होळी रे होळी... पुरणाची पोळी...
पूर्वी होळी आली की अश्या आरोळ्या सर्रास ऐकायला यायच्या आणि अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत त्यात माझाही आवाज सामावलेला असायचा. होळीचा सण म्हणजे खरं तर अभ्यासाचा परमावधी म्हणतात तो काळ. पण होळी जवळ आली की मात्र आम्ही अभ्यासाला दांडी मारायचो. होळीसाठी सरपण गोळा करण्याचे उदात्त कार्य करण्यात वेळ कसा निघून जायचा ते कळायचेदेखील नाही. मग माळ्यावरून मागच्या वर्षीच्या टिमक्या, ढोलकी उतरवली जायची. बरेचदा ओलसरपणामुळे त्यातून नीट आवाज यायचा नाही. मग शेकोटीवर ती तापवायचा कार्यक्रम व्हायचा. एवढं करून ती ठीकठाक वाजली तर नशिब म्हणायचं आई-बाबांचं, कारण ती नाही वाजली तर नवीन टिमकी, ढोलक्यांची खरेदी ठरलेली असायची. एकदा टिमकीचा प्रश्न मिटला की ती वाजवण्यासाठी चांगली काठी शोधण्याचा कार्यक्रम सुरु व्हायचा. चांगली जाडजूड, वाळून घट्ट झालेली काठी मिळाली की देव भेटल्याचा आनंद व्हायचा. अशी सगळी साग्रसंगीत तयारी झाली की मग ह्या टिमक्या किती जोरात वाजतात ह्याचे प्रात्यक्षिक सगळ्या गल्लीला ऐकायला मिळायचे. होळीच्या आदल्या रात्री टिमकी आणि काठी शेजारी घेऊनच आम्ही झोपी जायचो. होळीचा दिवस उगवायचाच पुरणाचा गोड वास घेऊन. शेजारीपाजारी, आमच्या घरी, अगदी सगळ्यांकडे पुरणाचा बेत असायचा. आजीची गडबड पहाटेपासूनच सुरू झालेली असायची. सकाळीच ती दारासमोर रस्त्याचा थोडासा भाग शेणानं सारवून ठेवायची. कामवाल्या मावशींनी आणून दिलेल्या शेण्या बाहेर काढून ठेवायची. आईसुद्धा नेहमीपेक्षा थोडी लवकरच उठायची. आम्ही पण उठून आंघोळी आटपून होळी पेटवायच्या तयारीला लागायचो. शेजारच्या ३-४ घरातले सगळे लोक एकत्र जमायचे आणि दारातली ही छोटी होळी पेटवण्याचा कार्यक्रम पार पडायचा. टिमक्या वाजवत, बोंबा मारत आम्ही होळीला प्रदक्षिणा घालायचो. ह्या होळीला पोळीचा नैवेद्य दाखवला जायचा. होळीत टाकलेली पोळी शेजारचे अण्णा होळीत हात घालून बाहेर काढायचे, तेव्हा अण्णांना भिती वाटत नाही, त्यांना भाजतही नाही, ते खरंच किती महान आहेत वगैरे विचार मनात येऊन जायचे. ही जळालेली करपट चवीची पोळी अण्णा सगळ्या मुलांना प्रसाद म्हणून वाटायचे आणि मग सगळे आपापल्या घरी पोळीवर ताव मारण्यासाठी परतायचे. तुडुंब भरलेल्या पोटांनी मग दुपारी पत्ते, साप-शिडी वगैरे डाव रंगायचे. आई "अभ्यासाला बसा" वगैरे सांगायचा प्रयत्नही करून बघायची. पण तिला कुणी दाद देणार नाही हे तिलाही माहित असायचे. संध्याकाळ झाली की पार्कातल्या मोठ्या होळीची तयारी सुरू व्हायची. तिथं आम्हाला फारसा वाव नसायचा. एखादा दादा किंवा त्यातल्या त्यात तरुण काका इथे आघाडीवर असायचे. चांगली पुरुषभर उंचीची होळी रचली जायची. त्याच्या मधोमध एखादे वाळलेले झाड ठेवले जायचे. मग एखाद्या काकांच्या हस्ते ती पेटवली जायची. इथे बोंब मारण्यात मोठेसुद्धा सामील व्हायचे. काही धीट मुलं ह्या होळीवरून उड्या मारायची, निखा~यांवरून पळून दाखवायची. आम्ही मात्र आ वासून त्यांच्या ह्या करामती बघत राहायचो. होळी विझत आली की लोक पांगायला लागायचे, पण आम्ही मात्र आईच्या रागीट आवाजातल्या हाका येईपर्यंत आमच्या टिमक्या वाजवत तिथेच थांबलेलो असायचो. होळीचा दिवस पुन्हा पुरणपोळ्या चापून संपायचा. पण आम्ही मात्र रंगपंचमीचे विचार मनात घोळवतच झोपी जायचो.
आज ती होळी कुठंतरी हरवून गेली आहे. ऒफिसात ई-पत्रातून आलेल्या फोटोतच होळी बघण्याची वेळ आलेली आहे. काही मिळवण्यासाठी काही गमवावेही लागते म्हणतात. पण अमेरिकेचे "सुवर्णस्वप्न" साकारण्यासाठी मी मात्र अश्या हजारो छोट्याछोट्या आनंदांची होळी केली आहे. कधी वाटतं इतकं गमावण्याच्या लायकीचं होतं का हे स्वप्न? घरी नक्कीच परतायचं आहे, पण "कधी?" हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
सुरेख..
टीमकीचा आवाज, होळीभोवोती फ़ीरत बोंबा मारणं, होळीतला तो खरपूस पूरण पोळी आणि खोबर्याचा प्रसाद...सगळ्या आठवणी ताज्या झाल्या..
होळीबरोबरच दुसर्या दिवशीचं धुलिवंदन , रंगांची ऊधळ्ण, "रंग बरसे..." वगैरे गाणी म्हणत रंगात, पाण्यात चिंब भिजण...आणि भिजवण.हे सगळ मिस॒ करतो आजकाल..
बहुतेक प्रत्येक "सुवर्णस्वप्नाला" अशा आठवणींची झालर असतेच..
समदु:खी...
y3, तुमच्या अभिप्रायाबद्दल आभारी आहे. आपणच उघड डोळ्यांनी निवडलेला मार्ग कधी कधी काटेरी का वाटायला लागतो कोण जाणे? कधी आठवणी अश्या दाटतात आणि मनातली खळबळ कागदावर उतरते. अर्थात ह्या काही गोष्टींच्या मोबदल्यात आपण आपली ध्येय, स्वप्नं साकार करतो, तेव्हा आपल्याला तक्रारीला जागा नाही आहे, हो ना? :)
लेख आवडला. आपले सण हे संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असल्याने, अशा प्रसंगी मायदेशाची आठवण प्रकर्षाने येते.
छान लेख आहे. अगदी मनातले विचार वाचल्यासारखं वाटलं.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
मला तर काल पुरण्पोळी करायला सुद्धा वेळ मिळाला नाही.:( असो. तुमचा लेख वाचुन मात्र सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.आवडल लिहिलेल.
Post a Comment