@copyright manogate.blogspot.com - Do not use without permission
जिजाऊ:
मी जिजाऊ. हिंदवी स्वराज्याची राजमाता.
शिवबाला घडवण्यापेक्षा मोठी जबाबदारी स्वराज्याने माझ्यावर टाकली होती, ती शंभूला घडवण्याची .
सईबाई वारल्यानंतर २ वर्षाच्या शंभूसाठी मीच आई होते आणि मीच बाबा.
मराठयांचा हा युवराज केवळ शूर वीरच नव्हता तर कलेचा जाणकारदेखील होता.
संस्कृतबरोबरच इतर ८ भाषा त्याला येत. तो उत्तम कवी होता. लेखक होता.
शिवाजीराजे :
मी शिवाजीराजे भोसले.
शंभूबाळाचा पिता. पण त्याही आधी रयतेचा माय-बाप.
रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेचांचे बाळकडूच मिळाले होते जणू शंभूराजाना.
शंभू अवघा ८ वर्षाचा असताना त्याला राजा जयसिंगांकडे पाठवावे लागले, हिंदवी स्वराज्यासाठी हा त्याग गरजेचा होता.
रयतेचा हा लाडका युवराज जिजाऊंच्या मृत्यूनंतर मात्र पोरका झाला. भरकटला. मुघलांना जाऊन मिळाला.
पण आपली चूक उमजून तो परतला, तो मुघलांचा कर्दनकाळ बनूनच.
संभाजी:
मी संभाजी, आऊंचा बाळ, राजांचा छावा.
मला इतिहासाने कधी उद्दाम, कधी बेजबाबदार म्हटले तर कधी शूर, वीर, धर्मरक्षक .
मी एक राजा होतो, उत्तम शासक होतो, पण साहित्यिकही होतो, कवीही होतो, धर्माचे ज्ञान होते मला, अनेक भाषा येत होत्या.
मी चुकलो, पण त्यातून खूप काही शिकलो. मी भरकटलो, पण सावरलो देखील .
२-४ शब्दात वर्णन करता येईल इतका सोपा-सरळ कधीच नव्हता हा मराठयांचा युवराज.
ऐकायाचेय तुम्हाला कोण होता संभाजी.. ऐका ...
श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौ रिव राजते | यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||
धर्मवीर, कर्मवीर, राजा शंभू
जिजाऊचा शंभूबाळ
शिवरायांचा संभाजी
रयतेच्या युवराज
यवनांचा काळ
आलमगिरीला पाणी पाजणारा
मराठी ह्रदयसम्राट संभाजीराजे भोसले
(तुतारी)
(गाणे)
पहिले नमन माझे संतांना
नामदेव ज्ञानरायांना
दूसरे नमन करतो स्वराज्याला
जीजाऊला शिवाजी राजाला
(~ गाणे)
आणि तिसरे नमन तुम्हा रसिकांना. ही शौर्यगाथा ऐकायला तुम्ही आज आलात, तुमचे मन:पूर्वक आभार
(गाणे)
पहिले नमन माझे संतांना
दूसरे नमन करतो स्वराज्याला
तिसरे नमन रसिक राजाला
सांगतो कथा ऐकावी आज
छावा सिंहाचा शंभुमहाराज जी जी जीSS शंभुमहाराज जी जी जी जी जी जीSS
(~ गाणे)
शंभू अगदी लहान असतानाच सईबाईंचा मृत्यु झाला.
जिजाऊनी शंभूला आपल्या पदराखाली घेतले.
जसे शिवबाला घडवले तसेच शंभूला देखील घडवले.
(गाणे)
मुग़ल दरबारी गेले शिवराय, शंभू संग, अवघे नऊ वय,
औरंगाने केला पहा घात, बाप लेक केले जेरबंद
(~ गाणे)
पेटाऱ्यात बसून दोघे आग्र्याहून निसटले.
पण एकत्र प्रवास करणे धोक्याचे होते.
मोरोपंतांकडे शंभूला एकट्याला ठेवून राजे परतले.
(गाणे)
वय होते कोवळे जरी, काळीज वाघाचे तरी
बटुरूप घेऊनी बाळ परती दरबारी जी जी जी SS.. परती दरबारी जी जी जी जी जी जीSS
(~ गाणे)
शंभू धर्म, शास्त्र, शस्त्र, भाषा सगळे शिकले .
अवघ्या १४व्या वर्षी त्यानी संस्कृत मध्ये "बुधभुषणं" हा ग्रन्थ लिहिला.
अनेक कविता, पुस्तके लिहिली.
शंभुराजे कवी मनाचे होते, पण शूर वीर पराक्रमी ही होते.
शिवरायांच्या मृत्युनंतर स्वराज्याची जबाबदारी शंभुच्या खांद्यावर पडली.
शिवाजी तो अब नहीं रहा, अब इन चूहों को मसलना आसान हो गया है
हम दख्खन जाएंगे, मुग़ल सल्तनत का झंडा रायगड पे लहराता देखना है मुझे
(सगळे मिळून)
इन्शा अल्लाह SS इन्शा अल्लाह SS
(गाणे)
औरंगाने केले ऐलान, करा राख सारा दख्खन
आदिलाला धूळ चारुन निजामाचे रण कंदन
(~ गाणे)
औरंगाने आदिलशाही आणि निजामशाही जवळपास संपुष्टात आणली.
पण त्याच औरंगाला मराठयांनी मात्र जेरीस आणले.
(गाणे)
औरंगाने केले ऐलान, करा राख सारा दख्खन
आदिलाला धूळ चारुन निजामाचे रण कंदन
कूच केली मराठी मुलखात, राख केली घर दार शेत
राज्यात झाला हाहाकार, राजा वाचव आम्ही पामर
हाती घेई नंगी तलवार देई ललकार शम्भू सरदार जी जी जी SS शम्भू सरदार जी जी जी जी जी जी SS
(~ गाणे)
(सगळे मिळून गर्जना)
हर हर महादेव SS हर हर महादेव
संभाजी राजे केवळ मुघलांशी नाही लढले, त्यानी पोर्तुगीजांशी ही दोन हात केले.
स्वराज्यातला एक ही किल्ला, आरमारातले एक ही जहाज शत्रूच्या हाती पडू दिले नाही.
मूठभर मावळ्यांना घेऊन ते लढत राहिले पण... फितुरीने मराठ्यांचा गळा कापला.
संगमेश्वर मुक्कामी मुकर्रब खानाने संभाजीला अटक केली.
संभाजी राजांबरोबर कवी कलश आणि इतर काही सरदारांना देखील अटक झाली .
त्यांना भुदरगड येथे औरंगजेबासमोर सादर करण्यात आले.
संभाजी, मुग़लों की गुलामी कबूल कर
तेरे सारे क़िले हमारे हवाले कर दे
हमारा सरदार बन जा
हम तेरी जान बक्ष देंगे
औरंगजेबाने संभाजीला शेवटची संधी दिली.
औरंगजेबा, मी मेलो तरी बेहत्तर पण हिन्दवी स्वराज्य तुला मिळणार नाही
माझे मावळे लढतील, लढतच राहतील
(गाणे)
डोळ्यांत फुलला अंगार, फर्मान केले जाहीर
करा काया ह्याची जर्जर, झुकवू दया तख्तापुढे शीर
(in sad voice) झुकवू दया तख्तापुढे शीर
(~ गाणे)
४० दिवस, तब्बल ४० दिवस संभाजीचा छळ सुरु होता.
तरीही त्या नरसिंहाने मुघलांपुढे मान तुकवली नाही.
अखेर ११ मार्च १६८९ ला ह्या धर्मवीराने आपले प्राण त्यागले.
पण तरीही औरंजेबाला मराठ्यांचे राज्य काबीज करता आले नाही.
(सगळे मिळून गर्जना)
हर हर महादेव SS हर हर महादेव
(गाणे)
गरजली मराठी माती, घेऊन शस्त्र ही हाती
आया बाया पोरे ही लढती
जोहार भगव्यासाठी करती जी जी जी SS भगव्यासाठी करती जी जी जी जी जी जी SS
(~ गाणे)
संभाजीनंतर राजारामाने स्वराज्याची धुरा सांभाळली
२७ वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात लढत होता
पण मराठी राज्य जिंकायचे त्याचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही
हे स्वप्न उराशी घेऊन अखेर महाराष्ट्रातच त्याचा मृत्यु झाला
(गाणे) -
एक झाली हिन्दवी प्रजा
रक्षण्या भगव्या ध्वजा
ऐसा होता शंभू बाळ राजा
नाही पराक्रमी कुणी दूजा
(सगळे मिळून गातात)
वाकूनी मुजरा करा मानाचा जी जी जी SS
वाकूनी मुजरा करा मानाचा जी जी जी जी जी जी SS
(~ गाणे)
बोला -
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो
राजमाता जिजाऊसाहेबांचा विजय असो
हर हर महादेव
जय भवानी जय शिवाजी
No comments:
Post a Comment