मी ४-५ वर्षांची होते तेव्हा आमच्या घराच्या अगदी जवळ एक झोपडपट्टी होती. येता-जाता तिथल्या मुलांना खेळताना बघायचे. कळत-नकळत त्यांच्यात आणि आम्हा मुलांमध्ये काही तरी नातं निर्माण झालं होतं. आम्ही कधीही त्यांच्याशी खेळलो नाही, कधी त्यांच्याशी बोललो ही नाही, पण त्यांची नावं मात्र तोंडपाठ होती.
एका दिवाळीला मी आणि माझी चुलत भावंडं, आम्ही अंगणात फटाके उडवत होतो. आमच्या अंगणाला एक मोठं लोखंडी फाटक आहे, त्या झोपडपट्टीतली काही मुलं त्या फाटकाला लोंबकाळून आम्हाला फटाके उडवताना बघत होती, एखादा फुसका बार निघाला की मागून घेत होती. त्या सगळ्या फटाक्यातली दारू काढून त्याचा भुसनाळा करण्यासाठी. मला आठवत ही नाही मला त्यावेळी काय वाटलं, पण मी घरातून माझ्या वाटणीचे सगळे फटाके आणले आणि त्या मुलांमध्ये वाटून टाकले. असं वागल्याबद्दल मला घरातलं कुणीच रागवलं नाही. उलट मला बक्षिस म्हणून नवीन फटाके मिळाले.
११वी ला होते तेव्हा किल्लारीचा भूकंप झाला. आम्ही मुलं घराघरात जाऊन पैसे, कपडे, वस्तू गोळा करत होतो. १०वीच्या बक्षिसांचे साठलेले सगळे पैसे मी देऊन टाकावे असं आईनं सुचवलं आणि मी ते केलं ही होतं.
लहानपणापासून माझ्या सामाजिक जाणीवा अगदी मुद्दाम नव्हे, पण अश्या कित्येक प्रसंगातून निर्माण होत गेल्या. आपण समाजाचं देणं लागतो, कमावलेल्या पैशाचा थोडासा हिस्सा चांगल्या कामात खर्च करावा ह्याचं बाळकडू मिळत गेलं. आज मागं वळून बघताना जाणवतं, आयुष्याच्या वाटेवर चालताना, चांगल्या-वाईट प्रसंगातून जाताना, कधी तरी माझ्याही नकळत मी त्या जाणीवा हरवून बसले आहे. थोडेफार पैसे-वस्तू कुठल्या तरी संस्थेला दान करताना देखील आधी मनात हिशोब केला जातो की ह्याचे टॅक्स बेनेफिट्स नेमके काय मिळतील. ५०-१०० डॊलर देताना देखील १० वेळा विचार करते मी. मी, माझं, माझ्यासाठी ह्याच्या पलिकडे विचारच नाही केला जात.
ही मी आणि आपले फटाके उचलून देऊन टाकणारी मी... मी नेमकी कोण आहे?
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर
Barech diwas - 2 varsha, khara tar kahi lihile nahit?
Post a Comment