Friday, February 24, 2006

काय हरवलंय?

आज वर्तमानपत्रात बातमी वाचली. आमची शाळा आता इंग्रजी माध्यमाची होणार. ही बातमी वाचली आणि उगाचच दुःख झाले. काहीतरी हरवल्यासारखं वाटलं. दोनेक वर्षातून एकदा भारतात गेल्यावर एखादी चक्कर मारणे, एवढाच माझा सध्या शाळेशी संबंध राहिला आहे. आता तर आमच्यावेळचे बरेचसे शिक्षकदेखील निवृत्त झाले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. पण शाळेशी माझी नाळ जोडली गेली आहे त्याचं काय करणार? वयाच्या तिस~या वर्षापासून शाळा माझ्या अस्तित्वाचा एक भाग बनली. मित्र-मैत्रिणी, शिक्षिका, शाळेतले इतर कर्मचारी.. सगळे माझ्या विश्वाचा अविभाज्य भाग होते. कधी कुणाशी भांडण होई, कधी रागावल्या म्हणून बाईंचा राग येई, पण तरिही शाळा कधीच नकोशी वाटली नाही. आमच्याकडे प्रत्येक वर्गाची एकच तुकडी, मोजकीच मुलं असायची. त्यामुळं एकमेकांशी जवळीक खूप होती. खरं तर ते एक मोठं कुटुंबच होतं म्हणा ना. मागच्या वर्षी आमच्या ह्या कुटुंबाचा आधारस्तंभ कोसळला, आमच्या शाळेच्या स्थापनकर्त्या गेल्या. शाळेची सूत्रं नवीन लोकांच्या हातात गेली. 'बदल' अस्तित्वाचा अनिवार्य हिस्सा आहे. जीवनाचा श्वासच.. आज ना उद्या शाळेच्या कार्यप्रणालीत बदल होणारच होता. आणि हा बदल तर चांगल्यासाठी होतो आहे. कितीही कटू वाटलं तरी मराठी माध्यमाच्या शाळांना भविष्य नाही हे सत्य आहे. हे सगळं माहित असूनही काहीतरी गमावल्याची ही भावना का? म्हणतात ना, कळतंय पण वळत नाही. तसं काहीतरी झालंय. का? का व्हावं असं?

4 comments:

Nandan said...

लेख आवडला. फक्त 'हा बदल चांगल्यासाठी होत आहे' हे काही तितकेसे पटले नाही.

मनोगते said...

सद्य परिस्थितीत मराठी शाळांमध्ये मुलांसाठी प्रवेश घ्यायला फारसे पालक उत्सुक नसतात. तुम्हाला किंवा मला ते पटले/आवडले नाही तरी हे खरे आहे. मग अश्यावेळी आपले अस्तित्व टिकवणे जास्त महत्वाचे आहे, असे मला तरी वाटते. म्हणूनच "चांगल्यासाठी" हे पाऊल उचलले गेले आहे असे मी अजूनही म्हणेन. माझं व्यक्तिगत मत विचाराल तर मुलांना फक्त त्यांच्या मातृभाषेतच शिक्षण दिले पाहिजे असे मला ठामपणे वाटते, पण असा विचार करणारे खूप थोडे लोक आहेत हे दुर्दैव आहे.

Anonymous said...

Do you think that children's interest in marathi literature can be sustained over time. With people increasingly opting for english medium schools it seems that marathi story and text books' lifetime looks short. The reason I am wondering about this question is because I am considering a business opportunity in this field.

मनोगते said...

Parents can help sustain kids' interest in Marathi literature. I know many people who studied in English medium, but do read marathi books. But again I also know of people who think reading marathi books, speaking in Marathi basically means being old fashioned. Why they think so? I don't know.. but I can see their number growing day by day.