Tuesday, February 21, 2006

भ्रष्ट मी

काही दिवसांपूर्वी ‘रंग दे बसंती’ पाहिला. तो चित्रपट कसा आहे, त्याचा शेवट योग्य होता की नाही, हिंसा भ्रष्टाचाराचे उत्तर असू शकते का ह्या वादांमध्ये मला सध्यातरी स्वारस्य नाही. पण त्या चित्रपटाने मला स्वतःच्या कर्तव्याची जाणीव करून दिली हे मात्र खरं आहे. एखादी गोष्ट खटकली तरी “आपल्याला काय करायचंय?” ही आपली भूमिका तितकीच राष्ट्रविघातक आहे जितकी ते कृत्य करणा~याची वृत्ती. मग ते कृत्य लाखोंचा गैरव्यवहार असो की चालक परवान्यासाठी दिलेली १०० रुपयांची लाच.

मागच्या महिन्यात भारतात गेलो होतो. जाताना दिरासाठी होम थिएटर नेले होते. बरीच महाग वस्तू होती. अपेक्षेप्रमाणे विमानतळावर कस्टमच्या लोकांनी अडवले. त्यांना २० डॊलरची लाच देऊन आम्ही बाहेर पडलो. मी स्वतः ते कृत्य केले नाही, माझ्या नव~याने केले. माझा विरोध त्याने डावलला असता हे माहित होते म्हणून मी त्याला सांगण्याचा प्रयत्नही केला नाही. पण तसा प्रयत्न मी करायला हवा होता हे मात्र नक्की. अजूनही मला बोच आहे मी एका गुन्ह्यात सहभागी झाले ह्याची. मी प्रयत्न केला असता आणि मग त्याने माझे ऐकायला नकार दिला असता तर गोष्ट वेगळी होती, पण मी न लढता माघार घेतली. हा अक्षम्य गुन्हा होता. थोडक्यात मी भ्रष्टाचाराला हातभार लावला. माझ्या आयुष्यात इतक्या उघडपणे भ्रष्टाचार पाहण्याची ही पहिली वेळ. आणि मी ते केवळ पाहिले नाही तर त्यात सहभागी झाले. का?

परत आल्यावर हा चित्रपट पाहिला आणि गुन्ह्याची जाणीव आणखी तीव्र झाली. ह्यापुढे असे प्रसंग आले तर आपण वाकायचे नाही हे ठरवले आहे. “हे असंच चालायचं” असे म्हणून ह्या भ्रष्ट “सिस्टम”चा आपणही एक हिस्सा बनायचे नाही. २० डॊलरची लाच देत देत आमच्या जाणिवा इतक्या बोथट होतील की उद्या २० हजाराची लाच देतानाही मन कचरणार नाही. मग आम्ही आमच्या मुलांसमोर काय आदर्श ठेवणार? त्यांना कुठल्या तोंडानं सांगणार हे चूक आहे म्हणून. फ़क्त लाच न घेणे म्हणजे प्रामणिकपणा नव्हे, लाच न देणे हासुद्धा त्याचा महत्त्वाचा हिस्सा आहे.
असो. ह्या सगळ्यातून एक गोष्ट मात्र समजली की अजून तरी मी पूर्णपणे विसरले नाही आहे प्रामाणिकपणाचे धडे. योग्यायोग्यतेची थोडीफार जाणीव अजून शिल्लक आहे आणि चूक केल्यावर अजूनही आपलंच मन खातं आहे. थोडक्यात अजून निगरगट्ट व्हायला वेळ आहे तर.

1 comment:

Anonymous said...

Well, I appreciate your feelings towards corruption. But in my opinion, the corruption in the system will reduce only if correct incentives are put in place. I am sure that a few people like you will always oppose corruption, but it can only be removed by sound economic policy giving right incentives to the customs officers.