काकांनी परवा जे काही सांगितले त्यात किती तथ्य होते कोण जाणे, पण ती कल्पना मात्र खूप आवडली मला. खरेच असेल का हा कलियुगाचा अंत? खरेच परतून येईल का सत्ययुग? काका म्हणाले, सोने शुद्ध करताना ते मुशीत तापवतात, मग त्यातल्या अशुद्धी वरती तरंगायला लागतात, त्या बाहेर काढल्या की जे उरते ते असते शुद्ध सोने. अगदी १००% खरे सोने. सध्या आपले जग ह्या मुशीत आहे. कलियुग संपतेय, त्यामुळे आता जगातल्या सगळ्या वाईट गोष्टी नष्ट झाल्या पाहिजे. त्यासाठी सुनामी, वादळे, पाऊस, हिमवादळे सुरू आहेत, जगात सगळी उलथापालथ होते आहे. माणूस माणसाचा वैरी झाला आहे. सगळे जग सैरावैरा धावते आहे मनःशांतीच्या शोधात. पण ह्या सगळ्याचा अंत जवळ येतोय. आणखी काहिशे वर्षात सत्ययुग सुरू होईल. मानवता पुन्हा त्या शुद्ध रुपाला जाऊन पोहोचेल. अर्थात हे सगळे बघायला तुम्ही आणि मी नसणार म्हणा.,, कोण जाणे असू सुद्धा, पुनर्जन्म खरेच असेल तर असू सुद्धा, पण मी ह्या सोन्यातली अशुद्धी असेन तर? तर.. सत्ययुग तुम्हाला लखलाभ असो… मी आपली कलियुगाचीच मजा लुटावी म्हणते…
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment