Wednesday, July 17, 2013

रंगांची गोष्ट - छोट्यांची नाटुकली


@copyright manogate.blogspot.com - Do not use without permission


(सगळी मुले एका ओळीत उभी आहेत)

सूत्रधार:
खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. साता समुद्रापलिकडे, एका रंगीबेरंगी राज्यात अनेक रंग गुण्यागोविंदाने राहात होते. ते एकत्र खेळत, नाचत, बागडत, गाणी गात, खूप खूप मस्ती करत. पण एके दिवशी काय झालं, रंगांचा राजा कोण ह्यावरुन सगळ्या रंगांचं जोरदार भांडण जुंपलं आणि आता तुम्ही स्वतःच बघा त्या भांडणाचा निकाल काय लागला ते..

(सगळे आरडाओरडा करत आहेत, मी राजा, मी श्रेष्ठ, एकेक रंग पुढे येऊन स्वतःची महती सांगतो. बाकीचे रंग मागे उभे असतात)

तांबडा:

लाल तांबडा रंग रे माझा
प्रतिक मी शक्तीचा
लाल पताका, लाल गुढी रे
रंग मी जल्लोषाचा
धोका असता सूचना देतो
रक्षणकर्ता तुमचा
बाप्पाचा मी असे लाडका
मी रंगांचा राजा

नारिंगी:

मी नारिंगी, मी रे भगवा,
केशर गंध रे माझा
साधू-संत ही चाहते माझे,
रंग असे त्यागाचा
भारतभूच्या झेंड्यावरती,
मान पहिला माझा,
मीच शुद्धता, मीच शौर्य रे,
मी रंगांचा राजा

पिवळा:

मी पिवळा रे, किती वेगळा,
देवांचा लाडका,
पावित्र्याचा रंग असे मी,
कृष्णाचा मी सखा,
पिवळी उन्हे नि पिकेही पिवळी,
संकेत मी सुगीचा,
सोन्याचा रे रंग असे मी,
मी रंगांचा राजा

हिरवा:

हिरवी झाडे, हिरवी शेते,
नाव रे माझे हिरवा,
हिरव्या रानी, गाई गाणी,
वेडा राघू बरवा,
हरितक्रांतीचे प्रतिक रे मी,
रंग मी सौभाग्याचा,
शेतकर्‍याचा प्राण असे मी,
मी रंगांचा राजा

निळा:

आकाश निळे, सागर निळे,
नदी-नाले, निळेच तळे,
नीलकण्ठ हा शिवशंभो नि,
राम-कृष्ण-विष्णू ही निळे,
विश्वव्यापी ही माझी निळाई,
अफाट महिमा माझा,
नितळ निळा मी, निळाशार मी,
मी रंगांचा राजा.

पारवा:

मी ना निळा, ना मी जांभळा,
पारवा माझा रंग वेगळा,
शांत राहूनी गंमत बघतो,
शिवशंभोचा तिसरा डोळा,
ध्यान असे मी, चिंतन ही मी,
रंग मी सामर्थ्याचा,
कमी न मजला लेखा कोणी,
मी रंगांचा राजा.

जांभळा:

लाल-निळ्याचा संगम करतो,
रंग जांभळा माझा,
राजांचा मी असे लाडका,
रंग रे मी सत्तेचा,
करवंदाचा, जांभळाचा,
रंग रान-मेव्याचा,
मधुर माझी गोडी असे रे,
मी रंगांचा राजा.

(पुन्हा सगळे भांडू लागतात, इतक्यात सूर्य आणि वर्षा हातात हात धरून नाचत बागडत येतात)

सूर्य:
अरे अरे हे काय करताय? का भांडताय?

तांबडा:
आम्ही रंगांचा राजा कोण ते ठरवतोय. पण तुम्ही कोण?


सूर्य:
मी सूर्य

वर्षा:
आणि मी वर्षा. आम्ही खूप चांगले मित्र आहोत.

सूर्य:
मी थकलो की ही मला ढगांची चादर देते आणि मी झोपलो की सगळीकडे फिरून येते

वर्षा:
आणि मी थकून परत आले की हा सूर्य उठतो आणि मी आराम करते

सूर्य:
आम्ही कधीच भांडत नाही

नारिंगी:
पण आम्ही भांडतोय आणि हे भांडण सुटतच नाही आहे

वर्षा:
एक काम करू, तुम्ही सगळे एकमेकांचा हात धरून इथे उभे राहा. आम्ही तुम्हाला आकाशात नेतो, म्हणजे सगळे लोक तुम्हाला बघू शकतील

सूर्य:
मग लोकच ठरवतील सगळ्यात सुंदर कोण. आणि जो सगळ्यात सुंदर तोच रंगांचा राजा

(सगळे रंग चालेल चालेल म्हणून माना डोलावतात आणि एकमेकांचा हात धरून उभे राहातात, सूर्य आणि वर्षादेखील त्यांचा हात धरतात)

पडद्यामागून आवाज:
१: ते पहा ते सगळे रंग किती सुंदर दिसत आहेत.
२: मी कधीच इतके सगळे रंग एकत्र नाही पाहिले
३: एकत्र आहेत म्हणूनच जास्त सुंदर दिसत आहेत
एकत्र: वाह वाह, ते पहा किती सुंदर रंग.. (खूप सारे आवाज)

पिवळा:
अरे हे तर कुणा एकाला सुंदर म्हणतच नाही आहेत

हिरवा:
सगळेच म्हणताहेत आपण एकत्र सुंदर दिसतो

सूर्य:
खरंय. तुम्ही सगळेच सुंदर आहातच. पण एकत्र आला की आणखी जास्त सुंदर दिसता

वर्षा:
ह्यापुढे जेव्हा जेव्हा मी आणि सूर्य भेटू, तुम्ही सुद्धा येत जा. आपण सगळे मिळून आकाश असेच सुंदर रंगवत जाऊ.

निळा:
हो ह्यापुढे आम्ही कधीच भांडणार नाही

पारवा:
एकमेकांना कमीही लेखणार नाही

जांभळा:
नेहमी एकत्र राहू. सर्वांना आनंद देऊ.

सूर्य/वर्षा एकत्र: ह्यापुढे सगळे तुम्हाला इंद्रधनुष्य म्हणतील.

(सगळे रंग खुष होतात आणि एकमेकांचा हात धरून इंद्रधनुष्य, किती छान नाव, अरे वा वगैरे म्हणत बागडत बागडत रंगमंचाबाहेर जातात)

समाप्त