Thursday, October 27, 2016

सुनिता (३ - शेवट)

(manogat.com वर पूर्वप्रकाशित)

शेवटी ३ वर्षांच्या विरहानंतर सुनिताच्या आयुष्यात मधुचंद्राची ती गुलाबी रात्र आज आली होती…. पुढे...
तीन वर्षांच्या वनवासानंतर सुनिताच्या आयुष्यात पुन्हा सुखाची बरसात होत होती. मधू, आई, बाबा सगळे आनंदात होते. आईनं तर तिरुपतीला जाऊन अभिषेक ही केला. प्रवीणचे आई-वडील देखील खूष होते. त्याच्या आईला नातवंडांना खेळवण्याची घाई झाली होती. घरी फोन केला की ती हटकून हा विषय काढायची आणि प्रवीणचा गोरामोरा झालेला चेहरा बघून सुनिता डोळ्यात पाणी येईपर्यंत हसायची. सुनिताला आता एकच काळजी होती, प्रवीणच्या नोकरीचं कुठेच जमत नव्हतं, त्याची नोकरी जाऊन वर्ष उलटलं होतं. शिल्लकीत टाकलेले पैसे जवळपास संपत आले होते. घर चालवायला सुनिताची कमाई पुरी पडत नव्हती. पाणी अगदीच नाकातोंडाशी यायला लागलं. वेगळ्या घराची चैन आता परवडणार नाही हे त्या दोघांच्याही लक्षात आलं होतं. त्यांनी जवळच्याच महाविद्यालयातल्या काही विद्यार्थ्यांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. २ बेडरूम-किचनच्या त्या ब्लॊकमध्ये ६ लोक रहात होते. तशी मुलं चांगली होती, प्रवीण आणि सुनिताला त्यांची स्वतंत्र खोलीही होती. पण सुनिताला नाही म्हटलं तरी त्यांच्या बरोबर राहताना संकोच वाटतच होता. हे असं किती दिवस चालायचं ह्याची शाश्वती नव्हती. प्रवीणला बहुदा ह्या सगळ्याची कल्पना आली असावी. त्याने एक दिवस आपणहून विषय काढला. "सुनि, तुला इथे त्रास होतोय ना गं? पण काय करु? आपल्याला सध्या नाही परवडणार वेगळं घर घेऊन रहायला. सॊरी सुनिता. माझ्यामुळं तुला…" "अरे असं काय म्हणतोस? मला काही त्रास होत नाहिये. तू आहेस ना आता माझ्या बरोबर!! आणखी काय हवं मला? आज ना उद्या तुला नोकरी मिळेलच आणि मग काय ऐषच आहे की!! कशाला नाही ती चिंता करतोस?" "नाही सुनिता, अगं मला इंटरव्ह्यूसाठी ४ दिवस बाहेर जायचे आहे पुढच्या आठवड्यात, तू कशी राहशील एकटी? राधाकडे तुला सोडून जाणं माझ्या तरी जीवावर येतंय. तसा माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, अर्थात तू हो म्हणत असशील तरच.." "काय?" "मला वाटतं तू थोडे दिवस मधूकडे जाऊन रहा. तिथे निदान तुला सगळ्या मुलींबरोबर तरी राहता येईल. थोडा बदल पण होईल. मला पण नोकरी शोधण्याकडे जास्त लक्ष देता येईल आणि तुझं इथलं भाडं पण वाचेल. एखाद महिन्यात मला नोकरी मिळेलच, मग आपण एकत्र आहेच की!" प्रवीणला सोडून पुन्हा इतक्या दूर जाऊन राहण्याचा विचारच सुनिताला सहन होत नव्हता. पण सद्य परिस्थितीत दुसरा कुठलाच मार्ग दिसत नव्हता. त्या दिवशी रात्री सुनिता किती तरी वेळ प्रवीणला बिलगून रडत होती आणि प्रवीण तिची समजूत काढत होता. शरिरानं दोघे दूर जाणार होते, पण काही महिन्यांपूर्वीच्या मनाच्या दुराव्यापेक्षा हा विरह नक्कीच सुसह्य असणार होता.
ताई आपल्याला भेटायला येणार ह्या विचारानं मधू भलतीच खूष होती. तिच्या रु.पा.सुद्धा ताईची वाट बघत होत्या. आपल्याकडे कुणीतरी वडील माणूस येणार… घरापासून इतक्या दूर येऊन पडलेल्या त्या तिघीदेखील मधूइतक्याच उतावीळ झाल्या होत्या ताईच्या स्वागताला. महिनाभर ताईच्या हातचं खायला मिळणार.. तिच्याशी गप्पा मारायला मिळणार.. आणखी काय हवं होतं त्यांना? सुनिताला भेटल्यावर तर त्यांना आपली बहीण भेटल्याचाच आनंद झाला. सुनिता होतीच तशी. जितक्या आपुलकीनं ती मधूची काळजी घ्यायची तितक्याच आपुलकीनं तिच्या तीन रुपांची पण!! मधूच्या मित्र-मैत्रिणींबरोबर सुनिताचा वेळ अगदी मजेत जात होता. एखाद दिवसाआड प्रवीणशी गप्पाही होत होत्या. तो मध्ये २-३ वेळा कुठे तरी बाहेरगावीही जाऊन आला. बहुदा नोकरीसाठी मुलाखत असावी. पण प्रवीणला यश येत नव्हतं. जवळपास ३ महिने उलटत आले तरी नोकरीचा शोध चालूच होता. हल्ली आठवड्यातून एखादा दिवसच प्रवीणचा फोन येत होता. फोनवर इतके पैसे खर्च करणं त्यांना परवडत नव्हतं ना!!! दिवसांमागून दिवस उलटत होते.. महिन्यांमागून महिने. आठवड्याच्या अंतरावर होणारे फोन आता पंधरवड्याच्या अंतरानं व्हायला लागले. फोनवर प्रवीणशी बोलताना सुनिताला जाणवायचं त्याला किती त्रास होतोय दूर राहण्याचा ते आणि तो आपल्याला मिस करतोय ह्या जाणीवेनं तिला अश्या परिस्थितीतही समाधान वाटायचं.
सुनिताला मधूकडे येऊन वर्ष होऊन गेलं होतं. २ च दिवसांपूर्वी ती प्रवीणशी बोलली होती. तो खूप आनंदात होता. का ते मात्र सांगायला तयार नव्हता. सुनिताचं मन सांगत होतं, त्याला नोकरी मिळाली आहे आणि तो लवकरच मला न्यायला इकडे येणार आहे. त्याच्या विचारात ती गर्क असतानाच दारावरची बेल वाजली. पोस्टमन आला होता. सुनिताच्या नावचं रजिस्टर पत्र होतं. तिनं सही करुन ते पत्र घेतलं आणि लिफाफा उघडला. त्यात घटस्फोटाचा अर्ज होता. वर्षभर सुनिता आणि प्रवीण वेगळे रहात आहेत, त्यांच्यातले पती-पत्नीचे संबंध केव्हाच संपुष्टात आले आहेत, तेव्हा त्यांना कायदेशीर घटस्फोट मिळावा असा अर्ज प्रवीणने केला होता आणि सुनिताला कोर्टाची नोटीस आली होती!!!
प्रवीणनं आपला डाव साधला होता… एका मुलीचं आयुष्य नासवून तो मात्र वेदाबरोबर सुखानं नांदणार होता आणि सुनिता… कोण जाणे तिच्या भविष्यात काय होतं?
----------------------------------------- समाप्त --------------------------------------------------------

ही एक सत्यकथा आहे. अर्थात पात्रांची नावं बदलली आहेत आणि प्रसंग रंगवायला थोडाफार कल्पनाविलास केला आहे. पण कथेचा गाभा मात्र बदललेला नाही. ह्या कथेतली सुनिता मी अगदी जवळून पाहिली आहे. तिच्या संघर्षात तिला आधारही दिला आहे. तिचे अश्रूही पुसले आहेत. तिची कथा लोकांसमोर मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. काही चुकले असल्यास तुम्ही ती चूक मोठ्या मनाने पदरात घ्यावी अशी विनंती.
एका मध्यमवर्गीय तेलुगु कुटुंबातून आलेली ही मुलगी.. मुलगा अमेरिकेत असतो ह्याने तिचे आई-वडील आणि ती स्वतः देखील हुरळून गेली होती. आपण कोणत्या अग्निदिव्यात प्रवेश करतो आहे हे तिला कसं समजणार होतं? किती तरी स्वप्नं डोळ्यात साठवून तिने अमेरिकेत पाऊल ठेवले. नशिबानं तिच्यासमोर काय वाढून ठेवले आहे ह्याची बिचारीला कल्पनाही नव्हती. तिचा संघर्ष कथेच्या ह्या वळणावर येऊन संपला नाही. घटस्फोट मिळू नये म्हणून तिनं जीवाचं रान केलं. वकिलाची फी भरायला जवळ पैसे नव्हते, सवेरा नावाच्या एका संस्थेकडून तिने मदत घेतली. पण त्यातून फारसे काही निष्पन्न होणार नाही ह्याची लवकरच तिला कल्पना आली. प्रवीणनं तिच्यावर २-३ वेळा हात उगारला होता. पण सुनिताने पोलिसात तक्रार न केल्यामुळे त्याची कागदोपत्री काहीच नोंद नव्हती. वेदाला लिहिलेल्या इमेलच्या छापील प्रती कोर्टात ग्राह्य मानल्या गेल्या नाहीत. ते दोघेही आपल्या मर्जीनं वेगळे रहात होते हे प्रवीणनं विनाप्रयास सिद्ध केले. त्यामुळे सुनिताला alimony देण्याची त्याला गरज ही पडली नाही. प्रवीणची नोकरी ही गेली नव्हती. तो जवळपास २ वर्ष Telecommute करत होता. वेदाशी संपर्क त्यानं तात्पुरता तोडला होता. सुनिताचा विश्वास संपादन करण्यासाठी केलेला तो एक फार्स म्हणा हवं तर. घटस्फोटाची नोटीस आली तेव्हा प्रवीणचं ग्रीन कार्ड होत आलं होतं. सुनितानं त्याला ग्रीन कार्ड होईपर्यंत वाट पाहण्याची विनंती केली आणि त्यानं ती मान्यही केली. ग्रीन कार्ड झाल्या झाल्या दोघांचा घटस्फोट झाला. ह्या लेखातल्या सुनिताचे सासू-सासरे तिच्याशी आणि तिच्या आई वडिलांशी अगत्यानं वागलेले दाखवलेत, पण खऱ्या सुनिताचे सासू-सासरे प्रवीणचीच री ओढत होते. त्यांच्या मते सुनितामध्येच काही तरी दोष होता, त्यामुळेच प्रवीण अजूनही वेदाच्या मागे मागे जात होता. नंतर बरेच दिवस सुनिता पिझ्झा शॊप, किराणा दुकानं अशा ठिकाणी काम करत होती. कित्येकदा समजावूनही ती भारतात परतायला तयार नव्हती. त्याच दरम्यान मधूचं तिच्याच वर्गातल्या एका भारतीय मुलाशी लग्न ठरलं. मधूजवळ फार दिवस राहणं सुनिताला शक्य नव्हतं. तिनं भारतीय कॊट्रॅक्टरला गाठून खोटानाटा रेझ्युमे बनवला आणि एका सॊफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळवली. तिनं सॊफ्टवेअर मधलं काही ज्ञान नसताना तिथे कसं काय निभावलं माहित नाही, पण आज त्याच कंपनीत ती पूर्णवेळ काम करते.
एखादी कथा रंगवून सांगावी इतकं शब्दसामर्थ्य माझ्यात नाही. लेखिकेची प्रतिभाही माझ्याजवळ नाही. पण किती तरी दिवसांपासून सुनिताची कथा लोकांना सांगावी असं मनात होतं. सुनितासारख्या किती तरी अश्राप मुली अमेरिकेच्या ओढीनं इथे येऊन मानसिक आणि शारिरीक अत्याचाराचा बळी ठरतात. मुलगा अमेरिकेला असणं म्हणजे त्यानं मोठा तीर मारला आहे असं समजणारे वरमाता-पिता आपल्याला पावलागणिक दिसतील आणि अश्या मुलांना फारसा विचार न करता आपली मुलगी देणारे महाभाग वधुपितादेखील.
ह्या कथेतल्या सुनिताला सावरायला इथे मधू होती, मधूचे किती तरी मित्र-मैत्रिणी होते. पण असा काहीच आधार नसलेल्या सुनितादेखील आपल्या आजूबाजूला आहेत. सुनिताला घरी परतण्यापेक्षा अमेरिकेत एकटीनं राहणं जास्त सोयीस्कर वाटलं. का घडलं असं? समाजाच्या बोचऱ्या नजरांत लपले आहे उत्तर ह्याचे. लग्न झालं की तिरडीवरूनच त्या घराबाहेर पडायचं ही शिकवण आजही मुलींना दिली जाते आणि त्यामुळेच असे हाल सोसूनही मुलींची पावलं आपल्या माहेराकडे वळत नाहीत. आपण मुलींना काय शिकवायचं ह्याचा फेरविचार मुलींच्या पालकांनी करणे गरजेचे आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि अश्या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठिशी उभे राहणे, समाजाचा काडीचा विचार न करता, हे महत्त्वाचे आहे. बघा पटतंय का ते.

No comments: