Thursday, April 13, 2006

दुवा

परवा आजी गेली. अगदी अचानकच. फारशी आजारी होती असंही नाही, पाय दुखत होते म्हणून दवाखान्यात नेलं आणि काही निदान होण्यापूर्वीच तीव्र झटका येऊन ती गेलीसुद्धा. मी एका मीटिंगमध्ये होते, ते पण शिकागोमध्ये, फोन बंद होता, सकाळी ९ च्या आसपास फोन आला होता, पण निरोप मिळाला तेव्हा संध्याकाळचे ५ वाजले होते. अर्थात आधी निरोप मिळाला असता तरी मी काही करु शकले असते असे नाही म्हणा. लगेच ७ च्या विमानानं घरी यायला निघायचं होतं. भारतात खूप रात्र असल्यामुळे लगेच फोन करणे ही शक्य नव्हते. घरी पोचले तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते. तेव्हा फोन केला. आजी गेल्याला १८ तास होऊन गेल्यावर.. जागेतल्या, वेळेतल्या अंतरामुळे किती हतबल होतो ना माणूस? फोनवर आजोबांशी बोलले, तर त्यांनी विचारलं "तुला बातमी मिळाली ना? आता मला भेटायला येशील ना गं?" काय उत्तर होतं माझ्याकडं ह्या प्रश्नाचं? "नाही येऊ शकत" असं सांगून त्यांचं मन दुखवायचं? की "येईन हा" असं खोटं आश्वासन द्यायचं? माझ्या तोंडून शब्दच फुटेनात. आईच्या लक्षात आलं की काय कोण जाणे, पण तिनं आजोबांकडून फोन काढून घेतला. पण निःशब्दतेतले ते ४ क्षण खूप त्रासदायक होते. इतकी हतबलता, इतका दुबळेपणा मला कधीच जाणवला नव्हता. माझ्या आजोबांचं आयुष्य एका क्षणात रितं झालं होतं, ६५ वर्षांचा संसार संपुष्टात आला होता, त्यांची लाडकी नात त्यांचं दुःख वाटायला येईल एवढीच त्यांची अपेक्षा होती, पण ती येऊ शकत नव्हती कारण... कारण आपल्या स्वप्नांच्या मागे धावताना ती आपलं घर, आपली माणसं जगाच्या दुस~या टोकाला सोडून आली होती. "काय कमावलं आणि काय गमावलं" हे द्वंद्व इतर लाखो अनिवासी भारतीयांप्रमाणे माझ्या मनातही बरेचदा चालतं. चालत राहणार. पण पायात इतक्या बेड्या मी माझ्या हातानं अडकवून घेतल्या आहेत की पाशमुक्त व्हायला काही काळ जाईलच. परत जायचंच आहे, हा निर्णय बदलणारही नाही. पण म्हणतात ना, वेळ यावी लागते, ती वेळ अजून आलेली नाही हे नक्की. ती वेळ येण्यापूर्वी माझ्या आजीची जाण्याची वेळ आली हे दुर्दैव.. पण ती जाण्यापूर्वी काही दिवसच मी तिला भेटले होते, अगदी २-३ महिन्यापूर्वीच.. मागच्या वर्षीच आमची चक्कर झाली होती भारतात, पण तरिही ह्यावर्षी पुन्हा जायचं ठरवलं आम्ही अचानकच. कदाचित तिला भेटणं माझ्या नशिबात असावं.. काल आम्ही भारतात असतानाचे फोटो बघत होते, आजी-आजोबांबरोबरचा आमचा फोटो.. पुन्हा कधीच मी तिला बघणार नाही, ही भावना भयंकर वाटली मला त्याक्षणी, पण तेच सत्य आहे, कटू असले तरिही... तिचे सगळ्यांशी ऋणानुबंध इथवरच होते, ते तोडून ती निघून गेली. आजोबांना एकटं सोडून गेली.. पण आठवणी मागे ठेऊन गेली. आजोळचे आजी-आजोबा तर केव्हाच गेले होते, आता त्या पिढीतला एकच दुवा शिल्लक आहे माझ्या आजोबांच्या रुपात, क्षीण आहे, पण आहे. आणि तो असणे किती आनंददायी आहे ते आज जाणवते आहे, आजी गेल्यावर, एक दुवा निखळल्यावर.

4 comments:

Anonymous said...

सुरेखच! आपल्याला काय हवंय हे ओळखणं आपल्याला जे हवंय ते का हवंय ह्या प्रश्नाच्या तुलनेत सोपे असते.

Tulip said...

फार अस्वस्थ वाटलं ही पोस्ट वाचून. परदेशात रहाताना ह्या अनुभवातून आणि हतबलतेच्या भावनेतून प्रत्येकालाच कधीनाकधी जावं लागतं. अगदी जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत जेव्हा हे घडतं तेव्हा तर त्यातून सावरताना परदेशात फार फार कठीण जातं.

तुझ्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

मनोगते said...

धन्यवाद ट्युलिप, शैलेश!

Nandan said...

Tulip shi sahmat.