Thursday, October 27, 2016

सुनिता(२)

(manogat.com वर पूर्वप्रकाशित)
आज पुन्हा तो ऒफिसला दांडी मारणार होता!! पुढे...
प्रवीण जसा घराबाहेर पडला तसा सुनिताचं अवसान गळून पडलं. कितीतरी वेळ ती रडत होती. "पुढे काय?" हा एकच विचार तिला सारखा सतावत होता. आई-बाबांना तर प्रवीणबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यांना कसं सांगायचं सगळं हेच तिला कळत नव्हतं. प्रवीणला सोडून ती परत गेली तर काय होईल ह्या विचारांनी तिचं डोकं भणभणायला लागलं. घटस्फोटितेचं जीणं जगणं किती अवघड असतं  हे तिनं पाहिलं होतं. शेजारच्या बंगल्यातल्या जोशीमावशींबद्दल लोक किती गरळ ओकत, त्यांच्याबद्दल नाही नाही ते बोलत. आज मावशींच्या जागी ती स्वतःला ठेवून बघत होती. लोकांच्या नसत्या प्रश्नांना उत्तरं देण्याची ताकद तिच्या ठायी नक्कीच नव्हती. परत जाऊन बाबांवर बोझ बनून रहाणं तिला नको होतं, पण चांगली नोकरी मिळावी अशी तिची शैक्षणिक पात्रता नव्हती, शिवाय कामाचा काही अनुभवही नव्हता. अजून मधूचं लग्न व्हायचं होतं. आपल्यामुळे त्यात काही विघ्न आलं तर, ह्या विचारानं ती आणखीनच अस्वस्थ झाली. पुढे सगळा अंधार दिसत होता, मन मोकळं करावं असंही कुणी जवळपास नव्हतं. आता तिला एकाच गोष्टीचा आधार वाटत होता, मधू उच्चशिक्षणासाठी लवकरच अमेरिकेत येणार होती. सुनितापासून २ तासाच्या अंतरावर मधूचे कॊलेज होते. पण त्यालासुद्धा महिनाभर अवकाश होता. तोपर्यंत सुनिताला सगळं एकटयानंच झेलायचं होतं.
"वेदा, आज मी सुनिताला सांगून टाकलं आपल्याबद्दल. तिला घटस्फोट देण्याचं ठरवलं आहे मी. पण वेदा, ती नाही म्हणते गं घटस्फोट देणार. खरंच ती तयार नाही झाली तर काय करायचं आपण?" प्रवीण खरंच काळजीत होता. खूप व्याकूळ होऊन तो वेदासमोर आपली कैफियत मांडत होता. पण त्याचं सगळं गाऱ्हाणं ऐकूनही वेदाच्या चेहऱ्यावर तीच नेहमीची बेफिकिरी दिसत होती. तिच्या त्या बेदरकार वृत्तीवरच तर प्रवीण फिदा झाला होता. जीन्सची शॊर्ट आणि टॅंक टॊप घातलेली वेदा त्याच्या शेजारी लवंडून मस्तपैकी सिगारेटचे झुरके घेत होती. "सोड ना यार प्रवीण.. का चिंता करतो तिची? Sooner or later she will give in. Mental torture hurts thousand times more than physical torture. किती दिवस सहन करेल ती तुझं हे कोरडं वागणं? आज ना उद्या ती आपणहून तयार होईल घटस्फोटाला. But promise me one thing, you will not hit her again… ever! हा वेडेपणा तुला महागात पडेल प्रवीण. घटस्फोट तुझ्या चुकीमुळे होतो आहे हे ती सिद्ध करु शकली ना कोर्टात तर तुला huge settlement द्यावी लागेल. We cannot afford to do that, sweetheart!! So, just take it easy!" वेदाने शांतपणे प्रवीणला पुढचा प्लॅन समजाऊन सांगितला. प्रवीणला आता बरंच हलकं वाटत होतं. त्यानंतर किती तरी वेळ ते दोघे एकमेकांच्या कुशीत शिरुन गप्पा मारत होते.
त्या दिवसानंतर मात्र प्रवीणचे वागणे बदलूनच गेले. काही ना काही कारण काढून तो सुनिताशी वाद घालायला लागला. कधी लाइट बिल जास्त का आलं म्हणून तर कधी चहा थंड का दिला म्हणून. कधी घर किती पसरलंय म्हणून तर कधी आणखी काही. सुनिताचं जीणं मुष्किल करायचं ठरवूनच टाकलं होतं त्यानं. त्याच्या प्रत्येक वादाचा शेवट आताशा "घटस्फोट" ह्या शब्दानं होत होता. पण सुनिता शांतपणे सगळं सहन करत होती. मधूचं येणं प्रत्येक दिवसागणिक जवळ येत होतं. कधी एकदा ती येते आणि आपण आपलं मन तिच्याजवळ मोकळं करतो असं झालं होतं सुनिताला.
सुनिताला रात्रभर झोप लागली नव्हती. कधी एकदा पहाट होते आणि आपण मधूला भेटतो असं झालं होतं तिला. प्रवीणच्या बाबांनी दम दिल्यामुळे असेल कदाचित, पण तो मधूला एअरपोर्टवर न्यायला जाण्यास तयार झाला होता.
"जवळपास नऊ-साडे नऊ महिन्यांनी ताई भेटणार नाही मला!" मधू खूष होती. अमेरिकेत जाऊन स्थापत्यशास्त्रात संशोधन करायचं तिचं स्वप्न सत्यात उतरत होतं. बाबा खरं तर तयारच नव्हते तिला इतक्या दूर पाठवायला. खरं तर तिच्या लग्नाची बोलणीसुद्धा सुरु केली होती त्यांनी. पण ताई आणि आईच्या हट्टापुढं त्यांना हात टेकावे लागले होते. मधू अपरिचित देशात जात होती, पण तिला अजिबात धास्ती वाटत नव्हती. ताई-भाऊजी होतेच की तिची काळजी घ्यायला. आई-बाबांच्या प्रेमळ छत्रातून बाहेर पडून ती ताई आणि भाऊजींच्या आश्वस्त छायेखाली जाणार होती. किती सोपा होता हा प्रवास!!
मधू जेव्हा बाहेर पडली तेव्हा ताईचं ते बदललेलं रुप समोर बघून तिचा डोळ्यावर विश्वासच बसेना. सुनिताच्या डोळ्यातली विषण्णता मधूला अस्वस्थ करत होती. प्रवीणनं तर तिची एका शब्दानंही चौकशी केली नव्हती. कुठे तरी काही तरी चुकत होतं. कधी एकदा आपण घरी जातो आणि ताईशी एकांतात बोलतो असं वाटत होतं तिला.
मधू आणि सुनिताला घरी सोडून प्रवीण ऒफिसला निघून गेला. सुनिता मधूसाठी नाश्ताच्या तयारीला लागली. खरं तर २४ तासाच्या प्रवासानं मधूलाही शिणायला झालं होतं, पण सुनिताचा निस्तेज चेहरा बघून तिला राहवेना. सुनिताचा हात धरून तिला सोफ्यावर बसवत ती म्हणाली "ताई काय अवस्था करून घेतली आहेस तू स्वतःची. चेहरा ओढल्यासारखा दिसतोय, डोळ्याखाली काळवंडलंय, आजारी दिसायला लागली आहेस? काय झालंय तुला नेमकं? घरची, आई-बाबांची आठवण येते का? की घरी एकटी कंटाळतेस म्हणून असं होतंय. तू पुन्हा चित्रं का नाही काढत. शेजाऱ्यांशी ऒळखी करून घे, तेवढाच वेळ जाईल ना गप्पाटप्पात!! आणि फारच कंटाळा आला तर सरळ भाऊजींना फोन करत जा घरी येऊन काम करा म्हणून… ते काय तुझ्या आज्ञेतच असतील की!!" असं म्हणत तिनं खट्याळपणे हसून ताईकडं पाहिलं, सुनिताचे डोळे पाण्यानं डबडबले होते. सुनिता लाजेल, खोटं चिडून एखादा गुद्दाही घालेल पाठीत अशी मधूची अपेक्षा होती. पण ताई रडत होती. तिचं काही तरी बिनसलं होतं हे नक्की. मधूचा हात हातात घेऊन कितीतरी वेळ सुनिता रडत होती आणि मधू तिची शांत होण्याची वाट पाहात तिच्या डोक्यावरुन हात फिरवत होती. असा किती वेळ गेला कोण जाणे! पण सुनिताला बरंच हलकं वाटत होती. तिच्या जीवाभावाचं कुणीतरी इतक्या दिवसांनी भेटत होतं, कुणाचा तरी आपुलकीचा हात तिच्या हातात होता, कुणीतरी प्रेमानं तिला कुरवळत होतं. त्यानंतर किती तरी वेळ ती बोलत होती आणि मधू सुन्न होऊन ऐकत होती. तिच्या साध्या भोळ्या ताईवर झालेला अन्याय ऐकून तिचा संताप अनावर होत होता. पण "पुढे काय?"