Thursday, October 27, 2016

सुनिता (१)

(manogat.com वर पूर्वप्रकाशित)

आज सुनिता खूप आनंदात होती. ३ वर्षांपासून जे स्वप्न ती दिवस-रात्र बघत होती त्याची पूर्तता होताना दिसत होती. आज पहिल्यांदाच तिने प्रवीणच्या डोळ्यात तिच्यासाठी प्रेम पाहिले होते. प्रवीणला ती पहिल्यांदा भेटली तो प्रसंग तिला राहून राहून आठवत होता.
सुनिताचा विसावा वाढदिवस नुकताच झाला होता. आई-बाबा आता तिच्या लग्नाच्या गोष्टी करु लागले होते. तशी तिच्या लग्नाची त्यांना फारशी काळजी नव्हतीच. सुनिता नाकी-डोळी छानच होती, शेलट्या अंगाची, गव्हाळ रंगाची. तिच्या चेहऱ्यावर कधीही न विरणारं हसू असायचं. बाबा नेहमी म्हणायचे, ‘माझी सुनि जिथे जाईल ते घर हास्यानं-आनंदानं भरुन जाईल.’ आणि खरंच त्यात काहीच अतिशयोक्ती नव्हती. आपल्या सालस वागण्यानं सुनिता कुणालाही आपलंसं करुन घेत असे. दोन दिवसांपूर्वीच शेट्येकाका एक स्थळ सांगायला आले होते. मुलगा अमेरिकेत होता, मोठ्या पगाराची नोकरी होती, हुशार होता, दिसायलाही चांगला होता. शिवाय काकांच्या चांगल्या परिचयातले लोक होते. आज ते लोक सुनिताला बघायला येणार होते. सुनिता खूषही होती आणि थोडी बावरलीही होती. बाबांच्या कपाटातून मधूने मुलाचा फोटो केव्हाच लंपास केला होता आणि दिवसभर ती ताईला चिडवत बसली होती. जसजशी प्रवीणची येण्याची वेळ जवळ येत होती तशी सुनिताच्या मनातली हूरहूर वाढत होती. "तो कसा असेल? काय बोलेल? त्याला मी आवडेन? आणि आवडले तर… तर आईबाबांना सोडून त्याच्याबरोबर मला अमेरिकेला जावे लागेल? मला नाही जायचं इतक्या दूर. बाबा पण ना… काय गरज होती त्या लोकांना बोलवायची? पण खरंच तो किती देखणा दिसतो. आणि काका म्हणत होते खूप हुशार पण आहे. मला कशाला पसंत करेल तो मग. मी ना इतकी हुशार, ना देखणी. अरे देवा, मला तर इंग्रजी पण नाही बोलता येत नीट. बरंच आहे म्हणा, सुंठेवाचून खोकला जाईल.." दिवसभर कळत-नकळत ती प्रवीणचाच विचार करत होती. प्रवीण, त्याचे आईबाबा आणि त्याची थोरली बहिण राधा त्यांच्या घरी आले तेव्हा त्यांच्यासमोर जाण्याच्या विचारानंच तिच्या पोटात खड्डा पडला होता आणि तिचं ते बावरलेलं ध्यान बघून आई अगदी मनसोक्त हसली होती. पहिल्याच भेटीत प्रवीणच्या घरच्यांनी आई-बाबांना आपलंसं करून घेतलं होतं. वर्षानुवर्षीची ओळख असावी अश्या गप्पा रंगल्या होत्या. प्रवीण आणि सुनिता मात्र कोप~यात अंग चोरून बसले होते. प्रवीणच्या नजरेला नजर भिडवण्याचीसुद्धा तिला लाज वाटत होती. त्या रात्री बाबा फारच खुशीत होते. त्यांच्या सुनिसाठी त्यांना हवा तसा मुलगा त्यांना सापडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रवीणच्या बाबांचा फोन आला, त्यांना मुलगी पसंत होती. पण लग्न आठ दिवसात उरकावे लागणार होते. प्रवीणची सुट्टी संपत आली होती. राधालाही अमेरिकेला तिच्या घरी परतायचे होते. आठ दिवसात सगळं कसं जमायचं म्हणून बाबांनी थोडे आढेवेढे घेतले, पण मग तेही तयार झाले आणि घरात लग्नाची गडबड सुरू झाली. घर पाहुण्यांनी भरून गेलं.
त्या आठ दिवसात प्रवीणशी बोलायला पण सुनिताला वेळ मिळाला नाही, भेटणं, हिंडणं-फिरणं, एकमेकांना समजून घेणं तर पार दूरची गोष्ट झाली. प्रियकराबरोबर हातात हात गुंफून चांदण्यात फिरण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं. प्रियकराच्या प्रेमात पुरतं पडण्यापूर्वीच तो तिचा नवरा झाला होता. पण सुनिता आनंदात होती, तिच्या स्वप्नातला राजकुमार सत्यात साकारला होता, सोन्यासारखं सासर मिळालं होतं. लग्नानंतर चार दिवस पूजा, नातेवाईकांच्या गाठी-भेटी, प्रवासाची तयारी, व्हिसा ह्यातच गेले. तिला आणि प्रवीणला म्हणावा तसा एकांत मिळतच नव्हता. पण एकदा अमेरिकेला गेल्यावर राजा-राणीचा संसारच तर होता, कायमचा मधुचंद्र.. ती आपल्या घरी जाणार होती. तिला तिकडे जाऊन तिचं घर सजवायचं होतं, छोटीशी का होईना बाग फुलवायची होती, पुढचा महिनाभर प्रवीणसाठी काय काय पदार्थ बनवायचे ते तिनं मनातल्या मनात ठरवूनही टाकलं होतं. त्याच्याशी लग्नाच्या धांदलीत राहून गेलेल्या गप्पा ही मारायच्या होत्या. घरापासून दूर जाण्याचं दुःख होतं, पण प्रवीणबरोबर जाणार ह्याचा आनंदही होत होता. ज्याला आपण फक्त दोन आठवडे ओळखतो त्याच्यावर आपण इतकं प्रेम कसं करू शकतो? तिला राहून राहून आश्चर्य वाटत होतं.
"तीन वर्ष झाली नाही आपण अमेरिकेत पहिलं पाऊल ठेवलं त्याला?" सुनिता विचारात गढली होती. तीन वर्ष… ह्या तीन वर्षात तिनं तीन जन्माचं दुःख सोसलं होतं.
अमेरिकेला परतल्यापासून प्रवीण शांत शांतच असायचा. तो ऒफिसातून घरी येईपर्यंत साडे नऊ वाजून गेलेले असायचे, आल्यावर जेवण उरकले की तो त्याच्या स्टडीत जाऊन बसायचा. कधी चॅट करण्यात, कधी फोनवर बोलण्यात ११ वाजून जायचे. कित्येकदा तो स्टडीतच झोपून जायचा. सुनिता मात्र त्याच्या स्पर्शासाठी, सहवासासाठी रात्रभर तळमळत रहायची. लग्नाला महिना उलटून गेला होता, पण सुनिताच्या आयुष्यात अजूनही मधुचंद्राची गुलाबी रात्र आलीच नव्हती. कदाचित पुरेशी ओळख होण्यापूर्वीच लग्न झाल्यामुळे असे असेल, थोड्या दिवसात सगळं ठीक होईल अशी ती मनाची समजूत घालत होती. पण कुठे तरी काही तरी चुकत होते. लग्नाच्या नव्या नवलाईच्या दिवसात असणारी ती स्पर्शाची अनावर ओढ, प्रणयातुरता प्रवीणच्या डोळ्यात तिला कधी दिसलीच नाही. त्याच्याशी बोलण्याचे तिचे सगळे प्रयत्न व्यर्थ जात होते. आपल्या माणसांपासून इतक्या दूर ती ज्याच्या भरवशावर आली होती, तोच तिला टाळत होता. "का? का वागतो हा असा? मी काय गुन्हा केलाय ह्याचा? इतकी का मी वाईट आहे की माझ्याबद्दल काडीचं आकर्षण नाही वाटत ह्याला? आणि नव्हते मी पसंत तर का केलं माझ्याशी लग्न?" मनातल्या मनात कित्येकदा उजळणी केली होती ह्या प्रश्नांची. कित्येकदा एकटीच रडलीही होती.. पण ह्या परक्या देशात कोण होतं तिचे अश्रू पुसायला? शेजार असा नव्हताच. तिचे कुणी मित्र-मैत्रिणी, नातेवाईकही नव्हते अमेरिकेत. आठवड्यातून एकदा काय तो घरी फोन व्हायचा, पण आई-बाबांना ह्या गोष्टीची जाणीवही होऊ दिली नव्हती तिनं. दिवसांमागून दिवस उलटत होते, पण प्रवीणच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता.
दिवाळसण.. पहिला पाडवा.. सुनिता आरतीच्या तयारीत होती. डाळींबी रंगाच्या चंदेरीत ती खूपच गोड दिसत होती. प्रवीण तिला बघायला आला होता तेव्हाही तिने हीच साडी नेसली होती. स्वतःला आरश्यात न्याहाळताना तिला तो दिवस आठवला आणि तिच्या चेह~यावर नेहमीची खिन्नता पसरली, डोळे पाण्यानं डबडबले. किती बदलली होती ती ह्या काही दिवसात. तिच्या ओठांवरचं हसू जणू गायबच झालं होतं. चेहरा काळवंडला होता, डोळ्याभोवती काळी वर्तुळं दिसत होती, आठ महिन्यात आठ वर्ष सरल्यासारखी दिसायला लागली होती ती. एकटेपणाचं दुःख, सततचा कोंडमारा ह्यांनी ती अगदीच कोमेजून गेली होती. तितक्यात दरवाजा वाजला, "प्रवीण ऒफिसला निघाला वाटतं.." तिने लगबगीने आरती उचलली आणि ती बाहेर पळाली, "प्रवीण, २ मिनिट थांब ना, तुला ओवाळायचंय.. आज पाडवा ना!" प्रवीण थांबला, पण त्याच्या डोळ्यात विलक्षण घृणा दिसली तिला त्या क्षणी. "सुनिता, किती दिवस असं खोटं जगणार आहेस तू? का वागतेस अशी काही कळत नसल्यासारखी? आज पाडवा म्हणून नव~याला ओवाळायला निघाली आहेस, पण तुला आणि मला दोघांनाही माहित आहे की आपल्यात नवरा-बायकोचं  कोणतंही नातं नाही… ना शारिरीक.. ना मानसिक.. मग हा दिखावा कशाला? बरं जगाला फसवण्यासाठी तू हे करते आहेस म्हणावं तर इथे आपल्या दोघांशिवाय कुणीही नाही. किती दिवस सहन करू मी तुला ह्या घरात? तू समोर दिसलीस की घरी एक क्षणदेखील थांबायची इच्छा होत नाही.. आज ना उद्या तू कंटाळशील, चिडशील, भांडशील आणि मला सोडून निघून जाशील ह्या आशेवर ८ महिने काढले मी. आता मला हे खोटे जगणे नको आहे. आता मी वेदाला सोडून नाही जगू शकत आणि तू इथे आहेस तोवर ती ह्या घरात पाऊलही नाही ठेवणार.. मला घटस्फोट हवाय सुनिता, लवकरात लवकर.." प्रवीणचा प्रत्येक शब्द आसूडासारखा बरसत होता सुनितावर. "घटस्फोट…" ती मटकन खाली बसली. तिच्या घशाला कोरड पडली होती, तोंडातून शब्दही फुटत नव्हता. प्रवीण अजूनही बोलतच होता. "मी आजच वकिलाकडे जाणार आहे, तू जितक्या लवकर संमती देशील ह्या घटस्फोटाला ते आपल्या दोघांसाठी चांगले आहे. मी तुला थोडीफार नुकसानभरपाई द्यायला तयार आहे, तुझं परतीचं तिकिटही तुला मिळेल, पण ह्यापेक्षा अधिक अपेक्षा तू न ठेवलेलीच बरी." प्रवीणच्या प्रत्येक शब्दासरशी सुनिताचा पारा चढत होता. "नुकसान भरपाई.. काय नुकसान भरपाई देणार आहेस प्रवीण तू मला? माझ्या आयुष्याचा.. माझ्या स्वप्नांचा चुराडा केलास तू… ती स्वप्नं पुन्हा सजवता येतील तुला? ह्या आठ महिन्यात नरक यातना भोगल्या आहेत मी.. माझ्या अश्रूंची काय भरपाई देणार तू मला? मी माझं सर्वस्व तुला देऊ केलं आणि तू… शी!! वेदासाठी जीव तळमळतोय ना तुझा? तुझ्यासाठी मी अशीच तळमळले आहे प्रवीण. रात्रं दिवस तळमळले आहे.. ह्या परक्या देशात, परक्या लोकात तुझ्या भरवशावर आले मी आणि तू विश्वासघात केलास माझा. मी काय गुन्हा केला होता की एवढी मोठी शिक्षा दिलीस तू मला. तुझं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम होतं ना.. मग माझा बळी का दिलास तू त्या विवाहवेदीवर? का केलंस माझ्याशी लग्न? तुझ्या एका होकारानं माझं सगळं आयुष्य होरपळून टाकलंस तू ह्याची जाणीव आहे तुला? म्हणे नुकसान भरपाई देतो.. नाही प्रवीण. इतके दिवस तू मला जाळलं आहेस ना ह्या अग्नीत, आता मी तुला त्या विरह यातना भोगायला लावणार. मी नाही इतक्या सहजासहजी तुला सोडून जाणार. मी तुला घटस्फोट नाही देणार. वेदाला ह्या घरात नाही येऊ देणार मी… नाही येऊ देणार" सुनिताचा चेहरा लालबुंद झाला होता, कपाळावरची शीर तटतटत होती. तिचे हे रुप प्रवीणला नवीन होते. वेदाबद्दल ऐकल्यावर सुनिता रडेल, विनवण्या करेल असे त्याला वाटले होते. पण चंडिकेच्या रुपातली ही सुनिता त्याला अपेक्षित नव्हती. त्याला माहित होतं त्यानं चूक केली होती. वेदाला स्वीकारायला त्याचे आई-बाबा तयार नव्हते. आईनं तर आत्महत्येची धमकी दिली, म्हणून नाईलाजानं त्यानं लग्नाला संमति दिली. पण वेदाशिवाय दुसऱ्या कुणावरही प्रेम करणं त्याला शक्य तरी होतं का? पण सुनिता.. ती हे समजून घ्यायला तयारच नव्हती. वेदाला ह्या घरात येऊ देणार नाही… ह्या सुनिताच्या वाक्यासरशी प्रवीणचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने खाडकन सुनिताच्या मुस्काटात लगावली. सुनिता कोलमडली. पण तिच्याकडे साधा कटाक्षही न टाकता प्रवीण घराबाहेर पडला.
तिरमिरीतच त्याने गाडी वेदाच्या घराकडे वळवली. पुढे काय करायचं हे त्याला समजेनासंच झालं होतं. आई-बाबांना, राधाला तो काय सांगणार होता? सुनिताच्या घरी ही बातमी कळल्यावर काय होईल ह्याचा विचारही त्याला करवत नव्हता. आज त्याला वेदाची खूप गरज होती. त्याला तिच्या मिठीत शिरून सगळ्या चिंता विसरायच्या होत्या. तिच्या स्पर्शाच्या कल्पनेनेच त्याच्या शरिरावर रोमांच उभे राहिले. क्षणभर तो आपल्या सगळ्या चिंता विसरला. वेदा.. त्याला वेड लावणारे तिचे ते घारे डोळे.. खांद्यावर रुळणारे कुरळे केस.. तिच्या गोऱ्यापान दंडावर गोंदलेलं गुलाबाचं फूल.. तिचे कमनीय शरिर.. त्याचा रोम अन रोम तिच्या विचारांनी पेटून उठला, तिच्या स्पर्शासाठी त्याचा कण अन कण आसुसत होता. वेदा.. वेदा.. वेदा.. तिच्याशिवाय त्याला काहीच सुचेनासे झाले होते. वेदाच्या घरापुढे गाडी लावून तो धावतच घरात शिरला आणि आवेगानं त्याने वेदाच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. आज पुन्हा तो ऒफिसला दांडी मारणार होता!!
(क्रमशः)

No comments: