Tuesday, February 14, 2006

प्रेमोत्सव

एकदा वपुंच्या एका कथेत वाचले होते "जीवनाचा उत्सव करावा", खर्डेघाशी करत, रडत खडत तर सगळेच जगतात, पण छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवत, तो आनंद एखाद्या मोठ्या उत्सवासारखा साजरा करत जगणारे जीव आगळेच. आज १४ फ़ेब्रुवारी, व्ह॓लेंटाईन डे. प्रेम साजरा करण्याचा दिवस. आता हा दिवस साजरा करणे म्हणजे काहितरी आगळीक असावी असे वागत आहेत कित्येक राजकीय पक्ष. आत्ताच वाचले, दुकानात, बागेत, रस्त्यावर एकत्र फिरणार्या जोडप्यांना खोटे लग्न विधी करायला लावले काही धेडगुजरांनी, ज्यांनी नकार दिला त्यांना राखी बांधायला लावली, आता त्यांचे फोटो त्यांच्या घरी पाठवणार आहेत म्हणे. किती वेडेपणा आहे हा? त्या जोडप्यातले किती तरी लोक अगदी चांगले मित्र-मैत्रिणी असतील, काही जण नुसते ओळखत असतील एकमेकांना. बहिण-भाऊ आणि नवरा-बायकॊ ही २च नाती असू शकतात का मुलामुलींमध्ये? विशुद्ध मैत्री असेही काही असते हे माहित नसावे ह्या लोकांना बहुदा. कित्येकजण म्हणतात प्रेमासाठी असा दिवस कशाला राखून ठेवायला हवा? पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे हे, ह्या दिवसाचे बाजारिकरण होते आहे वगैरे वगैरे... पण मी म्हणते आपण जर वटपौर्णिमा साजरी करू शकतो, भाऊबीज-रक्षाबंधन साजरे करू शकतॊ तर हा दिवस का नाही? बाजारीकरणाचं म्हणाल तर ते कुठे नाही? दिवाळी असो, गणेशोत्सव असो, रंगपंचमी असो, कोणता सण आपण आज पारंपारिक पद्धतीनं साजरा करतोय? so called संस्कृतीरक्षकांनो, एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करण्याच्या ह्या सणाला पाश्चात्त्यांचे अंधानुकरण म्हणून डावलण्यापेक्षा आपल्या मुलांना श्लोक-स्तोत्र शिकवणे, त्यांच्याशी मराठीत बोलणे कमीपणाचे मानणार्या मम्मी-पप्पांना संस्कृतिचे धडे द्या, त्यांना आपल्या परंपरांची जाणीव करून द्या. त्याने जास्त संस्कृतिरक्षण होईल.

जाऊ दे.. माझे म्हणाल तर जीवनाचा उत्सव करायला मला आवडते. माझे त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करण्याची ही सुवर्णसंधी निदान मी तरी गमावणार नाही आहे. ज्यांना ह्या दिवसाबद्दल जिव्हाळा आहे, त्या सर्वांना आजच्या दिवशी हार्दीक शुभेच्छा!!

1 comment:

दिलीप कुलकर्णी said...

एकदमच छान. अगदी सडेतोड लिहीले आहे. कुठून तरी काहीतरी विषय उकरुन काढायचा अन प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा, दुसरे काय? करुन भागुन थकले आणी देव पुजेला लागले. सगळा नाटकीपणा.
बर काय साधले त्यांनी हे त्यांनाही सांगता येणार नाही. प्रेम म्हणा वा निखळ मैत्री अशा धमक्यांना घाबरते थोडीच. कोणत्या तोंडाने सांगणार की `महाराष्ट्र' हे पुरोगामी राज्य आहे म्हणून?