चं उत्तर तिलासुद्धा उमगत नव्हतं. आई-बाबांना लवकरात लवकर ह्या सगळ्याची कल्पना द्यायला हवी होती. ताईनं एकटीनं हे कसं झेललं असेल ह्या विचारानं तिला गलबलून आलं. सुनिताला जवळ घेऊन ती बराच वेळ तिला थोपटत होती. दोघींना जेवणाचीदेखील शुद्ध राहिली नव्हती.
"आई मी मधू. सकाळीच पोचले ताईकडे. अगं खूप दमले होते म्हणून फोन नाही केला पोचल्या पोचल्या. तुम्ही पण झोपला असाल म्हणून म्हटलं रात्रीच बोलावं. आई, बाबांना दे ना फोन." मधू शब्दांची जुळवाजुळव करत होती. नेमकं कसं सांगायचं ताई आणि भाऊजींबद्दल? "बाबा, तुम्हाला काही तरी सांगायाचं होतं.. नाही मी ठीक आहे. नाही रडत नाही आहे. बाबा… ताई.. नाही हो. तिची तब्येत बरी आहे. बाबा, भाऊजींचं दुस~या कुठल्या तरी मुलीवर प्रेम आहे हो.. आणि आपल्याला त्रास नको म्हणून ताई काही बोललीच नाही इतके दिवस." बाबांच्या पायाखालची जमिन सरकलेली तिला इथे इतक्या दूरही जाणवत होतं. नंतर बराच वेळ मधू बाबांना सगळी हकिगत सांगत होती.
"सुनि, तू कधी इतकी मोठी झालीस की आम्ही परके झालो तुझ्यासाठी?" बाबांचा आवाज कापत होता. "बाळा हे सगळं कसं गं झेललंस एकटीनं? कधी हुं हा चूं नाही केलंस? आणि आम्हाला पण कसं नाही कळलं तू काही तरी लपवते आहेस ते? इतक्या दूर गेलीस म्हणून कंटाळत असशील असंच वाटायचं नेहमी. कसला गं बाप मी? तुझे अश्रू पण नाही पुसू शकलो मी." सुनिताचे हुंदके त्यांना अस्वस्थ करत होते. जिच्यावर हात उगारायचा तर दूरच, त्यांनी आवाज पण चढवला नव्हता तिच्यावर प्रवीणने हात उगारला हे ऐकून त्यांना संताप आवरत नव्हता. प्रवीणने तर त्यांची फसवणूक केली होतीच, पण त्याच्या आईवडिलांनीही त्यांचा घात केला होता. प्रवीणच्या प्रेमप्रकरणाबद्दल लपवून त्यांनी सुनिताचं आयुष्य उध्वस्त हेलं होतं. फोन झाल्या झाल्या बाबा प्रवीणच्या घरी गेले. प्रवीणच्या बाबांनी नेहमीप्रमाणे हसून त्यांचे स्वागत केले, पण आज काही तरी बिनसलेय हे त्यांच्याही लक्षात आलं होतं. बाबांनी लगेचच विषयाला हात घातला. "दादासाहेब, तुम्ही हे बरं केलं नाही. माझ्या सोन्यासारख्या लेकीला आगीत लोटलंत. प्रवीणला आता घटस्फोट हवा आहे, तो घटस्फोट देऊन नामानिराळा होईल, पण माझ्या मुलीला जन्मभर परित्यक्तेचा डाग लागेल. समाज कशाला विचारतोय चूक कुणाची होती म्हणून. सगळे बाईलाच दोष देणार. तुम्ही असं करायला नको होतं दादासाहेब. सुसंस्कृत लोकांना हे असलं वागणं नाही शोभत." दादासाहेब मान खाली घालून सगळं ऐकत होते, पोटच्या पोरानंच त्यांचा केसानं गळा कापला होता.
