Wednesday, February 28, 2007

मनातल्या मोरपिसांची....

हातावरुन अगदी हळूवारपणे मोरपिस फिरावं, हलक्याश्या, अगदी हव्याहव्याश्या गुदगुल्या व्हाव्या आणि सारं अंग शहारून जावं.. अगदी असेच काही मोरपंखी क्षण आठवावेसे वाटले, म्हणून हा लेखन प्रपंच!!

माझ्या भावाचा जन्म.. माझ्या आयुष्यातला एक सोनेरी क्षण. मी नऊ वर्षांची होते तेव्हा. माहित नाही का, पण मला भावंड हवंच होतं. खूप एकटं वाटायचं मला कधी कधी. माझा माझ्या चुलत भावावर खूप जीव होता. त्यानं मला value दिलेली माझ्या चुलत बहिणीला खपायचं नाही, ती ही तशी लहानच होती म्हणा, पण ती मला नेहमी चिडवायची. म्हणायची हा काही तुझा सख्खा भाऊ नाही, चुलत भाऊ आहे. अर्थात हे मलाही माहित होतं, पण का कोण जाणे खूप लागायचं मनाला तिचं चिडवणं. आणि मग माझ्या आयुष्यात माझा भाऊ आला. He is extremely important part of my life and will always be!!

शाळेत असतानाची गोष्ट. आठवीत असेन बहुदा, आता तर आठवत पण नाही. माझ्या एका वर्गमैत्रिणीकडं आम्हाला जेवायला जायचे होते एका रविवारी. बहुदा काही खास कारण नव्हतं, असंच चकाट्या पिटायला भेटायचं ठरलं होतं. माझ्या ह्या मैत्रिणीचा एक चुलत भाऊ, तो ही आमच्याच शाळेत होता, आमच्या एक वर्ष पुढे. त्याची माझी खरं तर काही ओळख नव्हती. पण उगाच चार लोकांची प्रकरणं आहेत आणि आपलंही असावं अशा काहीश्या भावनेनं असेल कदाचित.. तर त्याला म्हणे मी आवडायचे. अर्थात तेव्हा माझ्यात आवडण्यासारखं काय होतं ते तो बापडाच जाणो. मला ह्या गोष्टीची थोडी फार कल्पना होती आणि त्या अल्लड वयात वाटायला हवा तसा आनंदही होत होता ह्या विचारानं की आपल्यालाही कुणी तरी भाव देतेय :) त्या दिवशी त्यांच्या घरी जेवण वगैरे झाल्यावर आम्ही अशाच गप्पा मारत बसलो होतो, तो बिचारा ३-४ वेळा त्या खोलीत येऊन गेला, थोड्या वेळानं माझ्या मैत्रिणीला बाहेर नेऊन त्याने काही तरी सांगितले. मग ते दोघे ही आणि त्याचे १-२ मित्र आत आले आणि बराच वेळ आम्ही एकत्र टाईम पास केला. थोड्या वेळानं एकेकजण काही ना काही कारण काढून बाहेर पळायला लागला. ह्यांचा नेमका काय प्लॅन आहे ते न कळण्याइतकी मी वेडी नव्हते. त्याला मला "propose" करायचे होते. आज इतक्या वर्षांनी प्रेम म्हणजे काय, "propose" करणे नेमके कशाला म्हणतात ते कळतंय. पण तेव्हा.. असो. सगळे पांगल्यावर त्यानं काही तरी इकड-तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली. पण मुद्द्याला हात घालायला कही त्याला जमेना, शाळेत असताना मी अति बिनधास्त Tomboyish टाइपची होते. त्यामुळे त्याची उडालेली धांदल बघून मला खूप मजा येत होती. शेवटी एकदाचं सगळं धैर्य एकवटून त्यानं बोलायला सुरुवात केली. मला तू आवडतेस वगैरे प्रस्तावना संपून नेमका प्रश्न विचारायची वेळ आली. त्यानं प्रश्न विचारायला तोंड उघडलं आणि नेमकं तेव्हाच रस्त्यावर एका गाढवानं जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. इतका वेळ दाबून ठेवलेलं हसू आता मात्र मला आवरेना. मला जोरजोरात हसताना बघून त्याला काय करावं सुचेना, माझं हसणं ऐकून मी त्याला होकार देणार का ह्याचे अंदाज बांधत बाहेर बसलेले सगळे आत आले आणि त्याचा पडलेला चेहरा बघून ते ही गोंधळले. शेवटी वैतागून तो खोलीबाहेर निघून गेला आणि माझ्या आयुष्यातल्या पहिल्या proposal चा fiasco झाला. त्यानंतर ही त्याच्या घरी जाणं-येणं सुरुच राहिलं पण त्या दिवसानंतर तो मात्र कधीही माझ्याशी बोललादेखील नाही.

त्यानंतर मुलींना शाळा-कॊलेजात जे काही गोड-कडू अनुभव मुलांकडून येतात ते मलाही आले. पण ह्या पहिल्या proposal fiasco नंतरचा आवर्जून लक्षात रहावा असा प्रसंग इंजिनीअरिंगच्या तिस~या वर्षाला असताना आला. मी त्यादिवशी रुमवर एकटी होते. माझ्या रुममेटस कुठल्या तरी टेक्निकल एक्स्पोला गेल्या होत्या. मी संध्याकाळी काही तरी वाचत बसले होते आणि दार वाजलं. तो समोर उभा होता, अर्थात तो आणि त्याच्या बरोबर आमचा सगळाच ग्रुप रोजच भेटायचा, त्यामुळे आज ही भेटणार हे माहितच होतं. पण आज तो एकटा आला होता. त्यानंतरचे आमचे संवाद असे काहिसे होते,
तो: मला तुझ्याशी काही तरी बोलायचंय.
मी: बोल
तो: तुला नाही कळलं इतक्या दिवसांत?
मी: (उगाच साळसूदपणाचा आव आणत) काय?
तो: खरंच नाही कळलं..
मी: (गाढवा, कळलं असेल-नसेल, तू बोलून टाक ना - हे मनातल्या मनात बरं का) नाही रे बाबा, काय कळायचं होतं.
तो: नाही कळलं, मग जाऊ दे, आपण कळेपर्यंत वाट बघू
मी: (अरे देवा, हा असाच जातो की काय परत, काय पण माणूस आहे, ह्याला बोलतं केलंच पाहिजे आज) तसं थोडं फार कळलंय (आता तरी सांग की माठ्या)
तो: कळलंय ना, मग काय सांगायचं तुला पुन्हा, चल तर जातो मी
मी:............... (आवाक!! एक लंबी खामोशी)
हे बोलून तो खरंच निघून गेला.
आज हे "ध्यान" माझा "आवं धनी" झालाय. आमचं लग्न झालं, पण त्यानं मला कधीच formally propose वगैरे केलं नाही. :)

मी साधारण तिसरीत वगैरे होते ना तेव्हापासूनची माझी मैत्रिण नीता. आमच्या घरासमोर त्यांनी बंगला घेतला आणि ते रहायला आल्या दिवसापासून आमची मैत्री झाली ती आज ही टिकून आहे. त्यांचं व्यापारी घराणं होतं. चुलत भावंडं कळायला लागलं तशी व्यापाराकडं वळली, पण नीताच्या आई-वडिलांना शिक्षणाचं महत्त्व वाटत होतं, ही सगळी भावंडं शिकली. चुलत बहिणी १८वं सरतंय न सरतंय तोवर दोनाचे चार हात करून सासरी गेल्या. त्यामानानं नीताचं लग्न २० व्या वर्षी म्हणजे तसं उशिराच झालं. लग्नानंतर लगेचच सासर-माहेर दोन्हीकडून मुलांसाठी दबाव यायला लागला आणि त्या दबावामुळे असेल किंवा स्वेच्छेने असेल, नीताला दिवस राहिले. माझ्या बरोबरीनं खेळणारी, भांडणारी, रडणारी, चिडणारी, अगदी मारामारीदेखील करणारी नीता आई होणार... त्यानंतर एकेक करून मैत्रिणींची लग्नं होत गेली, त्यांना मुलंही झाली आणि प्रत्येकवेळी मनावरून अगदी तसंच मोरपिस फिरलं. माझ्या चुलत बहिणीला मागच्या वर्षी मुलगा झाला. आमच्या पुढच्या पिढीची सुरुवात.. त्याला जेव्हा मी हातात घेतलं तेव्हा का माहित नाही, पण खूप छान वाटलं. इतकं नाजूक, सुंदर, अनमोल जगात दुसरं काही असूच शकत नाही असं काहीसं.

आज लिहायला बसले आणि असे कितीतरी प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. काय लिहायचं आणि काय नाही कळेना. मनावरुन मोरपिस पुन्हा फिरायला लागलं आणि पुन्हा अंग शहारलं...