Thursday, October 27, 2016

सखा

(manogat.com वर पूर्वप्रकाशित)

अगदी बालपणापासूनच मला का कोण जाणे पण कृष्णाबद्दल अपार आकर्षण होतं. त्या युगंधराच्या प्रतिमेमागे लपलेला तुमच्या माझ्यासारखा भावुक कृष्ण त्याच्या असामान्य सामान्यतेमुळे आपलासा वाटायचा. कदाचित मोठमोठ्या आदर्शांच्या गर्दीत कृष्ण हरवला नाही म्हणूनही असेल! प्रेमळ पती, पिता, पुत्र, राजा, बंधू ह्या त्याच्या वेगवेगळ्या भूमिकेतली मला सर्वाधिक भावलेली भूमिका म्हणजे भावसख्याची. राधेचा कृष्ण, द्रौपदीचा कृष्ण, दारुकाचा कृष्ण, अर्जुनाचा कृष्ण… कृष्ण सखा!
कदाचित म्हणूनच नात्यांची समज यायला लागल्यापासून सख्याचा शोध मी माझ्याही नकळत सुरू केला. आज युगंधर वाचताना, मला भेटलेल्या नि कालौघात हरवलेल्या माझ्या एका सख्याची अनावर आठवण आली आणि म्हणूनच हा लेख प्रपंच!
घराचा उंबरठा ओलांडून बाहेरच्या जगात आपला खऱ्या अर्थाने प्रवेश होतो तो महाविद्यालयात गेल्यावरच. निदान माझ्या बाबतीत तरी असेच घडले. मित्र-मैत्रिणींपेक्षाही ज्यांना भाऊ-बहिणी म्हणता येईल अशा वर्ग बंधू-भगिनींना, ज्यांनी मला लहानाचं मोठं होताना पाहिलं त्या शिक्षक-शिक्षिकांना सोडून त्या प्रचंड महाविद्यालयाच्या उंबरठ्यावर पहिल्यांदा पाय ठेवला तेंव्हा हृदयाची धडधड किती तरी वाढली होती. बावरल्या मनानं ज्या इमारतीत मी प्रवेश केला होता ती इमारत २ वर्षांनी सोडून जाताना पाय अडखळले ते तिथे भेटलेल्या दोस्त मंडळींमुळेच. माझ्या सख्याची उपाधी ज्याला देता येईल असा एक मित्र मला ह्या महाविद्यालयानेच दिला. खरं सांगायचं तर तेंव्हा जाणवलं ही नव्हतं की त्याचं माझ्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं स्थान आहे, पण आज मागे वळून बघताना, त्याला केवळ मित्र म्हणणे म्हणजे त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईल असं वाटतंय. आयुष्याच्या कित्येक अवघड वळणांवर त्याने मला सावरलं, आधार दिला. माझ्या यशाचं तोंड भरून कौतुक केलं, पण जिथे मी चुकले तिथे कानउघाडणी करायलाही तो कचरला नाही. त्याच्याबरोबर बाइकवरून केलेल्या त्या लांब लांब रपेटी, तास न तास मारलेल्या गप्पा, फक्त त्याला आणि त्यालाच सांगितलेली ती गुपितं.. किती सुंदर क्षण घालवले आहेत आम्ही एकमेकांच्या सहवासात. उच्च शिक्षणासाठी घर सुटलं, गाव सुटलं, तसं आमचं भेटणंही पूर्वीसारखं होईना. पण भेटणं होत नाही म्हणून भावबंध तुटले असते तर त्याला सखा तरी का म्हटलं असतं मी? अभियांत्रिकीच्या त्या ४ वर्षात जेव्हा मला कुणाच्या तरी आधाराची गरज वाटली, एकटेपणा जाणवला प्रत्येक वेळी त्याला हाकेच्या अंतरावर उभा पाहिला. मी काही न बोलताही माझ्या मनातलं जाणायची कला त्याने कुठे आत्मसात केली कोण जाणे. आजही आठवतं.. काही कारणामुळे वाढदिवसाला मला घरी जाणे शक्य नव्हते, मला खूप वाईट वाटत होतं त्या गोष्टीचं. पण अगदीच नाईलाज झाला होता. त्या दिवशी सकाळीच माझ्या नावचं एक पार्सल आलं आमच्या खोलीवर. त्यात एक अतिशय सुंदर पंजाबी सूट होता आणि फुलांचा गुच्छदेखील. मी ज्या टेलरकडून नेहमी कपडे शिवून घ्यायचे त्याच्याकडे जाऊन, त्याच्या जुन्या वह्यांतून मापं मिळवून त्याने माझ्यासाठी तो ड्रेस शिवून पाठवला होता. जे माझ्या आई-बाबांनादेखील सुचलं नव्हतं, ते त्याला सुचावं? आणि सुचल्यावर त्यानं ते अंमलातदेखील आणावं? माझी आणि माझ्या नवऱ्याची, अजितची भेट अभियांत्रिकी करतानाच झाली. मैत्रीतून प्रेमाकडे झालेल्या त्या नात्याच्या वाटचालीचा साक्षीदार बनला माझा तो सखा. ज्या दिवशी मी आणि अजितनं एकमेकांसमोर मन मोकळं केलं, त्याच रात्री मी माझ्या त्या मित्राला फोनवर ही बातमी सांगितली. दुसऱ्याच दिवशी सकाळी मला भेटायला (की माझी निवड पडताळायला?) तो कॉलेजवर हजर झाला. काय गरज होती त्याला इतक्या तत्परतेनं येण्याची? फोनवर त्याच्याशी बोलताना, त्याच्याजवळ मन मोकळं करताना, "तू आत्ता इथं असायला हवा होतास" ह्या माझ्या एका वाक्यासाठी त्यानं इतकी धडपड करावी? अमेरिकेत मी शिक्षणाला आले तेंव्हा मला शिष्यवृत्ती मिळाली नव्हती, त्यामुळं अगदी आवश्यक तेवढाच खर्च करायचा असा मी नियमच घालून घेतला होता. इथं आल्यापासून गरजेबाहेरची एक ही गोष्ट मी विकत घेतली नव्हती, मग नवे कपडे तर फारच लांबची गोष्ट झाली. माझ्याबरोबर तोदेखील त्याच वर्षी इथे शिक्षणासाठी आला होता, पण दुसऱ्या विद्यालयात. त्याला हे समजल्यावर एका नाताळानिमित्त त्यानं मला बरेचसे कपडे भेट  म्हणून पाठवून दिले. त्याच्या ह्या कृत्याचं विशेष वाटण्याचं कारण हे की त्यालासुद्धा तेंव्हा शिष्यवृत्ती मिळाली नव्हती. का केलं त्यानं माझ्यासाठी हे सगळं? कोणतं नातं होतं आमच्यात? तो फक्त एक मित्र होता माझा? नाही, मैत्रीपेक्षाही मोठं काही तरी होतं आमच्यात. एक क्षण असाही होता जेव्हा त्या नात्याला प्रेम म्हणावं का असा विचार आमच्या दोघांच्याही मनात येऊन गेला, पण ते प्रेम नाही हेदेखील लगेचच उमजलं. ह्या क्षणानंतर आमच्या नात्यात पूर्वीसारखा मोकळेपणा राहील की नाही अशी शंका माझ्या मनात आली नाही असं म्हणणं खोटेपणाचं ठरेल. पण अशा घटनांनी डळमळावा असा बंध नव्हताच तो! शिक्षण पूर्ण झालं, नोकरी लागली, आमची लग्नं ही झाली. अंतरं वाढली, तसा संपर्क कमी होत गेला. मात्र संपला नाही. आम्ही अजूनही बोलतो, जेव्हा बोलतो पूर्वीच्याच नात्यानं बोलतो, वागतो. आजही तितकाच मोकळेपणा जाणवतो. पण पूर्वी प्रत्येक बऱ्या-वाईट प्रसंगात ज्या तीव्रतेनं एकमेकांची आठवण यायची, एकमेकांच्या उपस्थितीची अनावर ओढ जाणवायची ती कालपरत्वे थोडी कमी झाली आहे. प्रेम घटले नाही, पण वाढत्या वयानं आणि परिस्थितीनं त्याचा आवेग मात्र नक्कीच कमी केला आहे. आज माझ्या सख्याच्या जागी तो आहे का? खरंच माहीत नाही. पण पूर्वी नक्कीच होता आणि त्याचं तेच रूप मी हृदयात जपून ठेवलं आहे, आयुष्यभर ठेवेन.
त्याची जागा आता कुणी दुसरं घेऊ शकेल की नाही माहीत नाही, पण आज ज्याला मी सखा म्हणू शकते तो केवळ माझा सखाच नाही तर माझा प्रियकर, माझा नवराही आहे. ओळख, मैत्री, प्रेम अशा ह्या प्रवासाने आता लग्नाची वेदी ही पार केली आहे. आयुष्यभर एकमेकांचा साथ देण्याची शपथ आम्ही ८ वर्षांपूर्वी घेतली आणि त्यावर ज्येष्ठांच्या संमतीची आणि आशीर्वादांची मोहर ४ वर्षांपूर्वी लागली. "माझ्या प्रत्येक क्षणात तुझा वाटा अर्धा आहे" असं म्हणणारे आम्ही "माझा प्रत्येक क्षण तुझा नि तुझाच आहे" असं कधी म्हणायला लागलो हे आम्हालाही कळलं नाही. इतर अनेक नात्यांप्रमाणे आमच्याही नात्यानं अनेक चढ-उतार पाहिले. पण त्यातून नातं परिपक्वच होत गेलं. कधी प्रियकराच्या नात्यानं जवळ घेणारा तो, कधी मला बापाच्या मायेनं कुरवाळणारा तो, कधी पूर्वीसारखाच मित्राच्या नात्यानं चिडवणारा तो, तर कधी एखाद्या लहान मुलासारखा बिलगणारा तो.. त्याच्या ह्या सगळ्या रूपामध्ये मला प्रिय असलेलं त्याचं रूप आहे सख्याचं. ह्या पुढे कदाचित माझ्या आयुष्यात दुसरा सखा येणारही नाही. पण माझ्या ह्या दोन्ही सख्यांनी मला जे भरभरून प्रेम दिलंय, ते ह्या जन्मासाठीच काय पुढच्या अनंत जन्मांसाठी पुरेसं आहे. 

No comments: