Friday, March 24, 2006

चाणक्य

काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर “चाणक्य” नावाची मालिका यायची. ह्यावेळी भारतात गेलो होतो तेव्हा त्या मालिकेचा VCD संच आणला. हल्ली रोज रात्री त्याचा एक भाग तरी बघूनच झोपतो. खूपच चांगली मालिका आहे. प्रकाश द्विवेदींनी बराच अभ्यास केल्याचे जाणवते.

सध्या आम्ही अलेक्झांडरच्या आक्रमणाचा भाग बघतो आहे. तो बघताना जाणवलं, आपण १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला भारताच्या इतिहासातला पहिला स्वातंत्र्य लढा म्हणतो, पण पहिला स्वातंत्र्यलढा तर त्याच्या जवळपास २००० वर्षांपूर्वी लढला गेला होता. अलेक्झांडरसमोर राज्यलालसेने आंधळ्या झालेल्या गांधारच्या आंभिराजाने समर्पण केले, शौर्याने लढूनही पुरु राजा हरला कारण त्याच्या मदतीला इतर कुठलेही राजे पुढे झाले नाही, ह्या पराभवानंतर पुरुनेदेखील भारत पादाक्रांत करण्यात अलेक्झांडरची मदत केली. आपले सैन्यबळ त्याला दिले. उत्तरेत अलेक्झांडरने धूमाकूळ घातला होता आणि त्याच्या प्रतिकार करण्याची ताकद एकाही राज्यात नव्हती. एकत्र येऊन प्रतिकार करण्याची त्यांची इच्छा नव्हती. प्रत्येकाने स्वतंत्रपणे लढा दिला आणि हरले, सामूहिक प्रयत्नांची गरज होती पण तसे प्रयत्न अहंकारात बुडालेल्या ह्या शूर राजांनी केलेच नाहीत. पण हे सगळे सुरू असताना, तक्षशिलेचा एक सामान्य शिक्षक, आपल्याला काय त्याचे म्हणून शांत बसला नाही. त्याने संपूर्ण भारत एक राष्ट्र म्हणून संघटित करण्याचा विडा उचलला. लोकांच्या मनात राष्ट्राभिमान जागवला. स्वातंत्र्याचे महत्व त्यांना पटवून दिले. अंतर्गत संघर्षात आपण आपलाच घात कसा करतो आहोत ते राजांना दाखवून दिले. सामान्य शिक्षकाकडूनही उच्च ध्येयाने आणि प्रयत्नांनी काय घडू शकते ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे चाणक्य. त्याच्या ह्या प्रयत्नांनी संपूर्ण उत्तराचल प्रदेश पेटून उठला, यवनांना सळो की पळो करून सोडले ह्या ब्रह्मचारी स्वातंत्र्यसैनिकांनी. त्यांनी उत्तराचल यवनांच्या दास्यातून मुक्त केला. पण ह्या लढ्याचा साधा उल्लेखदेखील नाही आपल्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात. चाणक्य म्हणजे “कुटील राजनीतिज्ञ” इतकीच माहिती होती मला. पुरू म्हणजे “मला राजासारखे वागव” असे अलेक्झांडरपुढे अभिमानाने सांगणारा राजा हेच ज्ञान मिळाले होते मला माझ्या पुस्तकातून. पण त्याच्या ह्या वागण्यासाठी त्याला धिक्कारणारी, ह्यापेक्षा तू अलेक्झांडरला “मला ह्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणा~या सैनिकासारखा वागव” असे उत्तर दिले असते तर माझ्या वडिलांचा मला जास्त अभिमान वाटला असता असे म्हणणारी कल्याणी मात्र त्या पुस्तकांच्या पानांतून कधी भेटलीच नाही. आजही आपण मराठी, गुजराथी, तामिळ, तेलुगु, बिहारी, पंजाबी म्हणून ओळख करून देतो स्वतःची. ऐक्य नाही आहे आपल्यातच. पण ह्या गोष्टीचा धोका ओळखून २००० वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीने राष्ट्र उभारणीचे कार्य हाती घेतले होते आणि ते तडीलाही नेले त्याचा मात्र साधा उल्लेखही नाही आपल्या इतिहासात. प्रत्येकवेळी ती मालिका बघताना वाटत रहातं, आजही अगदी तशीच परिस्थिती आहे, राष्ट्र संघटित करणा~या चाणक्याची आजही गरज आहे, पण असे निःस्वार्थी, द्रष्टे लोक राष्ट्राच्या इतिहासात क्वचितच जन्माला येतात. त्यांच्यात होते ते सामर्थ्य आपल्यात नाही, तसा स्वार्थत्याग करण्याची आपली तयारीही नाही, पण निदान आपल्या पुढच्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करून देण्याची जबाबदारी तरी निभावू शकतोच की आपण.

Monday, March 20, 2006

अमेरिकन रंगपंचमी

साल २००१, रंगपंचमीचा दिवस
भारत सोडल्यानंतरची ही पहिलीच रंगपंचमी. भारतातल्या रंगपंचमीच्या आठवणी अजून ताज्याच होत्या. त्यामुळे रंग खेळण्याची खूपच उर्मी होती. सगळेच विद्यार्थी, त्यामुळे उत्साह ओसंडून वाहत होता. त्यात एका मित्राची बहिण नेमकी होळीदरम्यान अमेरिकेला आली आणि तिच्याबरोबर आमचे रंगही आले. होळीच्या दिवशी आम्ही ठरल्याप्रमाणे काही मित्रांच्या घरी (जे स्वतःला स्टाईल बॉईज़ म्हणवत, आपण हवं तर त्यांना SB म्हणू) जरा लवकरच जमलो. मी आणि माझ्या २ रु.पा. आणि हे ४ SB, आम्ही सगळा कार्यक्रम ठरवण्यात आघाडीवर होतो, त्यामुळे स्वयंपाकाची जबाबदारी आमच्यावरच होती. आम्ही पोहोचेपर्यंत Aने बराचसा स्वयंपाक केलाच होता. मालपुआ, छोले, पु~या, मसाले भात... म्हणजे एकूण जेवणाची ऐष होती. हळूहळू लोक जमायला लागले आणि रंग खेळायला सुरूवात झाली. पार्कींग लॉटमध्ये आम्ही २-३ तास अगदी धुमाकूळ घातला. सगळेजण रंगले होते. काही अमेरिकन मित्रमैत्रिणीसुद्धा संकोचत का होईना पण त्या गोंधळात सामील झाले होते, समोरच्या सोरोरोटीतून काही मुली अध्येमध्ये डोकावून बघत होत्या. थोडक्यात भारतात जशी जोरदार चाललेली असते ना रंगपंचमी अगदी तशीच ती इथेही सुरू होती. सगळे रंगले होते, भिजले होते, त्याच अवस्थेत जेवण करून आम्ही पांगलो. पण खरी गंमत तर ह्यानंतरच सुरू झाली.
संध्याकाळी आपार्टमेंटचा मॅनेजर उगवला. सगळा पार्किंग लॉट रंगलेला होता, जिन्याच्या आसपासही रंग दिसत होता. तो भलताच उखडला. त्याने SBsना धारेवर धरले. दुस~या दिवशी सकाळीच तो नुकसानीचे estimates घेऊन आला. पार्कींगमध्ये लॉट पाडताना आखलेल्या २ रेषा रंगल्या होत्या. त्या रंगवणं भाग होतं, त्या रंगवल्या की त्या आणि इतर रेषा वेगळ्या दिसणार म्हणून पूर्ण लॉट रंगवावा लागणार होता (अमेरिकेत सगळं नियमाप्रमाणं असतं ना, कदाचित रंगाबाबतही काही नियम असतील, आपल्या भारतात तर कुणी लक्षही दिलं नसतं. जय भारत!!). पार्कींगजवळच्या एका भिंतीवर रंगाचे शितोंडे उडले होते, म्हणून पूर्ण बिल्डींग आणि जो न्याय पार्कींगच्या रेषांना तोच इथे, म्हणून कॉम्प्लेक्समधल्या सगळ्या इमारती रंगवायच्या होत्या, शिवाय जिन्यातले रेलिंग, अपार्ट्मेंटचा आतला भाग, सगळं मिळून १५-१८ हजाराचं estimate होतं. हा आकडा ऐकून भोवळ येणंच बाकी राहिलं होतं. थोडक्यात आमची चांगलीच जिरली होती. विद्यार्थी असताना इतके पैसे जमवणं अशक्य होतं. पण काहीतरी मार्ग काढणं भाग होतं. हे सगळं स्वच्छ झालं असतं तर आमची सुटका झाली असती. म्हणून k-martमधून खूप सारे cleaning supplies आणले आणि SBs कामाला लागले. आमचं सगळ्यांचं नशिब थोर, आम्ही वापरलेला रंग म्हणजे साधा गुलाल होता, थोडी घासाघाशी केल्यावर तो निघाला आणि आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. पण तेव्हापासून मात्र आम्ही कानाला खडा लावला. त्यानंतर दरवर्षी रंगपंचमी आली आणि तशीच कोरडी निघूनही गेली.

साल २००६, रंगपंचमीचा दिवस
ह्यावर्षी आमच्या मराठी मंडळानं रंगपंचमीचा कार्यक्रम ठरवला होता. थोडी थंडी असल्यामुळं जावं की न जावं ठरत नव्हतं. पण रंगपंचमीचा सण साजरा करायला मिळणार, रंगायला मिळणार म्हटल्यावर मात्र रहावलं नाही. आम्ही तसे थोडे उशिराच पोचलो, बरेच लोक जमले होते, एकाचाही चेहरा ओळखायला येत नव्हता. तिथे पोचल्याक्षणी आम्हीही तसेच रंगवले गेलो. तासभर रंगात खेळून घरी परत आलो.

परत आल्यावर रंग धुताना जाणवलं मला रंग जाईल ना ह्याची खूप चिंता वाटत होती. लहान असताना रंग गेला तर मी पुन्हा हात रंगात घालायचे. शाळेत रंगलेले हात आणि चेहरा घेऊन जाणं मला खूप आवडायचं. २ आंघोळीनंतरही रंग गेला नाही, म्हणजे मी किती मजा केली असेल बघा, असं मित्र-मैत्रिणींना सांगताना अभिमान वाटायचा आणि आता, रंग गेला नाही तर ऑफिसात लोक काय म्हणतील ह्याची चिंता सतावत होती. नखाचा रंग गेला नाही म्हणून बाजारात भाजी घेताना मी हात लपवत होते. का कोण जाणे, पण रंगपंचमीची मजा पूर्वीसारखी नाही आली. अर्थात रंगात भिजताना तो तास-दिड तास मी भान हरपले होते. पण नंतर इतक्या काळज्या होत्या की काय गरज होती रंगात जायची असं वाटून गेलं. अशी कशी बदलले मी? मला रंगांचं वावडं झालं... छे!!

Tuesday, March 14, 2006

होळी रे होळी

होळी रे होळी... पुरणाची पोळी...
पूर्वी होळी आली की अश्या आरोळ्या सर्रास ऐकायला यायच्या आणि अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत त्यात माझाही आवाज सामावलेला असायचा. होळीचा सण म्हणजे खरं तर अभ्यासाचा परमावधी म्हणतात तो काळ. पण होळी जवळ आली की मात्र आम्ही अभ्यासाला दांडी मारायचो. होळीसाठी सरपण गोळा करण्याचे उदात्त कार्य करण्यात वेळ कसा निघून जायचा ते कळायचेदेखील नाही. मग माळ्यावरून मागच्या वर्षीच्या टिमक्या, ढोलकी उतरवली जायची. बरेचदा ओलसरपणामुळे त्यातून नीट आवाज यायचा नाही. मग शेकोटीवर ती तापवायचा कार्यक्रम व्हायचा. एवढं करून ती ठीकठाक वाजली तर नशिब म्हणायचं आई-बाबांचं, कारण ती नाही वाजली तर नवीन टिमकी, ढोलक्यांची खरेदी ठरलेली असायची. एकदा टिमकीचा प्रश्न मिटला की ती वाजवण्यासाठी चांगली काठी शोधण्याचा कार्यक्रम सुरु व्हायचा. चांगली जाडजूड, वाळून घट्ट झालेली काठी मिळाली की देव भेटल्याचा आनंद व्हायचा. अशी सगळी साग्रसंगीत तयारी झाली की मग ह्या टिमक्या किती जोरात वाजतात ह्याचे प्रात्यक्षिक सगळ्या गल्लीला ऐकायला मिळायचे. होळीच्या आदल्या रात्री टिमकी आणि काठी शेजारी घेऊनच आम्ही झोपी जायचो. होळीचा दिवस उगवायचाच पुरणाचा गोड वास घेऊन. शेजारीपाजारी, आमच्या घरी, अगदी सगळ्यांकडे पुरणाचा बेत असायचा. आजीची गडबड पहाटेपासूनच सुरू झालेली असायची. सकाळीच ती दारासमोर रस्त्याचा थोडासा भाग शेणानं सारवून ठेवायची. कामवाल्या मावशींनी आणून दिलेल्या शेण्या बाहेर काढून ठेवायची. आईसुद्धा नेहमीपेक्षा थोडी लवकरच उठायची. आम्ही पण उठून आंघोळी आटपून होळी पेटवायच्या तयारीला लागायचो. शेजारच्या ३-४ घरातले सगळे लोक एकत्र जमायचे आणि दारातली ही छोटी होळी पेटवण्याचा कार्यक्रम पार पडायचा. टिमक्या वाजवत, बोंबा मारत आम्ही होळीला प्रदक्षिणा घालायचो. ह्या होळीला पोळीचा नैवेद्य दाखवला जायचा. होळीत टाकलेली पोळी शेजारचे अण्णा होळीत हात घालून बाहेर काढायचे, तेव्हा अण्णांना भिती वाटत नाही, त्यांना भाजतही नाही, ते खरंच किती महान आहेत वगैरे विचार मनात येऊन जायचे. ही जळालेली करपट चवीची पोळी अण्णा सगळ्या मुलांना प्रसाद म्हणून वाटायचे आणि मग सगळे आपापल्या घरी पोळीवर ताव मारण्यासाठी परतायचे. तुडुंब भरलेल्या पोटांनी मग दुपारी पत्ते, साप-शिडी वगैरे डाव रंगायचे. आई "अभ्यासाला बसा" वगैरे सांगायचा प्रयत्नही करून बघायची. पण तिला कुणी दाद देणार नाही हे तिलाही माहित असायचे. संध्याकाळ झाली की पार्कातल्या मोठ्या होळीची तयारी सुरू व्हायची. तिथं आम्हाला फारसा वाव नसायचा. एखादा दादा किंवा त्यातल्या त्यात तरुण काका इथे आघाडीवर असायचे. चांगली पुरुषभर उंचीची होळी रचली जायची. त्याच्या मधोमध एखादे वाळलेले झाड ठेवले जायचे. मग एखाद्या काकांच्या हस्ते ती पेटवली जायची. इथे बोंब मारण्यात मोठेसुद्धा सामील व्हायचे. काही धीट मुलं ह्या होळीवरून उड्या मारायची, निखा~यांवरून पळून दाखवायची. आम्ही मात्र आ वासून त्यांच्या ह्या करामती बघत राहायचो. होळी विझत आली की लोक पांगायला लागायचे, पण आम्ही मात्र आईच्या रागीट आवाजातल्या हाका येईपर्यंत आमच्या टिमक्या वाजवत तिथेच थांबलेलो असायचो. होळीचा दिवस पुन्हा पुरणपोळ्या चापून संपायचा. पण आम्ही मात्र रंगपंचमीचे विचार मनात घोळवतच झोपी जायचो.
आज ती होळी कुठंतरी हरवून गेली आहे. ऒफिसात ई-पत्रातून आलेल्या फोटोतच होळी बघण्याची वेळ आलेली आहे. काही मिळवण्यासाठी काही गमवावेही लागते म्हणतात. पण अमेरिकेचे "सुवर्णस्वप्न" साकारण्यासाठी मी मात्र अश्या हजारो छोट्याछोट्या आनंदांची होळी केली आहे. कधी वाटतं इतकं गमावण्याच्या लायकीचं होतं का हे स्वप्न? घरी नक्कीच परतायचं आहे, पण "कधी?" हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.

Wednesday, March 08, 2006

महिला दिन

आज ८ मार्च. जागतिक महिला दिन. महिलांच्या कर्तृत्वाला वंदण्याचा दिवस. पण अजूनही लोक वंदतात ते "हृदयी पान्हा नयनी पाणी" रुपातील बंदिनीला. "त्यागमूर्ती, वात्सल्यसिंधू, प्रेमस्वरुप" मातेला, पत्नीला, स्नुषेला, कन्येला. तिच्यात बुद्धिमान, कर्तृत्ववान, स्वतंत्र विचारांच्या मेधा पाटकर, अरुंधती रॊय, सुधा मूर्ती, इंदिरा, सोनिया ह्यांच्या प्रतिमा कुणालाच दिसत नाहीत. आजही स्त्रीला पूर्णपणे समजून घेतले नाही आहे समाजानं. त्यांना ती जशी हवी होती, चूल आणि मूल सांभाळणारी, त्याच रुपात तिला बघून स्वप्नरंजन करून घेण्यात दंग आहेत सगळे. पण आजची स्त्री तशी नाही. आजची स्त्री श्यामची आई नाही, सीता-रुक्मिणी नाही, सावित्री-रेणुकाही नाही, मग तरिही तिच्यावर ह्या भूमिका का लादल्या जाव्यात? आजच्या दिवशीतरी तिच्यातल्या ख~या स्त्रीला ओळखा, तिच्या त्या रुपाचा गौरव करा, तुमच्या मनातल्या त्या पौराणिक प्रतिमेचा नको.

Thursday, March 02, 2006

सख्या रे...

मला वाटतं... चालत राहावे तुझा हात धरून, न संपणा~या वाटेवर, क्षितिजाला टेकलेल्या आभाळापर्यंत. वाटेत खाच-खळगे येतील, पायाला काटे रुततील, थकव्यामुळे पाऊल उचलणेदेखील अवघड वाटेल. पण तेव्हा तू असशील सावरायला. कधी आकाशात इंद्रधनुष्य दिसेल, कधी तारकांची रांगोळी, पाखरांचे उन्मुक्त थवे नि कधी जलधारा आणि विजांची एकत्र आतिषबाजी आणि हे सगळे तुझ्या खांद्यावर डोकं टेकून मी बघेन. आपण भांडू कधी कधी, चिडूदेखील एकमेकांवर, मी म्हणेनसुद्धा की "तुला माझी काही किंमतच नाही मुळी", पण तू मला जवळ घेशील आणि क्षणात सगळे वाद विरून जातील तुझ्या आश्वस्त मिठीत. कधी वसंत येईल आणि रंगात न्हालेला निसर्ग तुला मोहून टाकेल, मग सुरेल शीळ घालत तू मला जवळ ओढशील आणि मी लटकंच रागावत तुझ्या कुशीत शिरेन. कधी दिवस रंगून येतील ओल्या मेंदीत, तर कधी काळवंडून येतील ग्रहणानं, पण तरिही असंच चालत रहायचं आहे मला.. तुझ्याबरोबर...तुझा हात धरून...क्षितिजाला टेकलेल्या आभाळापर्यंत आणि त्याच्या पल्याडदेखील...