Wednesday, May 24, 2006

टाइम मशिन

काही दिवसांपूर्वी जुने फोटो बघायची हुक्की आली. लगेच सगळे जुने-पुराणे अल्बम बाहेर काढून मी पसारा मांडून बसले. बालपणी आई-बाबांसमोर केलेली नाटकं, तेव्हाचे टिल्ले-पिल्ले मित्र-मैत्रिणी, शाळेत नाचात मी केलेला कृष्णाचा पार्ट आणि आईने केलेला तो मेक-अप, तो आवडला नाही म्हणून फुरंगटून बसलेली आईची "ती" बाळकृष्ण.. हे आणि त्यानंरची कित्येक ग्यादरिंग, माझ्या भावाचा जन्म, त्याचे लहान असतानाचे फोटो.. (आई ग! कित्ती गोड दिसायचा तो.. आता अगदीच सांडासारखा वाढलाय.) आमचे दोघांचे वाढदिवस, आमच्या ट्रिप्स, आजी-आजोबांची साठी-पंचाहत्तरी, भावाची मुंज, कॊलेजमधले दोस्त लोक, हॊस्टेलवर घातलेले गोंधळ, गोवा, हेद्वी आणि महाबळेश्वरच्या आमच्या ग्रुपच्या ट्रिप्स.. आमचा पहिला valentine's day, लग्न, reception, honeymoon.. काय काय नाही साठलेलं त्या अल्बम्समध्ये!! असं वाटतं माझं सगळं आयुष्य सामावलंय फोटोंच्या छोट्याश्या बॊक्समध्ये! तो उघडला की जणू माझा भूतकाळ समोर उभा ठाकतो, आठवणींवर बसलेली धूळ झटकली जाते आणि पुन्हा जगते मी ते सोनेरी दिवस मनातल्या मनात.
किती मोठी देणगी दिली आहे ना विज्ञानानं आपल्याला. It is kind of a Time Machine, isn't it? गतायुष्याची सैर करायची संधी किती सुलभ आहे आपल्यासाठी.. हो ना?

Wednesday, May 03, 2006

श्रद्धांजली

प्रमोद महाजन गेले. एका उमद्या नेत्याचा असा करुण अंत झाला. आज ना उद्या भारताच्या पंतप्रधानपदावर महाजनांच्या रुपात एक मराठी माणूस आरुढ होईल अशी जी आशा मराठी मनांत होती तिला तिलांजली मिळाली. भाजपासाठी तर हा खूपच मोठा धक्का आहे. पक्षाची धुरा लिलया पेलणारा, शिवसेनेबरोबर युती करण्याचा मुत्सद्दी निर्णय घेणारा आणि महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विधानसभेवर भगवा फडकवण्यात यशस्वी झालेला हा तरुण नेता आज भाजपाने गमावला. महाजनांचा मृत्यु हा त्यांच्या कुटुंबियांसाठी दुःखद आहेच, पण लाखो-करोडो भारतीयांसाठी आणि भारतीय राजकारणासाठी पण हा मोठा धक्का आहे.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!