Wednesday, June 07, 2006
गुणवत्तेचे कौतुक का करु नये?
गुणवत्ता यादी प्रसिद्ध करावी की नाही ह्यावरची चर्चा अलिकडे वाचनात आली आणि १०वी - १२वी चे दिवस पुन्हा आठवले. शाळेत “गुंड” म्हणून ज्या लोकांना ओळखले जाते, त्यांच्याकडून फारश्या अपेक्षा नाही ठेवल्या जात. मीसुद्धा त्याला अपवाद नव्हते. मी हुशार नव्हते असे नाही, शाळेत पहिल्या पाचात नेहमीच असायचे कारण फारसा अभ्यास न करता ते जमून जायचे. पण पहिला नंबर मिळवण्यासाठी झटण्याची वगैरे माझी कधीच तयारी नव्हती. त्यापेक्षा मित्र-मैत्रिणींबरोबर “टाइम-पास” करणे मला जास्त महत्त्वाचे वाटायचे. आई-बाबा पण मिळालेल्या गुणांवर खूष असायचे, त्यामुळे चौथ्याऐवजी पाचवा क्रमांक मिळण्याचे वाईट वाटावे अशी वेळच आली नाही. दहावीच्या परिक्षेपूर्वी माझ्या वर्गशिक्षिकेने माझ्या आईला सांगितलेही होते की “तुमची मुलगी हुशार आहे पण गुणवत्ता यादीत येण्यासाठी लागणारी एकाग्रता आणि प्रयत्न करण्याची तयारी मात्र तिच्यात नाही, तेव्हा तुम्ही फारश्या अपेक्षा ठेवू नका.” माझ्या आईला हे ऐकून वाईट वाटले होते ह्यात शंका नाही, तिची चिडचिडही झाली असावी, पण मला खरंच त्याचे काहीच वाटले नाही. पण हे ऐकून एका वर्गमैत्रिणीने केलेल्या कानउघाडणीनंतर मात्र मी अभ्यास करणे खरंच मनावर घेतले. १०वी च्या गुणवत्ता यादीत माझे नाव पाहून सगळ्या शिक्षकांना जबरी धक्का बसला होता. त्यादिवशी माझ्या आई-बाबांच्या चेह~यावर दिसलेले समाधान लाख मोलाचं होतं. तोपर्यंत गुणवत्ता यादी माझ्या दृष्टिनं कधीच इतकी महत्त्वाची नव्हती, पण त्या दिवसानंतर मात्र १२वी ला असेच यश पुन्हा मिळवायचे असे मी मनोमन ठरवून टाकले होते. शाळेत किंवा महाविद्यालयात आजही आपले नाव झळकलेले आहे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या बाबांच्या शाळेत मी गेले असताना त्यांचे नाव असेच झळकलेले पाहून माझा ऊर अभिमानानं भरून आला होता, आणखी काही वर्षांनंतर माझ्या मुलांनासुद्धा असाच अभिमान माझ्याबद्दल वाटेल हा विचारच किती सुखद आहे. खरं तर आता मागे वळून पाहिल्यावर १०वी आणि १२वीचे यश खरंच इतके महत्त्वाचे वाटत नाही. पण त्याक्षणी, त्यावेळी ज्या भावना मी अनुभवल्या, जे सुख मी माझ्या कुटुंबियांच्या डोळ्यात पाहिले, ते त्या क्षणापुरते का होईना अनमोल होते. ह्या सगळ्या भावनांच्या अनुभूतीनंतर मी तरी कधीच गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याला विरोध करणार नाही. ह्याचे तोटे असतीलही, पण जर कुणी कष्टानं यश मिळवले असेल तर त्याचे कौतुक करण्यात गैर काय आहे हे मला तरी कळत नाही आहे.
Subscribe to:
Posts (Atom)