Friday, April 28, 2006

आरक्षण...कशासाठी?

मी अमेरिकेत आले तेव्हाच ठरवलं होतं, आपण आपल्या देशात परत जायचं. अजूनही विचार पक्का आहे, पण मग अशा काही बातम्या वाचल्या की वाटतं आपला निर्णय चुकीचा तर ठरणार नाही ना? "ब्राम्हणद्वेष" जिथे एखाद्या धर्माचा पाया असू शकतो अशा देशात मी ब्राम्हण म्हणून जन्मले. मी शाळेत असताना अधूनमधून "बामण" म्हणून चिडवाचिडवी व्हायची, पण त्याचा त्रास व्हावा इतक्या प्रमाणात नाही. पण उद्या माझ्या मुलाबाळांना "ब्राम्हण" म्हणून वाईट वागणूक मिळणार नाही ह्याची खात्री देऊ शकतं कुणी? नाही.. त्यांना equal opportunities मिळतील ह्याची खात्री आहे? नाही... त्यांच्यावर जातीच्या राजकारणामुळे अन्याय होणार नाही ह्याची खात्री आहे? नाही.. किंबहुना तसा अन्याय होण्याचीच शक्यता जास्त आहे. मग मी आणि माझ्यासारख्या हजारो उच्चवर्णीय अनिवासी भारतीयांनी परत जाण्याचा निर्णय बदलायचा की काय?
माझा विरोध आरक्षणाला नाही. पण जातीच्या राजकारणाला नक्कीच आहे. द्या ना आरक्षण, पण गरिबांना द्या, गरजूंना द्या. त्यांची जात नका बघू. कुवत बघा. आज गरीब उच्चवर्णिय विद्यार्थ्याजवळ काय पर्याय आहेत?
१) आपल्या पालकांना कर्ज काढायला लावून एखाद्या private college मध्ये जाऊन शिकायचं, शिक्षण पूर्ण झालं की नोकरीसाठी पुन्हा टाचा घासायच्या आणि त्यातून निष्पन्न काय होणार, तर त्याची जागा एखाद्या SC/ST/BC/OBC उमेदवाराला मिळेल.
२) आपली कुवत असूनही उच्च शिक्षणाला राम-राम ठोकायचा आणि गरिबीच्या गर्तेत खोल-खोल बुडत जायचं.

आज आपण मारे आरडा-ओरडा करतो आहे "India Shining" चा. पण प्रत्येक क्षेत्रात reservations झाले, तर राहील हीच परिस्थिती? Will we be able to maintain quality of work we promise today? मग कोण गुंतवेल पैसा भारतात? काय परिणाम होईल ह्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर? प्रश्न बरेच आहेत.. पण उत्तर शोधण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाहीत आपले राजकारणी लोक. कारण त्यांना vote bank मिळवायच्या आहेत आणि त्यासाठी जातीच्या राजकारणापेक्षा सोपा मार्ग तो कुठला? "Divide and Rule" ची नीती आणखी किती दिवस चालवणार हे लोक? देशाच्या ठिक~या केल्याशिवाय स्वस्थता मिळणार नाही बहुदा ह्यांना. आपण कितीही आरडाओरडा केला तरी हे लोक आपलं मन मानेल तेच करणार. चूक आपलीच आहे म्हणा, आपणच तर दिलाय माकडांच्या हातात कोलीत मतं देऊन.

चला... आपण ह्या सगळ्याकडं कानाडोळा करायला शिकू या. चांगलं ते घेऊन वाईट सोडून देऊ या... चला, सगळे एकसाथ म्हणा बघू "माझा भारत महान!!!!"

Friday, April 21, 2006

अशी पाखरे येती...

वय वर्ष ४
माझे काका, काकू, चुलत भावंडं काकांची बदली झाल्यामुळे दुस~या गावाला रहायला गेले. माझी चुलत बहिण...माझी मैत्रिण आणि माझा चुलत भाऊ... आमच्या दोघींचाही लाडोबा, अचानक एक दिवस दोघेही निघून गेले. जाताना आमच्या वेड्या खेळांना, क्षुल्लक कारणावरुन होणा~या अगदी कडाक्याच्या भांडणांना, मग होणा~या समेटीला, एकाच ताटातल्या जेवणांना, एकमेकींचा हात धरून दसरा-संक्रांतीला हिंडलेल्या घरांना मागे ठेवून गेले. मी ८वी-९वीत असताना ते परत आले.. कायमचे. पण, का कोण जाणे आमच्या नात्यात मात्र कायमचा दुरावा राहिला.

वय वर्ष ७
आमच्या घरासमोरची मावशी.. तिला २ मुलं होती, यदु आणि परु... माझ्यासाठी यदु-परु दादा. मी बरेचदा तिच्याकडे जायचे.. गल्लीत फारशा मुली नव्हत्या, त्यामुळे यदु-परुदादा मला त्यांच्याबरोबर खेळायला न्यायचे. त्यावेळी मला स्वयंपाक करायची फार हौस होती. आजी काही शेगडीजवळ फिरकू द्यायची नाही. मग माझा मोर्चा मावशीकडे वळायचा. मावशी कधी कणकेचा गोळा द्यायची लाटायला, तर कधी निवडलेले तांदूळ परत निवडायला. मला आठवतंय एकदा दादांनी मला आरामखुर्चीतली दांडी काढून आणायला सांगितली होती, मी वेडिनं ती काढून त्यांना नेऊन दिली, थोड्या वेळानं त्यांचे बाबा खुर्चीत बसले आणि जोरदार आपटले. मग आम्ही किती आणि कोणत्या शिव्या खाल्ल्या ते इथे न लिहिलेलेच बरे :) त्यांनी काही दिवसांनी नवे घर बांधले आणि तिकडे रहायला गेले. त्यानंतरही काही दिवस हळदी-कुंकू, दसरा, दिवाळीला जाणं होत असे. आमचं एकमेकांकडं जाणं-येणं कधी थांबलं आता आठवत पण नाही. पण मी ११वीला कॊलेजात गेले आणि पहिल्याच दिवशी परुदादा दिसला, पण आम्ही दोघेही एकमेकांशी बोललो नाही... भीड असेल किंवा आणखी काही... पण मी ओळखायचे तो परुदादा मात्र मला त्यानंतर कधीच भेटला नाही.

वय वर्ष १५
१०वी झाले.. शाळा सुटली... सगळ्या वर्गमित्र-मैत्रिणींची साथ सुटली. काहीजण कॊलेजात बरोबर होते.. पण काहीचजण. २-३ वर्षानंतर आम्ही आमच्या वर्गाचे संमेलन आयोजित केले होते, सगळेजण आवर्जून आले होते. २-३ वर्षानंतर एकमेकांना भेटून सगळे इतके खूष होते ना... ह्यापुढे दर २ वर्षानी आपण असा कार्यक्रम करायचा असा प्रस्ताव पास करून आम्ही सगळे त्यादिवशी त्या हॊटेलातून बाहेर पडलो, परत कधीही न भेटण्यासाठी. आज जवळपास सगळ्या वर्गमित्र-मैत्रिणींची लग्नं झाली आहेत, कित्येकांना मुलं ही झाली आहेत. ज्या २-४ टाळक्यांशी अजून संपर्क आहे त्यांच्याकडून कधीकधी काही खबरी मिळत असतात. शाळेत गेलं की शिक्षकांशी, तिथल्या इतर स्टाफशी भेटी होतात. पण आता आमच्यावेळचे बरेच लोक निवृत्त झाले आहेत. दरवेळी भारतात जाताना ठरवते की ह्यावेळी शक्य तितक्या लोकांना जमवून छोटंसं गेट-टू करायचं. पण आजवर योग आला नाही. नाही म्हणायला माझ्या लग्नाच्यावेळी माझे सगळे शिक्षक आणि काही दोस्त मंडळी आली होती... that is the closest I have been to arranging our get together so far.

वय वर्ष १७
विभा.. माझी बालमैत्रिण... माझी वर्गमैत्रिण...
मी, विभा आणि शालू... शाळेत एकत्र होतो... क्लासमध्ये एकत्र.. कॊलेजात पण एकत्र. तिच्या आईला का कोण जाणे आमची मैत्री खुपायची. काही क्षुल्लक वाद.. काही गैरसमज.. काही चुका... माझी चूक होती की मी आईपासून कधीच काही लपवलं नाही, तिच्या आईसमोर पण खरं तेच बोलले.. विभाची चूक होती की तिनं आईपासून काही गोष्टी लपवल्या.. शालूची चूक होती की तिनं आपली बाजू कधी मांडलीच नाही... आणि आमच्या ह्या चुकांची शिक्षा... आम्ही एक चांगली सखी कायमची हरवली.
मला आठवतं... दहावीला असताना मी अभ्यासच करायचे नाही.. अजून परिक्षेला वेळ आहे.. उद्या करू.. परवा करू.. असं करत करत परिक्षा २ महिन्यांवर येऊन ठेपली तरी माझी अभ्यासाची लक्षणं नव्हती. एक दिवस वर्गात काही तरी प्रश्न विचारला सरांनी आणि मला उत्तर आलं नाही. मला आठवतं विभानं अस्सं धारेवर धरलं होतं मला... त्यानंतर तिनं माझी जागा बदलवून घेतली बाईना सांगून आणि मी तिच्या शेजारी बसायला लागले... तिच्या सहवासाचा परिणाम असेल किंवा तिची धडपड बघून मला स्वतःची लाज वाटली म्हणून असेल, पण मी अभ्यास करायला लागले. माझा बोर्डात १७ वा क्रमांक आला होता ही बातमी पण मला तिच्याकडूनच मिळाली... ती पण बोर्डात आली होती, शालू पण... १२ वी ला ती बोर्डात आली नव्हती, मला माहित होतं तिला खूप वाईट वाटलंय ते, पण माझं आणि शालूचं अभिनंदन करणारी ती पहिली व्यक्ति होती. आम्ही तिघींनी एकत्र घालवलेले ते दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातला अमूल्य ठेवा आहे. आजही तिच्या वाढदिवसाला तिची न चुकता आठवण येते. मनातल्या मनातच मी तिचं अभिनंदन करते. ती आज माझ्यासमोर आली तर मी तिला माझ्या सगळ्या भावना बोलून दाखवू शकेन की नाही कोण जाणे, पण जर ती आजही माझी सखी, माझी विभा असेल तर मला काही बोलून दाखवायची गरजच पडणार नाही ह्याची मात्र मला खात्री आहे...

वय वर्ष २०
इंजिनीअरिंगचं शेवटचं वर्ष..
घर सोडून पहिल्यांदा मी जेव्हा त्या कॊलेजात गेले होते तेव्हा खूप धाकधूक होती मनात.. कसं होणार आपलं... कसे राहणार आपण आई-बाबांना सोडून? पहिल्यादिवशी माझ्यासारखेच बावरलेले कितीतरी चेहरे दिसले मला माझ्या आजूबाजूला... हळूहळू सगळ्यांशी ओळखी होत गेल्या आणि नवीन मित्र-मैत्रिणी मिळत गेले. जीवाभावाच्या रुपा (रूम पार्टनर) मिळाल्या... जीवापाड जपणारे मित्र-मैत्रिणी भेटले... माझ्यावर जीव ओवाळून टाकणारा माझा "सखा" पण तर मला तिथेच भेटला... सुट्टीला घरी गेलो तरी दिवसाआड गप्पा मारल्याशिवाय चैन पडायची नाही आम्हाला. ज्यादिवशी ते कॊलेज सोडलं...खूप रडलो आम्ही सगळे... घराबाहेरचं आमचं घर कायमचं सुटलं होतं त्या दिवशी.. एक कुटुंबच तर होतो आम्ही... आमचं रक्ताचं नातं नव्हतं, पण मनं जुळली होती... ते ऋणानुबंध मनात जपतो आहे आजही...


वय वर्ष २१
साडे तीन महिन्याच्या नोकरीनंतर इन्फोसिस सोडली. फक्त साडे तीन महिने होते मी तिथे, पण जसं पहिलं प्रेम माणूस कधीच विसरत नाही, तशीच बहुदा पहिली नोकरीसुद्धा विसरत नसावा. निदान मी तरी नाही विसरू शकले. कदाचित मला भेटलेल्या दोस्त मंडळींची कृपा असेल, त्यांनी मला ते दिवस कधी विसरूच नाही दिले. अमेरिकेत यायला ६ महिने बाकी होते, काही काम न करता घरी बसणे अगदी अशक्य होतं. एक दिवस माझ्या मित्राशी “नशिब वि. प्रयत्न” असा वाद सुरू होता, मी अर्थातच प्रतत्नांची बाजू घेत होते. आम्ही अगदी हमरीतुमरीवर येऊन भांडत होतो आणि तेव्हा तो म्हणाला, इतका विश्वास आहे ना तुला प्रयत्नांवर तर एक challenge देतो, तू १ महिन्यात infyमध्ये नोकरी मिळवून दाखव. मी पण इरेला पेटले होते. तेव्हा infy म्हणजे एकदम hot favourite होतं, त्या घटनेच्या २२ व्या दिवशी इन्फोसिसचं appointment letter माझ्या हातात होतं. त्या दिवशी आम्ही वाद घातला नसता तर कदाचित इन्फोसिसमधले ते सोनेरी क्षण माझ्या वाट्याला आले नसते. ३ महिन्यांचं training होतं आमचं इन्फोसिसमध्ये. ते संपले, काम नुकतेच सुरू झालं होतं आणि माझी तिथून निघण्याची वेळ आली. त्या ३ महिन्यात आमच्या batch मधल्या लोकांशी इतकी छान मैत्री झाली होती, शिवाय पैसे मिळवण्याची आणि ते मित्र-मैत्रिणींबरोबर मस्ती करत खर्च करण्याची इतकी सवयही झाली होती कि ते सगळं सोडून अमेरिकेला यावं की नाही असा विचार मनात कित्येकदा येऊन गेला. पण बाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी मला इथे येऊन MS करायचंच होतं, त्यांना पैशाच्या चणचणीमुळे जे करता आलं नाही ते मला करायचं होतं, त्यामुळे त्या दोस्त मंडळींना, त्या office ला, तिथल्या गोड आठवणींना कायमचा राम-राम ठोकून मी पुणे सोडलं. आजही त्या batchच्या काही लोकांशी संपर्क होतो, वाटतं साडे तीन महिन्याची दोस्ती, आज इतके दिवस टिकून आहे, काय कारण असावं आम्ही इतके जवळ येण्याचं? उत्तर मलाही माहित नाही… पण त्यांचं माझ्या आयुष्यात असणं खूप सुखद आहे हे नक्की!

वय वर्ष २४
MS पूर्ण करुन मी नोकरीसाठी ते गाव सोडलं.
मी तिथे आले तेव्हा किती बावरले होते. नवीन देश, नवी भाषा, नवे लोक… आपलं असं काहीच नव्हतं. वाटत होतं नक्की योग्य निर्णय घेतला ना मी इथे येऊन? घरची आठवण येत होती, इथे आपला निभाव कसा लागणार अशी भितीसुद्धा वाटत होती.
मला न्यायला एअरपोर्टवर आमच्या univचे काहि देसी लोक आले होते. त्यांनी आमची राहण्याची व्यवस्था तिथल्या senior मुलींच्या घरी केली. त्यांनी इतकी काळजी घेतली आमची, की वाटलं ह्यांचं नि आपलं जन्मजन्मांतरीचं नातं असावं. तिथल्या माझ्या रु.पा., माझे इतर मित्र-मैत्रिणी, आम्ही सगळेच घरापासून दूर आपले लोक शोधत होतो, मूळापासून उपटलेल्या झाडासारखी काहिशी अवस्था होती, नवीन जागी रुजायला आपलेपणाचं खत-पाणी हवं होतं, आधार हवा होता फांद्यांना वर चढायला, आणि तो आम्हाला मुबलक मिळाला एकमेकांकडून… मैत्रीच्या रुपानं… कितीतरी चांगले-वाईट क्षण share केले आम्ही, कित्येकदा खांदा दिला एकमेकांना रडण्यासाठी, कित्येकदा celebrateही केल्या एकमेकांच्या achievements. मी काय, आम्ही सर्वांनीच ते गाव एक-एक करुन सोडलं, ते तर विधिलिखित होतं, ज्या दिवशी त्या गावात आम्ही पहिलं पाऊल ठेवलं होतं तेव्हाच माहित होतं की आम्ही काही दिवसांचा पाडाव टाकतो आहे इथे, पण तरी आमची मूळं आमच्याही नकळत तिथे खोलवर रुजली, त्याचं काय? “Out of sight, out of mind”.. ऐकली आहे ही म्हण कधी? खरी आहे.. मी अनुभवली आहे.. मैत्री करणं सोपं असतं, टिकवणं अवघड… आणि आपल्यातलं अंतर जसं वाढत जातं तसं ते आणखी अवघड होत जातं. पण असेही काही लोक असतात जे अशा परिस्थितीतही मैत्री टिकवून ठेवतात.. माझ्या सुदैवानं मला असेही लोक भेटले आहेत and I am happy I have them in my life.

आज...
पुढच्या महिन्यात माझी एक खूप लाडकी मैत्रिण आमचं गाव सोडून जाणार आहे, तिच्या नव~याला टेक्सासमध्ये नोकरी मिळाली आहे. इथे आलो तेव्हा ओळखीचं असं कुणीच नव्हतं. मराठी मंडळ, मायबोली वगैरेंच्या कृपेनं काही मराठी लोक भेटले, सगळे साधारण एकाच वयाचे होतो, wave lengths जुळल्या आणि मैत्री फुलत गेली. मग सणांना भेटणं, एकत्र हळदी-कुंकवासारखे कार्यक्रम करणं, shoppingला जाणं, girls night outs करणं, trekking, dining out असं करत करत कधी सख्ख्या मैत्रिणी झालो कळलं पण नाही. आज पुन्हा त्या थव्यातली २ पाखरं उडून जातील... नवीन थव्याला जाऊन मिळतील, पण आमच्या थव्यातल्या त्यांच्या जागा कायम रिक्त राहतील.

Thursday, April 13, 2006

दुवा

परवा आजी गेली. अगदी अचानकच. फारशी आजारी होती असंही नाही, पाय दुखत होते म्हणून दवाखान्यात नेलं आणि काही निदान होण्यापूर्वीच तीव्र झटका येऊन ती गेलीसुद्धा. मी एका मीटिंगमध्ये होते, ते पण शिकागोमध्ये, फोन बंद होता, सकाळी ९ च्या आसपास फोन आला होता, पण निरोप मिळाला तेव्हा संध्याकाळचे ५ वाजले होते. अर्थात आधी निरोप मिळाला असता तरी मी काही करु शकले असते असे नाही म्हणा. लगेच ७ च्या विमानानं घरी यायला निघायचं होतं. भारतात खूप रात्र असल्यामुळे लगेच फोन करणे ही शक्य नव्हते. घरी पोचले तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते. तेव्हा फोन केला. आजी गेल्याला १८ तास होऊन गेल्यावर.. जागेतल्या, वेळेतल्या अंतरामुळे किती हतबल होतो ना माणूस? फोनवर आजोबांशी बोलले, तर त्यांनी विचारलं "तुला बातमी मिळाली ना? आता मला भेटायला येशील ना गं?" काय उत्तर होतं माझ्याकडं ह्या प्रश्नाचं? "नाही येऊ शकत" असं सांगून त्यांचं मन दुखवायचं? की "येईन हा" असं खोटं आश्वासन द्यायचं? माझ्या तोंडून शब्दच फुटेनात. आईच्या लक्षात आलं की काय कोण जाणे, पण तिनं आजोबांकडून फोन काढून घेतला. पण निःशब्दतेतले ते ४ क्षण खूप त्रासदायक होते. इतकी हतबलता, इतका दुबळेपणा मला कधीच जाणवला नव्हता. माझ्या आजोबांचं आयुष्य एका क्षणात रितं झालं होतं, ६५ वर्षांचा संसार संपुष्टात आला होता, त्यांची लाडकी नात त्यांचं दुःख वाटायला येईल एवढीच त्यांची अपेक्षा होती, पण ती येऊ शकत नव्हती कारण... कारण आपल्या स्वप्नांच्या मागे धावताना ती आपलं घर, आपली माणसं जगाच्या दुस~या टोकाला सोडून आली होती. "काय कमावलं आणि काय गमावलं" हे द्वंद्व इतर लाखो अनिवासी भारतीयांप्रमाणे माझ्या मनातही बरेचदा चालतं. चालत राहणार. पण पायात इतक्या बेड्या मी माझ्या हातानं अडकवून घेतल्या आहेत की पाशमुक्त व्हायला काही काळ जाईलच. परत जायचंच आहे, हा निर्णय बदलणारही नाही. पण म्हणतात ना, वेळ यावी लागते, ती वेळ अजून आलेली नाही हे नक्की. ती वेळ येण्यापूर्वी माझ्या आजीची जाण्याची वेळ आली हे दुर्दैव.. पण ती जाण्यापूर्वी काही दिवसच मी तिला भेटले होते, अगदी २-३ महिन्यापूर्वीच.. मागच्या वर्षीच आमची चक्कर झाली होती भारतात, पण तरिही ह्यावर्षी पुन्हा जायचं ठरवलं आम्ही अचानकच. कदाचित तिला भेटणं माझ्या नशिबात असावं.. काल आम्ही भारतात असतानाचे फोटो बघत होते, आजी-आजोबांबरोबरचा आमचा फोटो.. पुन्हा कधीच मी तिला बघणार नाही, ही भावना भयंकर वाटली मला त्याक्षणी, पण तेच सत्य आहे, कटू असले तरिही... तिचे सगळ्यांशी ऋणानुबंध इथवरच होते, ते तोडून ती निघून गेली. आजोबांना एकटं सोडून गेली.. पण आठवणी मागे ठेऊन गेली. आजोळचे आजी-आजोबा तर केव्हाच गेले होते, आता त्या पिढीतला एकच दुवा शिल्लक आहे माझ्या आजोबांच्या रुपात, क्षीण आहे, पण आहे. आणि तो असणे किती आनंददायी आहे ते आज जाणवते आहे, आजी गेल्यावर, एक दुवा निखळल्यावर.