Wednesday, August 30, 2006

काय करावं अशा लोकांचं?

आज खूप दिवसांनी इकडे परतले. गेले काही दिवस कामाचा व्याप इतका वाढला होता की दुसरं काही करायला वेळच मिळत नव्हता. आज मुद्दाम ठरवून इकडे आले. असो!
मागच्या महिन्यात आम्ही इटलीला जाऊन आलो. रोम, पोंपई, व्हेनिस, मुरानो, फ्लोरेन्स, पिसा अशी कितीतरी ठिकाणं हिंडलो, प्रत्येक गावात वर्षानुवर्ष जतन करुन ठेवलेल्या इमारती बघताना खरंच आश्चर्यचकित व्हायला होत होतं. त्या काळात त्यांचं शास्त्र किती प्रगत होतं ह्याची पहिल्यांदाच जाणीव होत होती. ००७० साली ज्वालामुखीनंतर राखेखाली गेलेले पोम्पई शहर, त्याची रचना बघून त्या रचनाकारांचं कौतुक वाटत होतं. पण तेव्हाच जाणवलं, आपण भारतीय लोक पण तर असेच किंबहुना ह्यापेक्षाही जास्त प्रगत होतो, पण ऐतिहासिक वास्तु, दस्तावेज जतन करून ठेवण्याची आपली वृत्तीच नाही बहुदा. आपले किल्ले, वाडे म्हणजे कचरा करण्यासाठी, आपल्या प्रेमाची जाहिरात कोरून ठेवण्यासाठी, पान-तंबाखू-गुटख्याची पिंक टाकण्यासाठी, दारूच्या बाटल्या फोडण्यासाठी मिळालेली हक्काची जागा वाटते आपल्याला. आपली संस्कृती जतन करणा~या इटालियन लोकांचं तोंड भरुन कौतुक करताना माझ्या देशात चाललेली ही हेळसांड जास्त तीव्रतेनं जाणवली.

मी शेंगा खाऊन फोलपाटं तिथेच टाकली नाही म्हणून माझी खिल्ली उडवणारे लोक दुसते कुणी नाही माझे अगदी जवळचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक आहेत, ते पण so called सुशिक्षित. आपलं घर टापटीप ठेवणारे हे लोक, घरासमोरच्या बागेत मात्र भेळेच्या पुड्या, च्युइंग गम, कोक-पेप्सीच्या बाटल्या टाकून येतात. जर ह्या सुशिक्षित, जग हिंडलेल्या लोकांना शिस्त लावणं आपल्याला जमत नाही तर इतरांबद्दल बोलायलाच नको.

No comments: