला. "विजयाताई, तुमची सध्याची जागा चांगली आहेच हो, पण ह्या जागेसमोर अगदीच छोटी आहे, नाही का? मी म्हणतो, तुम्ही ती जागा विकून टाका, सोन्याचा भाव येईल त्या जागेचा, आम्ही मिळवून देऊ ग्राहक जागेला, तुम्ही फक्त हो म्हणा. अहो त्या पैशात ह्यापेक्षा कितीतरी मोठा आश्रम बांधू शकाल तुम्ही ह्या नव्या जागेत." साहेबांचं म्हणणं तसं बरोबर होतं. "पण साहेब ती जागा गावाबाहेर आहे, जवळपास ना शाळा आहेत, ना इतर सोयी. साधा किराणा घ्यायचा तरी ५-७ किलोमीटरची पायपीट करावी लागेल. शिवाय लाइट-पाण्याची चांगली सोयही नाही. महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर आहे त्यामुळं रस्तेही यथातथाच आहेत. तेंव्हा सध्या तरी सोयीस्कर नाही ती जागा आमच्यासाठी." साहेबांच्या कपाळावरची आठी आता मात्र अगदीच स्पष्ट दिसायला लागली होती. "विजयाताई, स्पष्टच बोलतो. तुमची सध्याची जागा आम्हाला हवी आहे, मंदिराला लागून एवढी चांगली जागा आश्रमासाठी फुकट घालवण्यात आम्हाला रस नाही. एवढं मोठं शहर आपलं, हजारो लोक येतात देवीच्या दर्शनाला, पण एकही फाइवस्टार हॉटेल नसावं इथं, आमच्यासाठी नामुष्कीची बाब आहे. तुमची जागा त्यासाठी अगदी योग्य आहे. ती आम्हाला विका, सध्याच्या भावापेक्षा चढा भाव तुम्हाला मिळेल ह्याची मी खात्री देतो. तुमचं नवीन आश्रम आमचा बिल्डर निम्म्या किंमतींत बांधून देईल, पण ही जागा आम्हाला हवी आहे. आम्ही तुमच्यासाठी इतकं केलं, तुम्ही आमचं हे काम करावं अशी विनंती आहे." विजूचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ‘जागा आश्रमासाठी फुकट जातेय’ आश्रमाचं भरभरून कौतुक करणारे ते हेच साहेब का? ही जागा सोडून गावाबाहेरच्या ओसाड माळावर आश्रम हालवायचा.. मुलांचं कसं होणार? त्यांच्या शाळा, क्लासेस, खेळाचं मैदान सगळंच इथं जवळ होतं. नोकर-चाकर मिळणंही सोपं होतं, मंडई तर ५ मिनिटांच्या अंतरावर होती. नाही, इथून आश्रम हालवणं शक्य नव्हतं. "नाही साहेब, मला ते जमणार नाही." विजूनं ठामपणे सांगितलं. "विजयाताई, अहो विनंती केली होती आम्ही आणि तुम्ही इतक्या निर्दयतेनं नाकारलीत. हे चांगलं नाही विजयाताई. तुम्ही म्हणजे आमच्यासाठी सगळे मार्गच बंद केलेत की. पण आम्हाला ती जागा हवी आहे, तेंव्हा नवीन मार्ग शोधावाच लागेल. कसं? पाटील, जरा ती फाइल आणा इकडं. हे बघा विजयाताई. महाराजांनी ही इमारत तुमच्या आजोबांना दिली होती. बरोबर ना? पण कागदोपत्री अजूनही महाराजांच्या वंशजांचाच मालकी हक्क आहे हो तिथं. आता तुम्ही तिथं वर्षानुवर्ष ठाण मांडून बसला आहात, कूळ कायद्यानुसार तुमचाच हक्क आहे त्या जागेवर, पण काय आहे आमचे वकीलही चांगले आहेत आणि सरकारी कागदपत्रात फेरफार करणं आम्हाला सहज शक्य आहे तेंव्हा ती जागा आम्ही कधीही हिसकावून घेऊ शकतो तुमच्याकडून. आता असं करण्यात आम्हाला काडीचाही रस नाही, तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे देऊनच ती जागा आम्हाला विकत घ्यायची आहे. पण तुम्ही सगळं अवघड करून ठेवताय ना आमच्यासाठी. ही फाइल ठेवा तुमच्याजवळ, शांतपणे वाचा आणि तुमचा निर्णय कळवा आम्हाला. तशी काही घाई नाही, पण हे काम लवकर हातावेगळं झालेलं बरं, तेंव्हा २ दिवसांत फोन करतील पाटील तुम्हाला, काय पाटील? चला, आम्ही निघतो, कार्यकारिणीच्या मीटिंगला जायचं आहे. पाटील, ह्यांच्या चहापाण्याचं बघा, पाहुणचार घेतल्याशिवाय जाऊ नका देऊ, तुमच्या वैनीना सांगा आमचा निरोप आहे. काय? येतो विजयाताई." विजूचा पारा साहेबांच्या प्रत्येक वाक्यागणिक चढत होता, पण इथे आपण संतापून काहीही उपयोग नाही हे ही तिला चांगलं माहीत होतं. तात्यांचा गोरापान चेहरादेखील रागानं लालबुंद झाला होता. तिनं हलकाच त्यांचा हात दाबला आणि त्यांना काही न बोलण्याची खूण केली. साहेब जसे गडबडीत आले होते तसेच लगबगीनं निघूनही गेले.

त्या भेटीनंतर विजूला खरं तर काही सुचेनासं झालं होतं. तसा मंत्रीसाहेबांनी तिच्यापुढे दुसरा कोणताच पर्याय शिल्लक ठेवला नव्हता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणं नाही वागलं तर सगळं होत्याचं नव्हतं होणार होतं आणि ती पोकळ धमकी नाही ह्याची तिला चांगलीच कल्पना होती. राजकारण म्हणजे काय आणि राजकारणी काय चीज असतात हे तिला आता समजत होतं. विचार करून तिचं डोकं शिणून गेलं होतं. राधाकाकू आणि तात्यादेखील काहीच बोलत नव्हते. गोखले.. मुख्यमंत्र्यांचे सचिव. हो! फक्त गोखलेच आता तिची मदत करू शकत होते. साहेब मुख्यमंत्र्यांचा शब्द मोडणार नाहीत ह्याची विजूला खात्री होती आणि मुख्यमंत्रीसाहेबांसारखा माणूस तिच्यावर, तिच्या मुलांवर हा अन्याय होऊ देणार नाही असा विश्वासदेखील!

दुसऱ्यादिवशी सकाळीच विजूने गोखल्यांना फोन लावला. "नमस्कार साहेब. मी विजया दाते. आपण पुरस्कार सोहळ्यात भेटलो होतो. आमच्या आश्रमाला.." तिला मध्येच तोडत गोखले म्हणाले, "अरे वा विजयाताई. अहो ओळखलं मी तुम्हाला. साहेबांची ताकीद असल्यावर तुम्हाला विसरून कसं चालेल. बोला. काय काम काढलंत?" गोखल्यांचे ते उद्गार ऐकून विजूची खात्रीच पटली की आता आश्रमाला कुणीच धक्का नाही लावू शकणार. "साहेब, मुख्यमंत्रीसाहेबांची थोडी मदत हवी होती. आश्रमाचंच काम होतं, पण जरा अर्जंट आहे." तिनं आपल्या भेटीचा इत्थंभूत वृत्तांत गोखल्यांना ऐकवला. "विजयाताई, एक गोष्ट सांगतो, राग मानू नका. अहो, एवढी चांगली ऑफर दिली आहे तुम्हाला, घेऊन टाका. कशाला सापाच्या शेपटीवर पाय ठेवता?" विजूला गोखल्यांचा रागच आला. "गोखलेसाहेब, तुम्ही तुमच्या साहेबांच्या कानावर ही गोष्ट घालावी म्हणून फोन केला मी. तुमचे अनाहूत सल्ले ऐकायला नव्हे. मला साहेबांशी बोलायचं आहे, त्याची व्यवस्था तुम्हाला करता येईल का ते सांगा." "विजयाताई, तशी व्यवस्था मी करेन हो. पण खरं सांगतो, त्याचा काहीच उपयोग नाही. आमच्या साहेबांचा मुलगा बिल्डर आहे माहीत असेलच तुम्हाला, आता हॉटेलसारखं मोठं काम साहेबांच्या राज्यात त्यांच्या मुलाला नाही तर कुणाला मिळणार, तुम्हीच सांगा? आणि तसा हा प्रोजेक्ट बराच मोठा आहे हो. आणखीही काही बड्या असामी गुंतल्या आहेत त्यात. ह्या सगळ्या लोकांसमोर तुमचा निभाव लागेल असं वाटतं तुम्हाला? उगाच नसत्या भानगडीत पडू नका. आणि एक आतल्या गोटातली बातमी सांगतो, तुमचे पालकमंत्री तुमची जागा अशीच काढून घेणार होते, पण आमच्या साहेबांनी मात्र तुम्हाला योग्य मोबदला दिल्याशिवाय आश्रमाला हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद दिली आहे सगळ्यांना. पण तुम्ही जर असंच वागणार असाल तर साहेब तरी काय करणार सांगा? म्हणून म्हणतो, उगाच नाही त्या भानगडीत पडू नका, अहो नुकसान तुमचंच आहे. मी तुमच्या हितचिंतकाच्या नात्यानं सांगतो. माझं ऐका. मला पुन्हा फोन करा तुम्हाला साहेबांशी बोलायचंच असेल तर. अच्छा! बोलू नंतर." 

गोखल्यांचं बोलणं ऐकून विजू बसल्या जागी थरथरत होती. संतापानं.. अविश्वासानं.. विश्वासघाताच्या जाणीवेनं.. अगतिकतेनं की आणखी काही माहीत नाही. तिचं डोकं भणभणत होतं. भारावल्यासारखा तिनं फोन बंद केला, पाच मिनिट डोळे मिटून काही तरी विचार केला आणि रिसीव्हर उचलून पालकमंत्र्यांचा नंबर फिरवला.

(समाप्त)