(manogat.com वर पूर्वप्रकाशित)
एका छोट्याश्या गावातली ही गोष्ट. गाव तसं आट-पाट, गावाला वळसा घालून गेलेली नदी. गावाच्या एका बाजूला सह्याद्रीच्या लांबच लांब रांगा. गावाच्या दक्षिणेला शिवरायांचा चरणस्पर्श लाभलेला खडा किल्ला. गावात देवीचं मोठं मंदिर. अगदी कुणालाही हेवा वाटावा, असं ते गाव!!
ह्या मंदिराच्या शेजारीच एका जुनाट इमारत होती. विजूचे आजोबा दरबारात कारभारी होते, तेंव्हा गावच्या महाराजांनी दिली होती म्हणे ती इमारत त्यांना. सध्या अनाथाश्रम होता तिथं. त्या दुमजली इमारतीत वरच्या दोन मजल्यांवर वीसेक खोल्या होत्या मुला-मुलींच्या राहण्यासाठी आणि खालच्या मजल्यावर स्वयंपाकघर, त्याच्या शेजारीच जेवणाची मोठी खोली, त्याच्या बाजूला राधा काकू आणि तात्यांची खोली आणि त्याला लागून विजूच्या दोन खोल्या, त्यातल्या एका खोलीतच त्यांनी आपलं ऑफिस उघडलं होतं. राधाकाकूच सगळ्या मुलांसाठी स्वयंपाक करायच्या. तात्या आश्रमातली लहान-मोठी कामं बघायचे. तसं दोघांचंही वय झालं होतं. पण मुलाबाळांचा गोतावळा नव्हता, तेंव्हा ह्या अनाथ मुलांवरच दोघं प्रेमाची सावली धरायचे. विजूच्या वडिलांनी हा आश्रम सुरू केला होता. तिचं लग्न झालं तेंव्हा बाराच मुलं होती आश्रमात. सहा महिन्याच्या संसारानंतर तिला वैधव्य आलं. पदरात मूल-बाळ काही नव्हतं. विजूनं मग आश्रमालाच आपलं सर्वस्व मानलं. आज वीस वर्षानंतर पन्नासेक मुलांचा गोतावळा होता तिच्या आश्रमात. तसं तात्या आणि राधाकाकूंनी विजूला देखील अंगाखांद्यावर खेळवलं होतं. लहानपणीच आई गेली. राधाकाकू स्वयंपाकाला म्हणून घरी आली आणि घरचीच होऊन गेली. तात्या पण बाबांना सावलीसारखे चिकटले. बाबांचं मोठं दुकान होतं भांड्यांचं मंडईला लागून, अगदी मोक्याच्या ठिकाणी. तात्याच बघायचे सगळा कारभार. आईनंतर बाबांना जणू विरक्तीच आली होती, ते आणि त्यांचा आश्रम इतकंच त्यांचं आयुष्य झालं होतं. विजूला मात्र कधीच एकटेपणा भासू नाही दिला राधाकाकूनं. विजूचा संसार विखुरला तेंव्हा राधाकाकूच्या कुशीचाच तर आधार होता तिला. आश्रमात ती पहिल्यांदा आली तीदेखील काकूच्या आग्रहामुळं. आश्रमातल्या त्या लहानग्यांबरोबर खेळताना, त्यांची काळजी घेताना विजूला जाणवलं होतं की तिचं एकटेपणाचं दुःख ह्या मुलांच्या दुःखापुढे किती कस्पटासमान होतं. आईच्या कुशीची ऊब कधीच न अनुभवलेल्या त्या जीवांना आपल्या कुशीचा आधार देताना विजूला वेगळंच समाधान मिळायला लागलं. ती त्या मुलांच्या आयुष्यातली आईची पोकळी भरून काढू शकेल की नाही ह्याची खात्री नव्हती, पण लवकरच त्या सगळ्यांची लाडकी विजूमावशी बनून तिनं त्यांच्या आयुष्यात मायेची शिंपण नक्कीच केली होती. पूर्वी जेवा-झोपायला मात्र ती वाड्यावर परत जायची. पण बाबांच्या मृत्यूनंतर तिनं आश्रमालाच आपलं घर मानलं आणि मुक्काम इकडे हालवला. मागोमाग राधाकाकू आणि तात्या पण आले. जीव लावायला आश्रमातली पण चिल्ली-पिल्ली मिळाली काकूला. मागल्या वर्षी विजूनं दुकान विकलं, त्यानंतर आश्रमाचा वरचा मजला पण बांधून घेतला, नाही तरी इतक्या मुलांना अपुरीच पडत होती जागा, तात्या बांधकामावर लक्ष ठेवायला म्हणून आश्रमात थांबायला लागले आणि हळू-हळू त्यांनी पूर्ण वेळ आश्रमाचंच काम करायला सुरुवात केली.
आपल्या खोलीत बसून जुने-पुराणे अल्बम बघताना विजूच्या डोळ्यापुढून वीस वर्षे झरझर सरकत होती. कालच तिला राज्य सरकारकडून पत्र मिळालं होतं. तिच्या-राधाकाकू-तात्यांच्या-तिच्या बाबांच्या आश्रमाला सरकारकडून पुरस्कार मिळणार होता. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीच आश्रमाची शिफारस केली होती. महिन्यापूर्वी काही लोक येऊन तपासणीही करून गेले होते. मुलांच्या नीटनेटक्या आवरलेल्या खोल्या, त्यांचं सालस वागणं, अभ्यासातली-खेळातली प्रगती बघून ते लोकही भारावून गेले होते. त्यांच्या प्रतिक्रिया बघून विजूला खात्रीच होती की ह्या वर्षी त्यांच्या आश्रमाला हे बक्षीस मिळणारच! आणि अगदी तसंच झालंही होतं. पुढच्या महिन्यात मुंबईला पुरस्कार वितरण समारंभ होता आणि त्यासाठी अगत्याचं आमंत्रण द्यायला स्वतः पालकमंत्र्यांनी फोन केला होता. केवढा मोठा दिवस होता हा तिच्यासाठी. तिच्या कष्टांचं चीज झालं होतं. तशी पुरस्काराची रक्कम काही फार नव्हती, पण ह्या पुरस्कारानंतर आश्रमाला देणग्या तर मिळणारच होत्या पण झालेल्या बोलबाल्यामुळे कदाचित मुलांना दत्तक घेण्यासाठी बरीच कुटुंबं तिच्या आश्रमाचा विचारही करणार होती. मुलांचं भविष्य घडायला ह्या प्रसिद्धीनं हातभारच लागणार होता. ह्या मुलांच्या ओठावर हसू परतावं, ह्यापेक्षा विजूला तरी आणखी काय हवं होतं?
मुंबईला पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विजू आणि तात्या आले होते. राधाकाकूची पण खूप इच्छा होती यायची, पण मुलांना असं एकटं नोकरांच्या हवाली करून येणं तिला शक्य नव्हतं. कार्यक्रमाची जोरदार तयारी दिसत होती. राज्यातल्या किती तरी मोठमोठ्या संस्थांचे पदाधिकारी, कित्येक उद्योगपती, राजकारणातल्या मोठ्या असामींची तोबा गर्दी झाली होती. पालकमंत्र्यांचा सेक्रेटरी विजूची लोकांशी ओळख करून देत होता, तिच्या कामाबद्दल ऐकून ३-४ मोठ्या उद्योजकांनी लगेचच तिला देणग्यांचं आश्वासनही देऊन टाकलं होतं. अगदी तिला अपेक्षित असंच सगळं घडत होतं.
प्रत्यक्ष मानपत्र स्वीकारायला विजू तशी धडधडत्या हृदयानंच मंचावर गेली होती. स्वतः मुख्यमंत्र्यांनी तिची पाठ थोपटून तिला लागेल ती सगळी मदत करण्याचं आश्वासन दिलं. कधीही काहीही मदत लागली तर निःसंकोचपणे सांगण्याची विनंतीही केली. शेजारी उभ्या आपल्या सचिव गोखलेसाहेबांना तिचा फोन आल्यास लगेच आपल्याला कळवण्याची सूचना दिली. इतका मोठा माणूस, पण कुठेही मोठेपणाचा आव नाही की सत्तेचा गर्व नाही. विजूचं मन अगदी भरून आलं होतं. तितक्यात पालकमंत्रीही मंचावर आले आणि आश्रमाच्या वापरासाठी गावाबाहेरची मोठी जमीन सरकार देणगी देत असल्याची घोषणाही त्यांनी करून टाकली. सगळंच कसं स्वप्नवत होतं, आपलं हे कौतुक बघायला बाबा आणि काकू इथे हवे होते असं विजूला राहून राहून वाटत होतं. २-३ दिवस सरकारचा पाहुणचार घेऊन विजू आणि तात्या परतले ते आश्रमाचा विस्तार करण्याचा निर्धार करूनच.
साधारण महिना उलटला असावा आणि एक दिवस पालकमंत्र्यांचा पुन्हा फोन आला. "विजयाताई, बरेच दिवसांत आपले हालहवाल समजले नाहीत, म्हटलं एकदा भेटावं तुम्हाला. वेळ असेल तर चक्कर टाका एकदा बंगल्यावर. आमच्या सेक्रेटरीशी बोलून वेळ ठरवा आणि तात्यांना पण आणा बरोबर, तेवढीच त्यांचीही भेट होईल.. काय?" विजूनं नकार देण्याचा प्रश्नच नव्हता, २ दिवसानंतरचीच भेटीची वेळ मिळाली आणि विजू तात्यांबरोबर मंत्र्यांच्या बंगल्यावर आली. नेहमीप्रमाणे आजही तिथे बरीच वर्दळ दिसत होती. साहेब कुणाबरोबर तरी मीटिंगमध्ये होते म्हणून विजू आणि तात्यांना पाटलांनी, साहेबांच्या सेक्रेटरीने, हॉलमध्ये बसवलं होतं. स्वतः बाईसाहेब येऊन विजूची आणि आश्रमाची चौकशी करून गेल्या. लोक मोठे होते, पण वागणं अगदी साधं नि आपुलकीचं होतं. ५-१० मिनिटात आपली मीटिंग आटोपून साहेब स्वतःच आले. त्यांनीही आश्रमाची, मुलांची चौकशी केली. "मग विजयाताई, एकूण सगळं छान चाललंय तर. ह्या पुरस्कारानं आश्रमाची बरीच प्रसिद्धी झाली बघा. तुम्ही बऱ्याच नवीन नवीन योजना बनवत आहात विस्तारासाठी असं कळलं. चांगलं आहे, आमचा पाठिंबा आहेच तुम्हाला. बरं आम्ही काय विचारणार होतो.. त्या जागेचं काय करणार आहात तुम्ही. म्हणजे काय आहे, जागा बरीच मोठी आहे, चांगली मोठी इमारत बांधून घ्यावी तिथं आश्रमासाठी असा विचार होता, म्हटलं तुमच्याशी चर्चा करावी त्याबद्दल. म्हणून मुद्दाम बोलावलं. काय?" साहेबांचा आश्रमाबद्दलचा कळवळा बघून विजूचं मन भरून आलं होतं. "साहेब तुमची कल्पना चांगली आहे, पण अगदी गावतली मोक्याची जागा सोडून सध्या तरी आश्रम तिकडे हालवायचा विचार नाही केलेला. सध्याची जागा आम्हाला पुरेशी आहे, दिडेक वर्षापूर्वीच वरचा मजला चढवून घेतलाय, त्यामुळं जागेची तशी काही कमतरता नाही. शिवाय मुलांच्या शाळा जवळ आहेत, सगळंच कसं हाकेच्या अंतरावर आहे. आम्ही विचार करत होतो, त्या जागेवर सध्या तरी एखादं गोडाऊन बांधावं आणि भाड्यानं द्यावं, जकात नाक्यापासून वीसेक मिनिटावर आहे आणि ते पण गावाबाहेर, त्यामुळं गोडाऊनसाठी अगदी योग्य जागा आहे. म्हणजे, आश्रमासाठी कायमची कमाई होईल आणि जेव्हा गरज पडेल तेंव्हा बघू काय करायचं ते. हो ना तात्या?" तात्यांनीही तिच्या मताला दुजोरा दिला. साहेबांच्या कपाळावर मात्र आठी उमटल्यासारखं वाटलं विजूला. "विजयाताई, तुमची सध्याची जागा चांगली आहेच हो, पण ह्या जागेसमोर अगदीच छोटी आहे, नाही का? मी म्हणतो, तुम्ही ती जागा विकून टाका, सोन्याचा भाव येईल त्या जागेचा, आम्ही मिळवून देऊ ग्राहक जागेला, तुम्ही फक्त हो म्हणा. अहो त्या पैशात ह्यापेक्षा कितीतरी मोठा आश्रम बांधू शकाल तुम्ही ह्या नव्या जागेत." साहेबांचं म्हणणं तसं बरोबर होतं. "पण साहेब ती जागा गावाबाहेर आहे, जवळपास ना शाळा आहेत, ना इतर सोयी. साधा किराणा घ्यायचा तरी ५-७ किलोमीटरची पायपीट करावी लागेल. शिवाय लाइट-पाण्याची चांगली सोयही नाही. महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर आहे त्यामुळं रस्तेही यथातथाच आहेत. तेंव्हा सध्या तरी सोयीस्कर नाही ती जागा आमच्यासाठी." साहेबांच्या कपाळावरची आठी आता मात्र अगदीच स्पष्ट दिसायला लागली होती. "विजयाताई, स्पष्टच बोलतो. तुमची सध्याची जागा आम्हाला हवी आहे, मंदिराला लागून एवढी चांगली जागा आश्रमासाठी फुकट घालवण्यात आम्हाला रस नाही. एवढं मोठं शहर आपलं, हजारो लोक येतात देवीच्या दर्शनाला, पण एकही फाइवस्टार हॉटेल नसावं इथं, आमच्यासाठी नामुष्कीची बाब आहे. तुमची जागा त्यासाठी अगदी योग्य आहे. ती आम्हाला विका, सध्याच्या भावापेक्षा चढा भाव तुम्हाला मिळेल ह्याची मी खात्री देतो. तुमचं नवीन आश्रम आमचा बिल्डर निम्म्या किंमतींत बांधून देईल, पण ही जागा आम्हाला हवी आहे. आम्ही तुमच्यासाठी इतकं केलं, तुम्ही आमचं हे काम करावं अशी विनंती आहे." विजूचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ‘जागा आश्रमासाठी फुकट जातेय’ आश्रमाचं भरभरून कौतुक करणारे ते हेच साहेब का? ही जागा सोडून गावाबाहेरच्या ओसाड माळावर आश्रम हालवायचा.. मुलांचं कसं होणार? त्यांच्या शाळा, क्लासेस, खेळाचं मैदान सगळंच इथं जवळ होतं. नोकर-चाकर मिळणंही सोपं होतं, मंडई तर ५ मिनिटांच्या अंतरावर होती. नाही, इथून आश्रम हालवणं शक्य नव्हतं. "नाही साहेब, मला ते जमणार नाही." विजूनं ठामपणे सांगितलं. "विजयाताई, अहो विनंती केली होती आम्ही आणि तुम्ही इतक्या निर्दयतेनं नाकारलीत. हे चांगलं नाही विजयाताई. तुम्ही म्हणजे आमच्यासाठी सगळे मार्गच बंद केलेत की. पण आम्हाला ती जागा हवी आहे, तेंव्हा नवीन मार्ग शोधावाच लागेल. कसं? पाटील, जरा ती फाइल आणा इकडं. हे बघा विजयाताई. महाराजांनी ही इमारत तुमच्या आजोबांना दिली होती. बरोबर ना? पण कागदोपत्री अजूनही महाराजांच्या वंशजांचाच मालकी हक्क आहे हो तिथं. आता तुम्ही तिथं वर्षानुवर्ष ठाण मांडून बसला आहात, कूळ कायद्यानुसार तुमचाच हक्क आहे त्या जागेवर, पण काय आहे आमचे वकीलही चांगले आहेत आणि सरकारी कागदपत्रात फेरफार करणं आम्हाला सहज शक्य आहे तेंव्हा ती जागा आम्ही कधीही हिसकावून घेऊ शकतो तुमच्याकडून. आता असं करण्यात आम्हाला काडीचाही रस नाही, तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे देऊनच ती जागा आम्हाला विकत घ्यायची आहे. पण तुम्ही सगळं अवघड करून ठेवताय ना आमच्यासाठी. ही फाइल ठेवा तुमच्याजवळ, शांतपणे वाचा आणि तुमचा निर्णय कळवा आम्हाला. तशी काही घाई नाही, पण हे काम लवकर हातावेगळं झालेलं बरं, तेंव्हा २ दिवसांत फोन करतील पाटील तुम्हाला, काय पाटील? चला, आम्ही निघतो, कार्यकारिणीच्या मीटिंगला जायचं आहे. पाटील, ह्यांच्या चहापाण्याचं बघा, पाहुणचार घेतल्याशिवाय जाऊ नका देऊ, तुमच्या वैनीना सांगा आमचा निरोप आहे. काय? येतो विजयाताई." विजूचा पारा साहेबांच्या प्रत्येक वाक्यागणिक चढत होता, पण इथे आपण संतापून काहीही उपयोग नाही हे ही तिला चांगलं माहीत होतं. तात्यांचा गोरापान चेहरादेखील रागानं लालबुंद झाला होता. तिनं हलकाच त्यांचा हात दाबला आणि त्यांना काही न बोलण्याची खूण केली. साहेब जसे गडबडीत आले होते तसेच लगबगीनं निघूनही गेले.
त्या भेटीनंतर विजूला खरं तर काही सुचेनासं झालं होतं. तसा मंत्रीसाहेबांनी तिच्यापुढे दुसरा कोणताच पर्याय शिल्लक ठेवला नव्हता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणं नाही वागलं तर सगळं होत्याचं नव्हतं होणार होतं आणि ती पोकळ धमकी नाही ह्याची तिला चांगलीच कल्पना होती. राजकारण म्हणजे काय आणि राजकारणी काय चीज असतात हे तिला आता समजत होतं. विचार करून तिचं डोकं शिणून गेलं होतं. राधाकाकू आणि तात्यादेखील काहीच बोलत नव्हते. गोखले.. मुख्यमंत्र्यांचे सचिव. हो! फक्त गोखलेच आता तिची मदत करू शकत होते. साहेब मुख्यमंत्र्यांचा शब्द मोडणार नाहीत ह्याची विजूला खात्री होती आणि मुख्यमंत्रीसाहेबांसारखा माणूस तिच्यावर, तिच्या मुलांवर हा अन्याय होऊ देणार नाही असा विश्वासदेखील!
दुसऱ्यादिवशी सकाळीच विजूने गोखल्यांना फोन लावला. "नमस्कार साहेब. मी विजया दाते. आपण पुरस्कार सोहळ्यात भेटलो होतो. आमच्या आश्रमाला.." तिला मध्येच तोडत गोखले म्हणाले, "अरे वा विजयाताई. अहो ओळखलं मी तुम्हाला. साहेबांची ताकीद असल्यावर तुम्हाला विसरून कसं चालेल. बोला. काय काम काढलंत?" गोखल्यांचे ते उद्गार ऐकून विजूची खात्रीच पटली की आता आश्रमाला कुणीच धक्का नाही लावू शकणार. "साहेब, मुख्यमंत्रीसाहेबांची थोडी मदत हवी होती. आश्रमाचंच काम होतं, पण जरा अर्जंट आहे." तिनं आपल्या भेटीचा इत्थंभूत वृत्तांत गोखल्यांना ऐकवला. "विजयाताई, एक गोष्ट सांगतो, राग मानू नका. अहो, एवढी चांगली ऑफर दिली आहे तुम्हाला, घेऊन टाका. कशाला सापाच्या शेपटीवर पाय ठेवता?" विजूला गोखल्यांचा रागच आला. "गोखलेसाहेब, तुम्ही तुमच्या साहेबांच्या कानावर ही गोष्ट घालावी म्हणून फोन केला मी. तुमचे अनाहूत सल्ले ऐकायला नव्हे. मला साहेबांशी बोलायचं आहे, त्याची व्यवस्था तुम्हाला करता येईल का ते सांगा." "विजयाताई, तशी व्यवस्था मी करेन हो. पण खरं सांगतो, त्याचा काहीच उपयोग नाही. आमच्या साहेबांचा मुलगा बिल्डर आहे माहीत असेलच तुम्हाला, आता हॉटेलसारखं मोठं काम साहेबांच्या राज्यात त्यांच्या मुलाला नाही तर कुणाला मिळणार, तुम्हीच सांगा? आणि तसा हा प्रोजेक्ट बराच मोठा आहे हो. आणखीही काही बड्या असामी गुंतल्या आहेत त्यात. ह्या सगळ्या लोकांसमोर तुमचा निभाव लागेल असं वाटतं तुम्हाला? उगाच नसत्या भानगडीत पडू नका. आणि एक आतल्या गोटातली बातमी सांगतो, तुमचे पालकमंत्री तुमची जागा अशीच काढून घेणार होते, पण आमच्या साहेबांनी मात्र तुम्हाला योग्य मोबदला दिल्याशिवाय आश्रमाला हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद दिली आहे सगळ्यांना. पण तुम्ही जर असंच वागणार असाल तर साहेब तरी काय करणार सांगा? म्हणून म्हणतो, उगाच नाही त्या भानगडीत पडू नका, अहो नुकसान तुमचंच आहे. मी तुमच्या हितचिंतकाच्या नात्यानं सांगतो. माझं ऐका. मला पुन्हा फोन करा तुम्हाला साहेबांशी बोलायचंच असेल तर. अच्छा! बोलू नंतर."
गोखल्यांचं बोलणं ऐकून विजू बसल्या जागी थरथरत होती. संतापानं.. अविश्वासानं.. विश्वासघाताच्या जाणीवेनं.. अगतिकतेनं की आणखी काही माहीत नाही. तिचं डोकं भणभणत होतं. भारावल्यासारखा तिनं फोन बंद केला, पाच मिनिट डोळे मिटून काही तरी विचार केला आणि रिसीव्हर उचलून पालकमंत्र्यांचा नंबर फिरवला.
(समाप्त)
No comments:
Post a Comment