त्यानंतर कित्येक दिवस दादासाहेब रोज प्रवीणशी बोलत होते. आईनंही प्रवीणला समजावून पाहिलं. दरडावून झालं. अगदी जीव देण्याची धमकीही देऊन झाली, पण प्रवीण बधत नव्हता. वेदाशिवाय त्याला दुसरे काहीच सुचत नव्हते. आताशा तर तो रात्री घरी येणंसुद्धा टाळत होता. मधू पण तिच्या कॊलेजच्या गावी गेली होती. सुनिता पुन्हा एकटी पडली होती. रोज संध्याकाळी मधूशी बोलणं हाच एक विरंगुळा होता तिच्यासाठी. तिला एका गोष्टीचं मात्र राहून राहून आश्चर्य वाटत होतं, हल्ली प्रवीण एका अक्षरानंदेखील घटस्फोटाचा विषय काढत नव्हता. घरी तसा तो क्वचितच यायचा, पण आला तरी पूर्वीसारखी भांडणं होत नव्हती. तो सारखा विचारात गर्क असायचा, कुठल्या तरी चिंतेनं त्याला ग्रासलं होतं. कित्येकदा मनात येऊन देखील सुनितानं त्याला कधी त्याबाबत काही विचारलं नाही आणि त्यानंसुद्धा आपणहून कधीच काही सांगितलं नाही.
दिवसांमागून दिवस उलटत होते. वेदाबद्दल सुनिताला समजलं त्या गोष्टीला १ वर्ष उलटून गेलं. मधल्या काळात सुनिता बरीच सावरली होती. ती रोज वाचनालयात जायला लागली होती. जवळच्याच कम्युनिटी कॊलेजमध्ये तिने इंग्रजीचे धडे घेतले आणि आता तिने इंटिरियरच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. त्यांच्याच कॊलनीत राहणाऱ्या २-३ भारतीय मुली तिच्या परिचयाच्या झाल्या होत्या. पूर्वीइतका एकटेपणा आता तिला जाणवत नव्हता. आई-बाबांनी कितीदा तरी आर्जवं केली होती, पण सुनिता भारतात परत जायला तयार नव्हती. परत गेल्यावर लोकांनी केलेल्या चांभार चौकश्या तिला नको होत्या. शिवाय आता तिला स्वतःच्या पायावरही उभं राहायचं होतं. ह्या सगळ्यापेक्षाही महत्त्वाचे कारण काही तरी वेगळंच होतं. प्रवीण आज ना उद्या बदलेल, त्याला उपरती होईल आणि तो आपल्याकडे परत येईल असा विश्वास तिला वाटत होता. "मी कुणाचं काय वाईट केलंय की देव माझं असं वाईट करेल? बघच तू, प्रवीण नक्की बदलेल." मधूला तिने कित्येकदा सांगितलं होतं. मधूच्या विरोधाचा, आई-बाबांच्या आग्रहाचा तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता.
गेले दोन दिवस प्रवीण चक्क घरी होता. वेदाकडे जाणं तर सोडाच तो ऒफिसला पण गेला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरुन काही तरी वाईट घडल्याचं सुनिताच्या लक्षात आलं होतं, पण त्याच्याशी बोलण्याचा काही प्रश्नच उद्भवत नव्हता. "सुनिता, मला तुझ्याशी काही तरी बोलायचंय" किती तरी महिन्यांनी प्रवीण आज सुनिताशी बोलत होता. "महत्त्वाचं आहे. तुला वेळ आहे आत्ता?" "बोल" तुटकपणे सुनिताने संमती दिली. "सुनिता माझी नोकरी गेली. मला २ दिवसांपूर्वीच समजलं त्यांनी मला काढून टाकल्याचं. मी खूप प्रयत्न केला, पण ते मला एकही संधी द्यायला तयार नाहीत. माझं ग्रीन कार्ड यायला फक्त वर्षभर राहिलेय, आत्ता नोकरी जाणं म्हणजे सगळं पुन्हा नव्यानं सुरु होणार. मी त्यांना विनंती करणार आहे, निदान मला पे-रोलवर तरी ठेवा म्हणून, एवढं ग्रीन कार्ड होऊ दे, मग खुशाल माझं नाव काढून टाकू देत. पण त्यांनी मान्य जरी केलं तरी आता इथे राहणं शक्य नाही मला, माझ्या मित्रांना काय सांगणार मी? किती नामुष्कीची गोष्ट आहे ही अशी नोकरी जाणं म्हणजे." प्रवीणच्या डोळ्यात पाणी तरारलेलं सुनिताला दिसत होतं, त्याला जवळ घ्यावं, त्याला कुरवळावं, त्याला सांगावं की सगळं जग तरी तुझ्या विरोधात गेलं तरी मी आहे तुझ्याबरोबर, सुनिताला अगदी गलबलून येत होतं. किती प्रयासानं ती गप्प राहिली होती. "मी ठरवलंय, आपण आता इथं नाही रहायचं, आपण राधाकडे जाऊ. जिजाजींच्या ओळखीनं मला नक्की कुठे ना कुठे नोकरी मिळेल, पण अगदी नाही जरी मिळाली तरी निदान घरभाड्याचा खर्च वाचेल. राधाचं एवढं मोठ्ठं घर आहे, मी आजच बोलतो तिच्याशी, १५ दिवसांत इथलं सगळं आवरुन जाऊ आपण तिकडे." प्रवीणचं बोलणं ऐकून सुनिताला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. राधाकडं जायचं, हे गाव सोडायचं, म्हणजे प्रवीण वेदापासून दूर जाणार तर… तिच्या विरहाच्या कल्पनेनं व्याकुळ होणारा प्रवीण आज इतका मोठा निर्णय घ्यायला तयार आहे, म्हणजे नक्कीच त्यांचं काही तरी बिनसलं असावं, मी सांगत होतेच मधूला, हे आज ना उद्या होणार होतंच. सुनितानं प्रवीणच्या ह्या निर्णयाला आनंदानं मान्यता दिली. मधूनं जरा कटकट केली, राधाचं गाव अमेरिकेच्या दुस~या टोकाला होतं, इथे मधू दीड-दोन तासाच्या अंतरावर होती, त्यामुळे गरज पडली तर पटकन भेटणं शक्य होतं. पण सुनिता खूष होती. १५ दिवस तसे गडबडीतच गेले. मध्ये २ दिवस मधूही येऊन गेली. तीसुद्धा प्रवीणचं बदललेलं वागणं बघून अचंबित झाली होती. प्रवीण त्या १५ दिवसात फारसा घराबाहेर पडला नव्हता, सुनिताला घर आवरायला मदत करत होता, मधूशी देखील तो खूपच आपुलकीनं वागला, सामान आवरताना त्यानं थोडी पुस्तकंही तिच्यासाठी बाजूला काढून ठेवली होती. साशंक मनानं आलेली मधू परत जाताना मात्र अगदी निश्चिंत होती. ताईच्या प्रार्थनेला शेवटी यश आलं होतं.
थोड्याच दिवसात सगळा बाडबिस्तारा गुंडाळून प्रवीण आणि सुनिता राधाच्या घरी मुक्कामाला आले. प्रवीणचा बराचसा वेळ कॊंम्प्युटरवर काही तरी काम करण्यात अगर नवीन नोकरी शोधण्यात जात होता. सुनिताशी भांडणं तर केव्हाच बंद झाली होती. हल्ली मूडमध्ये असेल तर तो सुनिताशी गप्पाही मारायचा. इतक्या दूर, शिवाय परक्याच्या घरी असल्यामुळे सुनिताचं मधूशी फारसं बोलणं होत नव्हतं. राधाला तिच्या स्वयंपाकघरात कुणी मध्ये मध्ये केलेलं आवडत नसे, त्यामुळे वेळ कसा काढायचा हा मोठा प्रश्न सुनितापुढे होता. टीव्ही, वाचन, इंटिरियरच्या वह्या चाळून काही तरी आपणहून करणं ह्यात थोडा वेळ निघून जाई, पण त्यानंतर मात्र तिला घर खायला उठत होतं. अशात राधाचा छोटुला शुभम मात्र तिच्यासाठी मोठा विरंगुळा होता. हल्ली ‘मामी, मामी’ करत तो दिवसभर तिच्या मागून फिरत असे. पण राधाला बहुदा तेही खटकत होतं. पहिले काही दिवस ती खूपच आतिथ्यानं वागत होती, पण महिन्या-दीड महिन्यानंतर तिच्या वागण्यात बदल जाणवायला लागला. जिजाजींच्या बोचऱ्या नजरा प्रवीणलासुद्धा जाणवत होत्या. इथे फार दिवस राहण्यात काही अर्थ नाही हे त्या दोघांनाही उमगले होते. प्रवीणचे नोकरीसाठी प्रयत्न सुरुच होते. त्यात घर हुडकण्याची भर पडली.
ह्या नवीन गावी येऊन त्यांना ४ महिने होत आले होते. आठवड्याभरापूर्वीच प्रवीण आणि सुनिता त्यांच्या घरात रहायला आले होते. प्रवीणची नोकरी नसताना हे घर खरं तर त्यांना परवडण्यासारखं नव्हतं, पण दुसरा काही उपायही नव्हता. राधा आणि जिजाजींच्या कोरड्या वागण्याचा प्रवीणला फारच त्रास झाला होता. "सुनिता, ह्या जगात कुणी कुणाचं नाही बघ. माझ्या सख्ख्या बहिणीला माझं ओझं वाटतंय तर इतर कुणाकडून मी काय अपेक्षा ठेवायची?" प्रवीण ह्या सगळ्या प्रकरणाला फारच उबला होता. पण ह्या सगळ्या प्रकारानं का होईना, त्या दोघातला संवाद बराच वाढला होता. रोज जेवणाच्या टेबलावर दोघे कितीतरी वेळ बोलत असत. दिवसा मागून दिवस जात होते पण प्रवीणला नोकरी मिळत नव्हती. सुनितानं ह्याच दरम्यान एका भारतीय किराणा दुकानात नोकरी सुरु केली. बराचसा घरखर्च त्यातून भागत होता पण शिल्लक काहीच पडत नव्हती. एक दिवस ती दुकानातून घरी आली आणि तिला अश्चर्याचा धक्काच बसला. प्रवीण तिच्यासाठी केक घेऊन आला होता, तिचा वाढदिवस त्याच्या लक्षात होता तर. सुनिताच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहायला लागले. प्रवीणनं तिला जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. किती तरी वेळ दोघेही अश्रूंना वाट मोकळी करुन देत जुन्या कटु आठवणींना जणू तिलांजली वाहात होते. किती दिवस वाट पाहिली होती या दिवसाची सुनितानं!! ३ वर्षांपासून जे स्वप्न ती दिवस-रात्र बघत होती त्याची पूर्तता होताना दिसत होती. आज पहिल्यांदाच तिने प्रवीणच्या डोळ्यात तिच्यासाठी प्रेम पाहिले होते. हा क्षण संपूच नये असं तिला वाटत होतं. प्रवीणच्या बाहुपाशात तिला असंच जन्मभर रहायचं होतं. प्रवीणची मिठी तिच्याभोवती आणखी घट्ट होत होती. तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकले…
शेवटी ३ वर्षांच्या विरहानंतर सुनिताच्या आयुष्यात मधुचंद्राची ती गुलाबी रात्र आज आली होती
(क्रमशः)

No comments: