Monday, May 24, 2010

बाकी ठीक!!

काल घरी फोन केला होता, हल्ली रोजच करावा लागतो. आजी-आजोबांना नातवाशी आणि नातवाला त्यांच्याशी चकाट्या पिटायच्या असतात. मग फोनवर "हेलॊ", "गुड मॊर्निंग", "how r u", "काय करताय" अशा चौकश्या करुन झाल्या की चिरंजीव "बाबा रागवला", "मी पडलो, लागलॆ" वगैरे तक्रारी करतात. ते झालं की आजोबा त्याला गाणे म्हणून दाखवतात. गाणीदेखील ठरलेलीच असतात, "राम नारायण बाजा बजा तो" आजोबानी म्हणायचे आणि मामा असेल तर "मेरी laundry का एक बिल" चालतं. मग इकडून "A B C D", "baa baa black sheep" च्या फैरी झडतात. मग काही तरी अतिशय असंबद्ध बडबड केली जाते, आजी-आजोबांना त्याचेही प्रचंड कौतुक वाटते.

तर ह्या अश्या रोजच्या गप्पांमध्ये काल एका नव्या वाक्याची भर पडली. काल बोलता बोलता नातवाने आजोबांना सांगितले "बाकी ठीक!!" :) आम्ही बोलताना ऐकले असेल कधी तरी. त्याचं लक्ष कुठेकुठे आणि किती असते हे कळत देखील नाही. असो, त्याचं बाकी ठीक ऐकून मला आणि त्याच्या बाबाला इतकं हसू येत होते ना.. असो.. २ दिवसात पिल्लू पावणे दोन वर्षाचा होणार. दिवस कसे भुर्रकन उडून जाताहेत. "बाबा".."मामा".. ने सुरु झालेल्या त्याच्या बडबडीमध्ये आज निदान शे-दिडशे शब्दांची भर पडली आहे.. खूप मजा येते त्याचं बोलणं ऐकायला. looking fwd to more of his funny vocabulary :)

Wednesday, May 19, 2010

अमेरिकेत मराठी कुटुंबात जन्माला आल्यामुळे आमच्या चिरंजीवांचा मराठी आणि इंग्रजी ह्या दोन वेगळ्या भाषा नसून एकच आहेत आणि सगळे जग ही भेसळ भाषाच बोलते असा ठाम समज आहे. त्याचे काही नमुने..

आमचे घर clean करण्यासाठी येणारी "Erika मावशी clean up clean up छान छान" करते आणि त्याच्या day care मधली "जिबा जान" आणि "दाऊद काका" त्याला "भुकु" लागली की "दुदु"आणि "भाता" देतात. "चिऊ" म्हणजे "birdie", "tree" वर बसून "मम्म" करते. "रामू Turtle" आणि "टोण्या fishie", "fish tank" मध्ये "लपून" बसतात. "आई" कधी कधी "मागे जाते", कधी "sit there", तर कधी कधी "come here" करते. "बाबा"ला कधी "Don't touch" असा दम दिला जातो तर कधी "माया माया" आणि "I love you" म्हणून जवळ घेतले जाते. रित्विक कधी "fell down" करतो तर कधी "डुबूककन पडतो" आणि "eyes" मध्ये "पापा" येऊन "जोरात रडतो". त्याला "गरम गरम पोयी" (पोळी) आणि "पास्ता" खूप आवडतो. "भांड्याला झाकण बंद" करून "spoon"ने हलवून तो "Strawberry, banana, grapes, broccoli" आणि "वाटाणे" घालून "भाजी" करतो आणि त्यात "मीठ, मसाला, तिखट" पण घालतो. त्याच्या "पोटा"वरच्या "belly button" ला "गुदू गुदू" केले की त्याला खूप "गम्मत" येते. आईला रात्री "good night, sweet dreams, have fun" म्हणून तो बाबाच्या मांडीवर बसून "सीता राम सीता राम" आणि "राम नारायण" अशी "गाणी" ऐकतो आणि "जोजो" करतो.

आहे की नाही गम्मत?